क्षितिजावर स्थिरावलेली चवथीची कोर हळूहळू निस्तेज होऊ लागली.
अवनीवर थोडाफार सांडलेला चांदण्याचा सडा धुसर झाला. इवलासा चकोर चांदणं पिऊन दमला.
नक्षत्रांचे दिप एकापाठोपाठ विझायला लागले.
तारका समुह विखुरले. तारांगण मंद मंद होत गेले.
वृक्षांवर लटकलेल्या काजव्यांच्या माळा शांत झाल्या,
सागरही पेंगुळला आणि लाटा किनाऱ्यालाच अडखळल्या.
तारकांशी खेळणारे दंवबिंदू पानं फुलं शोधत झुडपांवर ओघळले.
रातकिड्यांची जीवघेणी किरकिरही थांबली.
झाडांखालच्या फांद्यांच्या सावलीचे भिववणारे राक्षस अंधारात दिसेनासे झाले.
तळ्यातली चंद्राकडे बघणारी कमळे कोमेजली.
पानाआड दडलेल्या छोट्याशा कळ्या एकेक करत धिटाईने फुलायला लागल्या.
वेड्या रातराणीचा फुलोरा गळुन पडला.
प्रितरंगी रंगलेला वारा ऊगाचच चांदणशिल्पे परत परत शोधू लागला.
निस्तब्धता सरत आली.
झाडावरच्या माकडांना पहिल्यांदा जाग आली.
बघता बघता नकळत मध्यरात्र ऊलटुन गेली, पण सारी सृष्टी पेंगुळली होती.
— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम