आंबे मोहोर….
आंबे मोहोर म्हटला की मनात येतो आंब्याचा गंध. मन मोहून टाकणारा. वाऱ्यावर लहरत येणारा सुगंधी सुवास..आंब्याला येणारी नाजूक फुल त्यावर गुंजारव घालणारी बारीक बारीक कीटक. सार वातावरण गंधित होते. वाऱ्यावर लहरत येते मग एक सुगंधाची लाट. मंद मंद झुळकित देहभर लपेटत जातो हा वास. उन्हाळा येतोय हे सांगतो हा वास. कोकीळ ही सुखावून जाते. कुहू कुहु ने आसमंत भरून जाते.
बहर मोठा होत जातो तसा तसा पक्षांचा, फुलपाखरांचा, मधमश्याचा थवा मोहरा भोवती नाचत राहतो.. उन वाढत जाते.पण कडुलिंब आणि आंब्याची सावली मात्र हिरवीगार होऊन मन सुखावते.
माझ्या वर्गाच्या काही अंतरावर एक वाडी होती. कुणाची माहीत नाही. पण पेरू, आंबा आणि कुंपणावर कडुलिंबाचे भरदार झाड.आपल्या हिरव्यागार पानाना सावरत उभा. सार कस हिरवेगार. वर्गाच्या खिडकीच्या चौकोनातून हे सुंदर चित्र मन मोहून घ्यायचे, त्यात वाडीला दिले जाणारे पाणी. त्याचा मृद्गगंध.मग येणारी तृप्त थंडगार वाऱ्याची लहर. आंब्याचा मधुर सुवास.सगळ कस गंधमय. मन उधाण वाऱ्याचे, बेभान होण्याची अवस्था. खिडकीच्या चौकोनातून दिसणारे कोरभर आभाळ. त्यातील विरळ ढग. मध्येच येणारी उन्हाची कोरीव लड. वर्गात सुरू असलेले गणित आणि मनातले चित्र संगीत ह्यांचा मेळ कधीच बसत नसे. देहाने मी फक्त तिथे असे. मन मात्र राईत.
आंब्याच्या मोहृर आणि पिवळ्या फुलपाखरा मागे असे. सार काही अद्भुत वाटायचं. पाण्याचा गारवा. आंब्याचा रंग हिरवा. काळसर दाट कडुलिंब. अधमधी झेलायचा पाऊस थेंब. मधुपाची गुंजारव आणि हलायची गवताची लव..
दिवस मोठे व्हायचे. उन जोरावर यायचे. तरुण व्हायचे. मोहोरही मग जाणता व्हायचा. हिरवी बाळकैरी वाकुल्या दाखवत हसायची. मग कधीतरी मैत्रिणी सोबत तिखट मिठाची पुडी घरून आणायची आणि बालकैरीचा मादक गंध चाखत, किंचित कडवट तुरट कैरी चाखायची.
मग सुट्या लागायच्या कैऱ्या, आंबे घरी यायचे. लोणचे, तककु, साखर आंबा, गोड लोणचे हे प्रकार चालायचे. गोड लोणच्याच्या आंब्याची फोड धूवून खाताना अप्रतिम लागायची.
मग घरात वाळवण सुरू व्हायची. कैरीचे आमसूल वाळे पर्यंत अर्धे अधिक पोटात जाई. तर आंब्याची पोळी पोटात जाऊन सुकत असावी. असे वाटते कदाचित. कुरडया पापड्या.साबुदाणा पापड, चकल्या ह्यांचा ही खूप फन्ना पडायचा.
मला कुरड्याचां चिक खूप आवडायचा. आई आवर्जून मला तो द्यायची.
आणखी एक गावातली आठवण म्हणजे उन्हाळा आला की सर्व वेटाळातील बायका प्रत्येकी कडे जमत. मग उडिदाचे पापड. हातावरच्या शेवया करत. सोबत गप्पा. मध्यंतरात चहा. माझी आई त्या सोबत सर्वासाठी साबुदाण्याचे पापड तळत असे. कारण बहुदा बऱ्याच बायकांचे उपास असत. मी त्या गोष्टी ची नेहमी वाट पहायची.
माझ्या आई पेक्षाही माझे वडील खूप अप्रतिम लोणचे घालायचे. ते कधीच बिघडत नसे. आजुबाजूच्या बाया ही सर्व सामान घेऊन येत व त्यांना विचारून लोणचे टाकत. नुसत्या डोळ्यांनी ते मीठ मसाला ह्यांचे प्रमाण सांगत.
आंबेमोहोर म्हणता मला आठवतो तो आंबेमोहोर तांदुळाचा गुर्गुट्या भात. त्यावर भरपूर लोणकढे तूप, मेतकूट. लिंबाचे लोणचे आणि गोडसर ताक वा अप्रतिम. तो वास भात शिजताना घरभर दर्वळत असायचां. तना मनात भरून उरायचा.
बहुधा सकाळी न्याहरी म्हणून हा मेतकुट भात असे. दुपारी जेवणात आंब्याचा रस, कुरडया पापड. वरण भात तूप. कधी कैरीचे सार, चटणी मजा असायची. रस ओरपला की कपडे देखील रंगायचे.
आमच्या भागात हापूस मात्र मिळत नसे. गावराणी आंबा. लंगडा. बेगमफलली, कलमी हेच आंबे मिळत. रस आणि साखर ह्यांचा संगम होवून मग खाताना ब्रम्हानंदी टाळी लागत असे. रसावर झोप आवश्यक. तेव्हा पाहुणे देखील येत जास्त असत. मग रसात कोय राहू दिली जाई. ज्याला ती कोय येयील त्याने त्याच्या घरी रसाचे चूल आमंत्रण द्यायचे. सढळ हाताने तो केशरी आमरस वाढल्या जाई. आमरस काढायच्या खास चिनी मातीच्या मोठ्या दगडया असत त्यातच तो रस काढल्या जाई.
आज आंब्याला मोहोर येतो. रस ही होतो. खास हापूस येतो.पण ती जुनी मजा राहिली नाही. ऐसपैस वाडे.त्या रसाळ्या. ती गंमत. एकत्र पंगत. कधी अंगत पंगत. अंगणातली जेवण.. आंगणात टाकलेली अंथरूण. मोकळ आकाश. चांदण्या रात्री. खूप जागून केलेल्या गप्पा भुताच्या गोष्टी. सार हरवल आहे. पण मनात घट्ट हा आंबेमोहोर बसला आहे.
— लेखन : अनुपमा मुंजे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800