“जगण्याचे सूर”
लहानपणापासून धाकात वाढलेली निकिताने स्वतःच्या इच्छा अपेक्षांचा कायम बळी दिला. सतत त्रास, भीती दडपण यातच तीचे बालपण गेलं. शाळेत देखील घाबरट, शांत आणि अभ्यासात ही जेमतेम. तिचा भाऊ मात्र खूप हुशार त्यामुळे घरी कायम त्याचे लाड व कौतुक. वंशाचा दिवा ना तो ! जो आई वडिलांना सांभाळणार होता …..असो …..
आता निकितीला याची सवय झाली होती …..हो…पण ती नृत्य करायची. गुपचूप कोणी घरात नसताना टीव्ही पाहून शिकत होती….. फक्त एकच मैत्रीण होती तिला इशिता जिला सर्व माहीत होतं, ती कायम तिला सोबत करत असे.
पुढे निकीताचे लग्न ठरवले. हो ते ही तिला न विचारता. आजपर्यंत तिच्या मताला, तिच्या आवडी निवडी याला कधीच महत्त्व नव्हतं तर हा निर्णय देखील पालकांनीच घेतला.
तिला काय कळते ? …..असेच त्यांचे मत.
लग्न झाले तेथे ही सासू सासरे व नवऱ्याचा धाक, सतत बंधने, हे करू नकोस, ते करू नकोस, तुला काय येते….तुला काय कळते…..टोमणे, अवहेलना, तिरस्कार. माहेरी सांगण्याची तर सोय नव्हती व लहानपणापासून याची सवय ही होती त्यामुळे सहनशीलता हा एकमेव पर्याय आहे हे तिने स्वीकारले होते.
निकिता मात्र खूप संस्कारी, देव धर्म, पै पाहुणे, सण वार सर्व अगदी मनापासून आवडीने करत होती. इतर सर्वांना तिच्या बद्दल आदर होता प्रेम होते. सर्वांना तिने आपलेसे केले होते….मात्र घरची परिस्थिती काही सुधारत नव्हती …बदलत नव्हती. दोन वर्षांने निकीताला मुलगा झाला… पुढे तो ही मोठा झाला. तो वडिलांचे व आजीचे अनुकरण करत राहिला. कारण लहानपणापासून तो हेच पहात होता.
अशा ही नकारात्मक परिस्थितीत तिची परमेश्वरावर नितांत श्रद्धा होती. विश्वास होता की एक दिवस हे सर्व बदलेल. तिच्या मनात आशेची ज्योत कायम होती.
आज लग्नाला पंधरा वर्षे झाली. नवऱ्याची नागपूर येथे बदली झाली. नवीन घर, नवीन जागा थोडं बरे वाटत होते तिला. अशीच एकदा शेजारच्या काकूंबरोबर बाहेर गेली होती तेव्हा वाटेत गर्दी दिसली कोणीतरी महिला छान भाषण करत होती, महिला सक्षमीकरण या विषयावर…. तिचे पाऊले थांबले…..आवाज थोडा ओळखीचा वाटत होता. तीच धार, तोच आत्मविश्वास आणि काय आश्चर्य ती महिला म्हणजे तिची मैत्रीण इशिता होती…..त्या भाषणाने त्या शब्दाने निकिता मंत्रमुग्ध झाली होती. इशिता होतीच तशी अतिशय हुशार, निर्भीड, बोलकी, उत्तम संभाषण कौशल्य असणारी, मनमिळाऊ आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारी.
भाषण संपले. गर्दी हळूहळू कमी होत गेली. निकिता मात्र एका बाजूला थांबून विचार करत होती तेवढ्यात मागून आवाज आला, अग निकिता कशी आहेस तु ? ओळखलं का मला ? इशिताने तिला जोरात मिठीच मारली. क्षणात सर्व आठवणी मनात दाटून आल्या व ती रडू लागली. दोघींचे फोनवर थोडं फार संभाषण होत असे मात्र निकिता ने इशिताला काही सांगितले नव्हते व अनेक वर्षांपासून तशी भेट झाली नव्हती.
इशिताने तिला घरी येण्याचा हट्ट केला. तिला नाराज करणे शक्य नव्हते म्हणून काकूंचा निरोप घेऊन ती ईशीताच्या घरी गेली. नवऱ्यालाही फोन केला, मात्र नेहमीप्रमाणे त्याने उचलला नाही.
दोघींच्या मस्त गप्पा रंगल्या. मग सहज इशिताने विचारले तू काय करतेस ? तुझे कसे चालले आहे ? घरच्यांची चौकशी केली मात्र ती गप्प होती. आधी तुझ्या बद्दल सांग ना ….तसे इशिता बोलू लागली मी समाजसेविका आहे व महिलांना सक्षम करण्यासाठी काम करते. भरपूर पैसा व वेळ आहे तो सत्कारणी लावायला नको का ? एक चमक दिसत होती तिच्या चेहऱ्यावर…..
बर आता तू बोल की….
तुझी तब्येत अशी का ? केवढी बारीक झाली आणि चेहरा देखील निस्तेज दिसतो….बोल अजिबात घाबरू नको …मी आहे ना ! काही त्रास आहे का….!? काळजी करू नकोस…सर्व ठीक होईल मात्र तू मला सर्व निःसंकोशपणे सांग.
आता निकिताच्या भावनांचा बांध फुटला रडत रडत सगळं सांगितले.
इशीताला हे ऐकून धक्का बसला. हे असे अजिबात सहन करायचे नाही. बास…..आता रडायचे नाही लढायचे. फक्त मी सांगते ते करायचे, कारण अत्याचार करण्यापेक्षा सहन करणारा दोषी असतो.
माझी एक सामाजिक संस्था आहे “जगण्याचे सूर”. मी त्या महिलांना मदत करते ज्यांच्यामध्ये सुप्त गुण असतात मात्र ते त्यांचा उपयोग करत नाही…..कधी कोणाची साथ नसते….कधी भीती असते…अशी अनेक कारणे असतात. मी त्यांना त्यांच्यातील शक्तीची त्यांना जाणीव करून देते. ईतकेच…
कोणाचाही आधार नसलेल्या त्या सर्व महिलांना सक्षम करते, स्वावलंबी बनवते.
हेच माझ्या जीवनाचे जणू धैर्य आहे. मी महिला सक्षमीकरणाचा वसा घेतला आहे. यातून मला समाधान व आनंद मिळतो. माझी मुलं परदेशात असतात. वेळ जात नाही. घरात सर्व सुख सोयी आहेत. माझ्या पतीचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे ते ही सतत कामात असतात. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी हे काम करते.
इशिता बोलत होती….तू ही सक्षम आहेस….तू करू शकते या जगात अशक्य काहीच नसते. ठरवले व प्रयत्न केले की परमेश्वर देखील साथ देतो. तू लहानपणी सुंदर नृत्य करायची. आठवते ना….?
ही तुझी आवड, तुझी कला हीच आज तुझी शक्ती असेल…..ही कला निकिताने आज देखील जोपासली होती…. सुंदर नृत्य करत होती कोणाच्या नकळत मोबाईल व टीव्हीवर पाहून घरात कोणी नसताना. हीच कला तुझे भाग्य बदलेल तुझी ओळख बनवेल.
मनातील भीती आता काढून टाक. पुढील महिन्यात माझ्या संस्थेचा महिला दिनाचा कार्यक्रम आहे. सर्व रूपरेषा ठरलेली आहे. तुझ्या गणेशवंदनाच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करू या. ही एक संधी आहे. तू नक्कीच करू शकते….मी तुझ्या सोबत आहे.
कार्यक्रमाला अनेक कलावंत, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळी असणार आहे. हे सर्व ऐकून निकिता एकदम शांत झाली…..
परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली होती. जणू जगण्याचे आता तिला सूर गवसले होते.
आता निकिता घरातील काम लवकर करून घेई. सासूबाई दुपारी भजनाला गेल्या की ती इशीताच्या घरी जात असे. इशिताने सर्व नियोजन केलं होतं. तीन तास ती गणेशवंदनाचा सराव करू लागली.
बोलता बोलता कार्यक्रमाचा दिवस उजाडला. अनेक मोठमोठी मंडळी उपस्थित होती. आज निकिताची जणू परीक्षा होती…पण तिच्या जिवलग मैत्रिणीचा ठाम विश्वास होता ती हे करू शकते, फक्त तिला सांगणारे कोणी नव्हते. तिच्यातील या सुप्त गुणांची माहिती कोणालाच नव्हती खुद्द निकिताला देखील…..तो आत्मविश्वास तिने गमावला होता…. पण आज या कोमजलेल्या वृक्षाला पालवी फुटली होती.
अपेक्षेपेक्षाही सुंदर नृत्य केले होते. टाळ्यांचा कडकडाट झाला. तशी निकिता भानावर आली. तिचे सर्व कुटुंब आज उपस्थित होते. एवढ्या मोठया कार्यक्रमाचे आमंत्रण स्वतः मैत्रिणीने जाऊन दिले होते व ते नाकारणे शक्य नव्हते.
आज हा आश्चर्याचा धक्का होता तिच्या घरच्यांसाठी. आपली बायको काय करू शकते ? आई काय करू शकते ? सून काय करू शकते ? याचे उत्तर जणू त्यांना मिळाले होते. आपण सर्वांनी नेहमी तिचा अपमान केला. तिला तुच्छ समजले. चुकीची वागणूक दिली त्यामुळे शरमेने त्यांची मान खाली गेली होती.
आज निकिता जिंकली होती. तिची स्वप्नपूर्ती झाली होती. नव्याने समाजात तिची ओळख झाली. तिला एक आदराचे स्थान मिळाले……
हे शक्य झाले केवळ तिची मैत्रीण इशितामुळे कारण तिचे ठाम मत होते की जर एका महिलेने महिलेला साथ दिली, तिचा आदर केला, तिच्यातील आत्मविश्वास बळकट केला, तिला प्रोत्साहित केले, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर ती नक्कीच यशस्वी होऊ शकते.
मात्र हे करायला मनाचा मोठेपणा लागतो जो इशिताकडे होता. इशिताच्या हाच स्वभावाने तिच्यातील चांगुलपणा, प्रामाणिकपणा व माणुसकी याचमुळे तिचे समाजात एक आदराचे स्थान होते.
एकमेकींचा द्वेष, इर्षा, अवहेलना, निंदा अथवा पाय खेचण्यापेक्षा तिला हात देऊन वर घेतले तर खऱ्या अर्थाने तो स्त्री शक्तीचा विजय असेल. थोडे विचार बदला तर देश बदलेल मात्र ही सुरवात स्वतःपासून करू या. घरात व समाजात एक सकारात्मक बदल घडेल असे इशिताचे ठाम मत होते व याचा प्रचार व प्रसार ती तिच्या सामाजिक संस्थे मार्फत करत होती, ज्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले होते. फक्त एकच अट होती की एका सक्षम स्त्रीने दोन महिलांना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि ही साखळी वाढत गेली पाहिजे.
इशिता कायम भाषणात सांगायची की एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सहकार्य केले तर चमत्कार घडेल कारण तिला सहानभूतीची नव्हे तर तिने गमावलेला आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज असते…मग काय ठरवलं करणार ना सहकार्य….?
आयुष्याच्या वाटेवर अशी एखादी लढणारी महिला भेटली की नक्कीच तिला साथ देऊन तिच्या पंखांना बळ देऊ या. तिच्या यशासाठी खारीचा वाटा उचलू या. तिच्यातील क्षमता, कौशल्य याची तिला जाणीव करून देऊ या, तिचे मनोबल वाढवू, उमेद देऊ जेणेकरून तिला जगण्याचे सूर गवसेल.
आज निकिता अनेकींना नृत्याचे प्रशिक्षण देते. आता ती स्वावलंबी आहे व आपल्या मैत्रिणीच्या संस्थेत तिला मदत करते…..हो ! ती बदलली व नव्याने जगायला शिकली. आज ही संस्था “जगण्याचे सूर” अनेकांची प्रेरणास्थान आहे.
— लेखन : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.