प्रा सुरेश पुरी सरांचा आज, १९ मे २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख. सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमासाठी मी १९८८ साली दूरदर्शन ची रीतसर परवानगी घेऊन प्रवेश घेतला.
त्यावेळी आम्हाला विभाग प्रमुख प्रा डॉ सुधाकर पवार सर, प्रा सुखराम हिवराळे सर (दुर्दैवाने आज दोघेही हयात नाहीयेत) प्रा डॉ वि.ल. धारूरकर सर, प्रा डॉ सुधीर गव्हाणे सर आणि प्रा. सुरेश पुरी सर शिकवायला होते. ही सर्वच प्राध्यापक मंडळी आणि पाहुणे व्याख्याते मंडळीही आम्हाला म्हणजे बॅचलर आणि मास्टर्स अशा दोन्ही वर्गांना अतिशय तळमळीने शिकवीत असत.

या प्राध्यापकांपैकी पुरी सर “जनसंपर्क” विषय शिकवीत असत. पण या शिकविण्याशिवाय त्यांचे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूल्य योगदान आहे. तेव्हा पुरी सर विद्यापीठ परिसरात विद्यापीठाकडून मिळालेल्या प्राध्यापकांच्या क्वार्टर मध्ये रहात असत. त्यांच्या अगत्यशील, सहज स्वभावामुळे, गरजू मुलांचे सरांच्या घरी वेळीअवेळी जाणे येणे होत असे. केवळ सरच नव्हे तर सरांच्या घरातील सर्वच मंडळी, म्हणजे पुरी मॅडम आणि सरांची मुले, मुलीही घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी आपुलकीने वागत. इतकेच नाही तर जेवणाच्या वेळी कितीही विद्यार्थी घरी आलेले असतील तरीही त्यांना जेवण केल्याशिवाय परत पाठविल्या जात नसे. सरांच्या घरी कधीही कुणाची जातपात, धर्म, प्रांतही पाहिल्या गेला नाही. सर्वांनाच सारखी प्रेमाची वागणूक मिळत असे.
त्यावेळी विद्यापीठात शिकायला आलेले बरचसे विद्यार्थी हे अत्यंत कठीण परिस्थितीतून आलेले असत. त्यामुळे त्यांना उठसूठ गावी, घरी जाणे शक्य होत नसे. असा भावनिक कोंडमारा होत असलेल्या, आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या सर्व विद्यार्थांसाठी पुरी सरांचे घर म्हणजे मायेचे ठिकाण होते. इतर सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे मी देखील पुरी सरांच्या घरचे प्रेम अनेकदा अनुभवले आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अपचुंदा या गावी जन्मलेले, अत्यंत खडतर परिस्थितीत सर्व शिक्षण घेतलेले पुरी सर १९८१ साली मराठवाडा विद्यापीठात प्रौढ साक्षरता विभागाचे संचालक म्हणून तर वर्षभरातच विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक पदी रुजू झाले आणि २०१० साली निवृत्त झाले.
अनेक व्यक्ती जीवनात अनेक अडचणींना तोंड देत यशस्वी होत असतात. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. पण दुर्दैवाने अशी “तथाकथित यशस्वी” मंडळी आपण ज्या परिस्थितीतून आलो, घडलो ते सर्व विसरतात. मी तर काही महाभाग असेही बघितले आहे की, इतरांची तर जाऊच द्या, त्यांना जन्मदात्या आईबापांचीसुद्धा लाज वाटत आली आहे. तर दुसऱ्यांसाठी ते काही करतील, याची अपेक्षा तरी काय करणार ?
पण पुरी सर मात्र स्वतःला आलेले कटू अनुभव, ती बिकट परिस्थिती कधीही विसरले नाहीत. त्यामुळेच कुठल्याही विद्यार्थ्याला काही अडचण आहे, हे समजताच ते निरपेक्षपणे त्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवत आले आहेत. त्यांच्या या स्वभावामुळेच अनेक विद्यार्थी जीवनात उभे राहू शकले आहेत.
आजही बहुतेक विद्यार्थी सरांचे ऋण केवळ खाजगीतच नाहीत तर जाहीरपणे मान्य करतात. म्हणूनच पुरी सर आणि अनेक विद्यार्थ्यांचे, त्यात मी स्वतःही आलोच, कायमस्वरूपी वैयक्तिक, कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत.

माझी २०१७ साली मराठवाडा विभागाचा माहिती संचालक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यावेळी मला पुरी सरांची आठवण आलीच. सरांचा नंबर कुठून मिळवावा या विचारात असतानाच मी रुजू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात वाचून सर स्वतःहूनच पुष्पगुच्छ घेऊन मला भेटायला आले आणि त्यांनी माझे अभिनंदन केले. शिवाय घरी यायचे आमंत्रणही दिले. त्याप्रमाणे एका रविवारी मी सरांच्या घरी गेलो आणि पुरी मॅडमच्या हातची भाकरी, वांग्याची भाजी खाऊन तृप्त झालो.
पुरी सरांचे एक महत्वाचे कार्य म्हणजे निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता त्यांच्या आवडत्या हिंदी भाषेच्या प्रचार कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्या निमित्ताने त्यांचे देशभर दौरे चालू असतात. सरांनी जनसंपर्कावर लिहिलेले पुस्तक हिंदीतही अनुवादित झाले आहे.

बदलत्या माध्यम विश्वाची चाहूल ओळखून सरांनी समाज माध्यमांचे तंत्र आत्मसात केले असून ते समाज माध्यमांमध्ये सतत सक्रिय असतात. कुणाचे वाढदिवस असो, पदोन्नती असो, कुणाला काही पुरस्कार मिळालेला असो की कुणाच्या जीवनात आणखी काही चांगले घडलेले असो, सरांच्या शुभेच्छा या फेसबुक वर तसेच संबंधित व्यक्तींच्या व्हॉट्स अप वर नक्कीच मिळतात. आपण आपापल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो तरी, आपल्यापेक्षा मोठी असलेली व्यक्ती आपल्याला आवर्जून शुभेच्छा देते, हा आनंद शब्दातीत असतो. पुरी सर असा आनंद निरपेक्षपणे सर्वांना देतात.
पुरी सरांविषयी विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या आदराचे प्रतीक म्हणजे सरांचे एक विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार महारूद्र मंगनाळे यांनी २०१० साली सरांवर आधारित ‘आई मनाचा माणूस’ हा ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आहेत.
तर सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त, शब्दवेध बुक हाऊस प्रकाशन संस्थेने या वर्षापासून ‘जनसंपर्कतज्ज्ञ : प्रा. सुरेशजी पुरी लोकपत्रकारिता’ पुरस्कार सुरू केला आहे. अकरा हजार रुपये रोख रक्कम, मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्काराचे पहिले मानकरी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना कालच हा पुरस्कार एका भव्य कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला आहे.

एखादा शिक्षक, प्राध्यापक खऱ्या अर्थाने विद्यार्थी कसे घडवू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुरी सर होत.
देशाला, जगाला आज अशा लाखो पुरी सरांची गरज आहे. सर, तुमची आमच्यावर असलेली छत्रछाया अशीच कायम असू द्या.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484808