नटण्या मुरडण्याची स्त्रीला भारी हौस…. पण मराठी भाषेलाही सजविल्याशिवाय तिचे सौंदर्य वाढत नाही ! अलंकारांनी सजून मिरवण्ं हा दोघींचाही जन्मसिद्ध हक्क आहे, स्त्रियांचा दागिने घालुन साज शृंगार पुर्ण होतो, तर मराठी भाषेला मात्रांनी सजवून शृंगारित केल्या जातं !
दोघींचंही नटण्ं लाजवाब…
दोघींनाही साज शृंगार आवडतो…
अलंकारीत केल्याशिवाय दोघींचाही डौल वाढत नाही.. जितकं नटवाल तेव्हढ़ देखणेपण वाढत जातं दोघींचं…
दोघी कोण…
एक स्त्री…
दुसरी मराठी भाषा…
पहिला शृंगार कुंकवापासून…
स्त्रीच्या भाळीचं कुंकू,
शब्दावरचा अनुस्वार जणु !
मानेच्या लाडीक लटके झटक्यांवर डोलणारे झुमके…
जसे प्रश्नचिन्ह ते झुलणारे !
गळसरी ज्या मनीच्या गुजगोष्टी जाणते…
चंद्रकोर जणु विराजते !
कमनिय या कमरेवरती ठुमकणारा छल्ला…
म्हणजे जणु…उदगारवाचक नखरा !
सोज्वळ त्या चेहर्याला महिरप डोईवरच्या पदराची…
तशीच शोभा वेलांटीला शालिनतेची जोड !
रुणझुण करती पैंजण पायी कोमल…
छुमछुमणारे घुंगरू उकारांचे !
जेंव्हा तिच्या बटांना छेडतो मुजोर वारा…
भासे तसेच अवतरण चिन्ह शब्दांच्या भाळावरती रुळतांना !
नासिका ही सरळ नथ ही शोभे राजस…
भासे तिथे स्वल्पविराम जणु !
गोड खळीला तीळ साजिरा…
दिसे पुर्णविराम हा !
अशाप्रकारे… स्त्रीचा दागिने घालुन…
मराठी भाषेचा दागिने लेऊन…
पुर्ण झाला साजशृंगार…
ही एक अनोखी कला आहे… दोघींनाही मिळालेलं दैवी दान आहे…
जितकं सजवाल… तितकं खुलतं…
अर्थपूर्ण…नखशिखांत !!
— लेखन : राजश्री वटे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800