Saturday, April 13, 2024
Homeसाहित्यलोककवी मनमोहन

लोककवी मनमोहन

“शव कवीचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतची होता”

“फुले त्यावरी उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतची होता”
असे म्हणणारे बंडखोर कवी आणि उत्कट भावगीतकार म्हणून अजरामर झालेल्या लोककवी यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी माणगाव जि.कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण, तळेगाव अशा भिन्न भिन्न ठिकाणी झाले. मराठी, संस्कृत, इंग्रजी, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांतील साहित्याचे त्यांनी सखोल वाचन केले.

त्यांना लोककवी म्हणून जरी ओळखले जात होते तरी त्यांनी इतर साहित्य निर्मिती सुध्दा केली आहे़. ‘टिपरी पडघमवर पडली ‘ , अभिलाषा , आनंदघन , इंद्रधनुष्याची गोष्ट , कड्यावरून कोसळलेली कामिनी , गुरुजींची आत्महत्या झपूर्झा , ह्या सामाजिक विषयांवर कादंबऱ्या लिहिल्या. त्याच प्रमाणे इंद्रायणी, चिमाजीअप्पा , चंद्रभागा , छत्रपती भाग १ ते ४  , छत्रपती राजाराम , छत्रपती शाहू महाराज , छत्रपती संभाजी , पहिला पेशवा इत्यादी तीस ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ‘थांबा थोडं दामटा घोडं ‘ आणि ‘दोन रणांगण’ हया नाटकांचे लेखन केले.

त्यांना क्रिकेटचे खूप वेड होते.त्यांनी क्रिकेट विषयक विपुल लेखन केले. डॉन ब्रॅडमन , सी.के.नायडू यांची चरित्रे लिहिली.

 मनमोहन यांनी इतर विपुल साहित्य निर्मिती केली असली तरी कविता हा त्यांचा श्वास आहे़ असे ते म्हणत. श्वास हा हौसेसाठी नसतो तर तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे़ असे ते म्हणत. ‘ताई तेलिण’ हा मनमोहन यांनी लिहिलेला ६३ ओळींचा पोवाडा १९२६ साली खूप लोकप्रिय ठरला. सुनीतगंगा , कॉलेजियन , उध्दार ,अफूच्या गोळ्या , युगायुगांचे सहप्रवाशी , शिवशिल्पांजली हे त्यांचे काव्यसंग्रह लोकप्रिय आहेत.   

” युगायुगांचे सहप्रवासी ” या काव्याचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे ह्यांनी केला आहे़. मनमोहन यांच्या निवडक कवितांचे संकलन केलेला “आदित्य ” हा कविता संग्रह शंकर वैद्य यांनी १९७१ साली प्रकाशित केला.

मनमोहन यांची प्रारंभीची कविता कथाकाव्यात्मक व सामाजिक आशय व्यक्त करणारी असून त्यात विनोद , विडंबन आणि उपहास ह्यांचा मार्मिक वापर केला आहे़. १९४७ नंतर ते भावकवितेकडे वळले आणि आटोपशीर बांधेसूद अशी रचना त्यांनी केली. ‘राधे तुझा सैल अंबाडा ‘ , ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला ‘ , ‘ बापूजींची प्राणज्योती….’ या त्यांच्या अजरामर रचना ठरल्या.

‘युगायुगांचे सहप्रवासी’ या त्यांच्या उल्लेखनीय काव्यात मुंबईतील हिंदू – मुसलमान यांच्या दंग्यातील भीषण नाट्य टिपण्याचा प्रयत्न केला आहे़.

त्याकाळात ‘राजकवी’ अनेक होते.त्यापैकी अनेकजण ज्येष्ठ असले तरी श्रेष्ठ नव्हते. त्यांच्यावर टीका करतांना मनमोहन  म्हणत ” श्रेष्ठ कवी जन्माला याया – मराठीचे गर्भाशय कोते ” . कवींनी आपले स्वत्व आणि स्वातंत्र्य जपले पाहिजे अशी श्रध्दा ते जहालपणे व्यक्त करीत.

साहित्यबाह्य कारणांनी मनमोहन यांच्या वाटेला वारंवार  आलेली उपेक्षा अन अवहेलना याने त्रासून ते भावी पिढीला संदेश देतांना म्हणत…….
“सदुसष्ट जन्माचे पाप माझे फेडले मी ‘कवी ‘ इथे होऊन 

ना मान ! ना धन ! ना लौकीक ! मुलांनो कवी नका होऊ “

गोपाळ नरहर नातू म्हणजेच लोककवी मनमोहन ह्यांनी विपुल लेखन करूनही त्यांना कोणताही विशेष  सन्मान मिळाला नसला तरी अनेक मान्यवरांनी त्यांना “लोककवी” ही दिलेली पदवी महत्वाची वाटत होती.

जयवंत दळवी मनमोहन यांचे वर्णन करतांना ‘चंद्र – सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस म्हणत असत. अशा या लोककवी मनमोहन यांचे  ७ मे १९९१ रोजी निधन झाले.

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड 
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800 

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लोककवी मनमोहन नातू यांच्यावरील दिलीप गडकरी यांचा लेख माहितीपूर्ण आहे. मी मनमोहन यांना भेटलो आहे. अतिशय बुद्धिमान पण काहीसं विक्षिप्त असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं! त्यांच्या स्वभावातलं एक वैशिष्ट्य म्हणजे ते म. गांधी आणि स्वा. सावरकर या दोन धृवांवर सारखंच प्रेम करीत. लोककवी मनमोहन नातू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! – मधु नेने, वाई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments