या रक्ताच्या थारोळ्यातून
लोकशाही हसते आहे
शासनकर्त्या बेशरमाना
सवाल काही पुसते आहे
स्वतंत्र झालो असलो तरीही
मुजोर सत्ता तशीच आहे
अवती भवती चिखल घाणीचा
फक्त विकृती दिसते आहे
कुबेर झाले गल्लोगल्ली
नेते बघता बघता
सावकारी ची प्रवृत्ती
या देशातून पाझरते आहे

कर्म दरिद्री आम्हीच जनता
यांना निवडून देतो
तोच पुढारी रक्त शोषूनी
ढेकर देतो आहे!!
गेले इंग्रज नवीन आले
राजे अन् महाराजे
मस्तवाल दरबार महाली
मदिरा वाहते आहे!
अजून शोषण थांबत नाही
जात पातीच्या पडद्यामागे
संविधान ही गेले विसरून
हुकूम शाही फुलते आहे
आपण चुकतो निवडून देतो
नालायक नेत्यांना या
त्यांना कळते दुबळेपण ते
म्हणून त्यांचे फळते आहे !

— रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800