मुंबई लोहमार्ग आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या “वाचू आनंदे” उपक्रमांतर्गत नवोन्मेष व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प ज्येष्ठ निवेदिका तसेच लेखिका श्रीमती मंगला खाडिलकर यांनी नुकतेच गुंफले.
व्याख्यानमालेची सुरुवात प्रमुख व्याख्याता श्रीमती मंगला खाडिलकर, आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, उपायुक्त डॉ.संदीप भाजीभाकरे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र रानमाळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
‘वाचू आनंदे’ कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती तसेच संपूर्ण आयुक्तालयात केवळ एक वर्षाच्या कालावधीत अंतर्बाह्य झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संभाजी निकम यांनी प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.रवींद्र शिसवे यांनी श्रीमती मंगला खाडिलकर यांचे पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. तर मंगला खाडिलकर यांनी स्वलिखित “एक मनोहर कथा” हे स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे चरित्र पर पुस्तक डॉ. रवींद्र शिसवे यांना भेट दिले.
श्रीमती मंगला खाडिलकर यांनी आपल्या अमोघ वाणीतून सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांना तब्बल दोन तासाच्या व्याख्यानातून मंत्रमुग्ध केले. त्यांच्या ओघावत्या शैलीत त्यांनी वाचन संस्कृती, त्याचे महत्त्व तसेच माणूस म्हणून जगण्याचा कानमंत्र विविध दाखले देऊन दिला.
एक माणूस म्हणून जाणीवा समृद्ध होण्यासाठी तसेच माणूस म्हणून मनाची मशागत करण्यासाठी पुस्तकं निश्चितच मदत करतात हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच निवेदन क्षेत्रात काम करतांना आलेले अनुभव त्यांनी सर्वांसमोर जिवंत केले. या क्षेत्रामुळे सातत्याने वाचनाची सवय लागली तसेच त्यामुळे माणसं वाचायला शिकले हे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपायुक्त डॉ.संदीप भाजीभाकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
नवोन्मेष व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पातून वसंतोत्सव साजरा झाल्याच्या भावना सर्वांच्या मनात होत्या.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800