“वक्तृत्व हे व्यक्तिमत्व घडविण्याचे विलोभनीय माध्यम आहे. श्रोत्यांच्या शैक्षणिक व सामाजिक दर्जानुसार व वयाप्रमाणे कुशल वक्त्याला आपली भाषा वापरून श्रोत्यांची नस पकडता आली पाहिजे.” अशी मौलिक माहिती आसमंत व्हाईस अकॅडमीच्या संचालिका व आकाशवाणी निवेदिका तथा व्हाईसक्वीन पौर्णिमा शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्थेच्या विशेष सहकार्याने डी.डी. विसपुते डी.एड. कॉलेज व अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विचुंबे येथील डी.डी.विसपूते विद्यासंकुल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आलिशान सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,” वक्तृत्वकला सर्व समारंभासाठी आवश्यक असते. चांगल्या वक्तृत्वासाठी विषयानुरूप पुस्तकांचे वाचन, श्रवण व अवलोकन गरजेचे आहे. भाषणाचा प्रारंभ आकर्षक झाला पाहिजे. चपखल काव्याच्या ओळीने किंवा सुभाषिताने भाषणाची सुरुवात करावी. वक्त्याची देहबोली, नेत्रकटाक्ष व हालचाल विषयानुरूप असावी. भाषण मुद्देसूद असावे. मुद्दे एका मागून एक उलगडून सादर करावेत.” भाषणाच्या तयारीविषयी त्यांनी खास मार्गदर्शन केले. आवाजासाठी त्यांनी जिभेचे निरनिराळे व्यायाम सांगितले. ते श्रोत्यांकडून करून घेतले. घसा मोकळा राहावा, यासाठी त्यांनी गरम पाणी, खडीसाखर, लवंग, तुळशी काढा सारख्या औषधी सुचवल्या. आहारा मध्ये तेलकट तुपकट पदार्थाचा वापर कमी करण्याविषयी सुचविले. भाषणाची सुरुवात करताना माइक कसा व किती अंतरावर धरावा, ताठ कसे उभे राहावे, हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. शब्दोच्चार स्पष्ट असावेत. त्यात आवश्यकतेनुसार चढ-उतार करावेत. शब्दांना नाद, गती व लय असावी हे सांगितले. च-च ज- ज यांच्या उच्चारातील फरक सांगितला. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी भ्रामरी व ओंकार हे व्यायाम सुचवले. वक्त्याने निर्व्यसनी असावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
भाषणाच्या प्रात्यक्षिकांमध्ये मोहिनी जाधव, चैताली पाटील, वर्षा गोडसे व अस्मिता चौधरी यांनी समरसून भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेचे सर्वेसर्वा व सदरहु कार्यशाळेची संकल्पना साकारणारे एन.डी. खान यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी अस्खलितपणे केले.
वक्त्यांचा परिचय सौ. कुसुम मधाळे यांनी मधाळ शब्दात करून दिला.
कार्यक्रमाला आदर्श ट्रेनिंग टीचर्स स्कूलच्या प्राचार्य सौ.जाई जगताप, सौ. छाया अक्कलकोटे, सौ. सरिता कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मनीषा म्हात्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छान छायाचित्रण केले.
मयुर याने ध्वनी संयोजनाची जबाबदारी लीलया पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. सलमा खान, सौ. मीना ताकमोगे, राजकुमार ताकमोगे व रमेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
पंकज पाटील यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने या मधुर कार्यक्रमाची सांगता झाली.
सदरहू कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात डी.एड., नर्सिंग व आदर्श ट्रेनिंग स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800