येतो वळीव सुखद
भिजे भुईचाही कस
धुंद मृदगंध मोहक
फुले धरतीची कूस
रुजे बीज भुईपोटी
माती मोहक गर्भार
पाना फुलांचा डोईस
जडे तो केश संभार
बीज अंकुरता ओले
फुले मातीही हिरवी
बीज फुलारून येता
तिचे आर्जव लाघवी
येता उधाणता वारा
डुले धरेचा पदर
बीज अबोध हासता
तिचे सुखावे अंबर।

— रचना : अनुपमा मुंजे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800