Saturday, October 5, 2024
Homeलेखवातावरण बदलाचा भस्मासूर

वातावरण बदलाचा भस्मासूर

होय, भस्मासूरच ! आणि तोही साधासुधा नाही तर जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असा सर्वव्यापी, महाबलाढ्य असा आधुनिक भस्मासूर आहे. हवामानातील होत असलेल्या बदलांचा हा असूर आपल्या प्रत्येक श्वासातून, प्रत्येक घासातून अन् प्रत्येक घोटातून प्रत्येक मानवाच्या, पशू, पक्षी, कीटक, जीवजंतू व वनस्पतींच्या शरीरात प्रवेश करतो आहे आणि शरीराच्या एकेका पेशींना भस्मसात करण्याचं त्याचं काम अव्याहतपणे सुरू आहे. हवामानात झालेल्या व सतत होत असलेल्या बदलांमुळे फार भयानक परिणाम मानवी आणि सर्वंच सजीवांवर होत आहेत. हवामानातील होत असलेले बदल रोखणे, कमी करणे ही सध्या जगापुढे सर्वात मोठी गंभीर समस्या आहे.

आपल्या राजधानी दिल्लीत पार पडलेल्या जी-२० या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत हवामान बदलासंदर्भात अपारंपारिक उर्जा म्हणजे अक्षय उर्जा निर्माण क्षमता सन २०३० पर्यंत तिप्पट करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. (To tripple global renewable energy capacity by the year 2030). अशा या जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठीच्या ‘ ग्रीन क्लायमेट फंडाला ’ दोन अब्ज पौंड देणगी देत असल्याची घोषणा या परिषदेत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केली. जागतिक पातळीवर या विषयाचे गांभीर्य यातून अधोरेखित होते.

जागतिक स्तरावर हवामानातील बदलांच्या संकटाचा सामना केला जात असताना आपण प्रत्येक लहानथोर नागरिकाने या लढ्यातील आपली जबाबदारी पार पाडणे ही आजच्या काळाची गरज आहे. आपण प्रत्येकजण या संकटाचा सामना करण्यातील आपला खारीचा वाटा कसा उचलू शकतो याचे विवेचन करण्यासाठीच हा लेखनप्रपंच !

हवामान बदलांमध्ये जागतिक तापमानवाढ, समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ, पर्जन्यमानातील बदल, अंटार्क्टिका मध्ये वेगाने वितळत असलेले हिमनग, वितळणाऱ्या हिमनद्या, जमिनीची धूप आणि वनस्पतींमध्ये फुले व फळधारणेत होत असलेले बदल यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यावर्षी कोकणात बऱ्याच आंब्याच्या झाडांना पावसाळ्यात मोहोर आला व आंबेही लगडलेत, हे हवामान बदलाच्या परिणामाचं एक ताजं उदाहरण आहे.

हवामान बदलांमुळे होत असलेले हवा प्रदुषण, जल प्रदुषण, जमीन प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, थर्मल पावर प्लांट मधून होणारे प्रदुषण आणि किरणोत्सारी पदार्थांच्या वापरातून होणारे प्रदुषण हे सर्व सजीवांवर क्षणाक्षणाला आघात करीत आहेत.

या सर्व बदलांचा उहापोह करतांना प्रत्येकाच्या, प्रत्येक सजीवाच्या जीवनाशी निगडित असलेल्या वायू प्रदूषणाबाबत या लेखात सविस्तर माहिती घेऊ या. प्रत्येक सजीवाला जीवंत राहण्यासाठी हवेची गरज आहे. आपण प्रत्येक श्वासागणिक आत घेत असलेली हवा जर प्रदुषित, अशुद्ध असेल तर त्याचे आरोग्यावर फार मोठे दुष्परिणाम होतात. सध्या जगातील ९९ टक्के जनता दुषित हवेमध्ये राहते. अशा या भयानक वायुप्रदूषणामुळे जगातील सुमारे ऐंशी लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात.

वायुप्रदूषणाचा सगळ्यात मोठा फटका पाच वर्षे वयाखालील बालकांना बसतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६ मधील अंदाजानुसार जगात एका वर्षात सहा लाख बालकांचे मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे श्वसन संस्थेच्या आजारांनी झालेत. वायुप्रदूषणामुळे गरोदर मातांची वेळेआधी प्रसुती होते व कमी वजनाची बालके जन्माला येतात. वायुप्रदूषणामुळे बालकांच्या मेंदूच्या विकासावर, शारीरिक हालचालींवर परिणाम होतो, दमा सुरू होतो व बालवयातच कर्करोग होतो. दीर्घकाळ वायुप्रदुषित ठिकाणी राहिल्याने बालकांना भविष्यात मोठेपणी हृदयविकार उद्भवतात. घरात स्वयंपाकावेळी होणारा धूर आणि विडी, सिगारेटच्या धुरामुळेही बालकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वायुप्रदूषणामुळे बालकांच्या फुफ्फुसांच्या कार्यावर फार लवकर वाईट परिणाम होतो. जगातील पाच वर्षांखालील त्र्येसष्ठ कोटी बालके दर श्वासागणिक प्रदुषित हवेला सामोरे जात आहेत. गरीब देशातील ९८ टक्के बालकांना प्रदुषित हवेच्या संकटाचा सामना करावा लागतोय.

७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी “स्वच्छ हवा दिवस” म्हणून जगभर साजरा केला जातो. सन २०२३ मधील या जागतिक स्वच्छ हवा दिवसाचे घोषवाक्य “आपली हवा स्वच्छ करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज ’ हे होते. वायुप्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांची भीषणता लक्षात घेऊन स्वच्छ हवेचे महत्त्व आणि गरज यासाठी प्रत्येक व्यक्तिपासून ते जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी सन २०१९च्या संयुक्त राष्ट्र आमसभेत सात सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक स्वच्छ हवा दिवस म्हणून जगभर पाळावा असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार सन २०२० सप्टेंबरपासून स्वच्छ हवा दिवस म्हणून साजरा केला जातोय. यानिमित्ताने निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिवस हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी फक्त शासन व्यवस्थेवर जबाबदारी ढकलून चालणार नाही तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे.

प्रत्येक श्वासागणिक हवी असलेली स्वच्छ हवा आणि त्यातून शरीराच्या प्रत्येक पेशीला मिळणारा प्राणवायू प्रत्येक सजीवाच्या जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. कोविड (कोरोना) च्या जागतिक आपत्तीत कोविडच्या रुग्णांना वाचविण्यासाठी दर श्वासावाटे कृत्रिमरीत्या दिला जाणारा प्राणवायू आणि त्याची श्वासागणिक लागणारी किंमत आपण जवळून अनुभवली आहे. स्वच्छ हवा व त्यातील प्राणवायूचे योग्य प्रमाण यांची गरज विचारात घेता आपली हवा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि याचसाठी वायुप्रदूषणाबाबत माहिती सर्वसामान्यांपर्यंत, प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.

हवेचे प्रदुषण हे १) मानवनिर्मित आणि २) नैसर्गिक घटना अशा दोन प्रकारे होते. मानवनिर्मित प्रदुषण हे प्रामुख्याने इंधनावर चालणाऱी वाहने, औद्योगिक कारखाने, थर्मल पॉवर प्लांट, साफसफाई/स्वच्छतेसाठी वापरली जाणारी रासायनिक उत्पादने, किटकांना दूर पळविण्यासाठी वापरली जाणारी लिक्वीड/धूम्रकांडी तसेच रासायनिक खते व किटकनाशकांच्या अति वापरामुळे होते. दुसऱ्या प्रकारातील नैसर्गिक घटनांमध्ये जंगलात लागणाऱ्या आगी, ज्वालामुखींचे उद्रेक, सेन्द्रिय पदार्थांचे ज्वलन/बाष्पीभवन, नैसर्गिक किरणोत्सर्ग आणि वनस्पतींच्या फुलांमधील परागकणांचे हवेत मिसळणे ही नैसर्गिकरीत्या होणाऱ्या वायुप्रदूषणाची कारणे आहेत.

अशाप्रकारे घराबाहेर हवेत मिसळणारे प्रदुषक गॅसेस, सूक्ष्मधुलीकण आणि घरात निर्माण होणारी प्रदुषके यांचा एकत्रित परिणाम हवेवर होऊन हवा प्रदूषित होते. घरातील एअर कंडिशनर, एअरोसोल स्प्रे, रेफ्रिजरेटर, इंन्सुलेटर, विद्युत वितरण प्रणालीतील स्विचगिअर्स यामधून फ्लोरिनयुक्त वायू हवेत मिसळतो व त्यामुळे हवा प्रदूषित होते. कोळसा, इंधन तेलं व गॅसच्या ज्वलनामुळे, जंगलतोड, नायट्रोजनयुक्त खतांचा वापर, तसेच मोठ्या प्रमाणावरील पशुपालन यामधूनही कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रस आॉक्साईड हे विषारी वायू हवेत मिसळतात. स्वयंपाकासाठी जाळली जाणारी लाकडं, गोवऱ्या इत्यादींच्या ज्वलनातून निघणाऱ्या घरातील धुरामुळेही हवा प्रदूषित होते. रस्त्यावर/उघड्यावर जाळला जाणारा कचरा तसेच रस्ते व इमारती बांधकामावेळी हवेत मिसळणारी धूळ हेही वायुप्रदुषणास हातभार लावतात.

सन २०१९ च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालानुसार भारत हा सर्वात जास्त प्रदुषण असलेल्या दहा देशांमध्ये असल्याचे म्हटले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सन २०१७ च्या अहवालानुसार देशात सुमारे साडे अकरा लाख जणांचे अकाली मृत्यू हवा प्रदुषणामुळे एका वर्षात झाले. यावरून हवा प्रदुषणाची तीव्रता व ते रोखण्याची गरज अधोरेखित होते. जगातील आजार आणि अकाली होणारे मृत्यू यांस वायूप्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात कारणीभूत आहे.

डोळे व त्वचेची जळजळ होणे, डोकं दुखणे, सर्दी पडसे व खोकला, दम लागणे, श्वासोच्छ्वास करतांना छातीतून घरघर असा आवाज येणे, हातापायात अशक्तपणा आदी तात्कालिक लक्षणे वायुप्रदूषणामुळे दिसून येतात. बालकांमध्ये श्वसनसंस्थेचे तीव्र आजार प्रदूषित हवेमुळे उद्भवतात. घरातून होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे बालकांमध्ये श्वसनाचे आजार, प्रौढांमध्ये मेंदूचा झटका येणे, पक्षाघात/लुळेपणा, श्वासोच्छ्वास करण्यात सततचा अडथळा निर्माण करणारे फुफ्फुसांचे आजार, फुफ्फुसांचा कर्करोग या आजारांचे प्रमाण जास्त आहे. घराबाहेरील वायूप्रदूषण हे घरातील प्रदुषणापेक्षा हृदयविकाराचा झटका येण्यास जास्त कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. वायुप्रदुषणामुळे सुमारे पाच ते दहा वर्षांनी आयुष्य कमी होते.
वायुप्रदूषणामुळे शरीरावर होणारे काही परिणाम हे अल्प कालावधीसाठी तर बरेचसे दीर्घकाळ आणि काही तर आयुष्यभर आपणासोबत राहतात. कमी काळ टिकणाऱ्या दुष्परिणामांमध्ये मळमळ होणे, डोकेदुखी, अॅलर्जी, खोकला, दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, कातडी कोरडी पडणे, कमकुवत केस आणि चेहऱ्यावर/अंगावर पुरळ येणे या आजारांचा समावेश होतो.

वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांमध्ये

१) फुफ्फुसांचे दीर्घकालीन श्वसनास अडथळा निर्माण करणारे आजार, दमा, श्वसनासाठी दाह व कॅन्सर

२) पचनसंस्थेमध्ये, पोटाचा कॅन्सर आतड्यांच्या कॅन्सर, अपेंडिक्सचे आजार, आंत्रदआह इत्यादी.

३) मेंदूच्या बाबतीत पक्षाघात, मेंदुचा झटका ( Stroke ), विसरभोळेपणा, कमकुवत मानसिकता, पार्किन्सनचे आजार इ. ४) हृदयाचे संदर्भात – हृदयविकाराचा झटका येणे, उच्च रक्तदाब, असंतुलित ह्रदय स्पंदने, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे अशा मोठ्या व्याधींचा अंतर्भाव होतो. या व्यतिरिक्त यकृताचा कॅन्सर, सांध्यांचे आजार, रक्तक्षय, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे, रक्ताचा कॅन्सर, त्वचेचे आजार, मुत्रपिंड व मुत्राशयाचे कॅन्सर, हाडे कमकुवत होणे, मधुमेह, डोळ्यांचे आजार आणि लठ्ठपणा आदी दीर्घकालीन आजार प्रदूषित हवेमुळे होतात.

हवा प्रदुषणाचा विळखा हा नवजात अर्भकं, एक वर्षापेक्षा कमी वयाची बाळं, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, सफाई कामगार, ट्रॅफिक पोलिस, बांधकामांवरील मंजूर, धूळीच्या ठिकाणी काम करणारे, बालके आणि स्त्रिया यांच्यासाठी जास्त घातक आहे. त्यामुळे यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

हवेच्या गुणवत्तेची नोंद करण्यासाठी हवा गुणवत्ता निर्देशांक [Air Quality Index (AQI)] मोजला जातो. यामधून आपल्या सभोवतालची हवा किती स्वच्छ किंवा प्रदूषित आहे याचा बोध होतो. यामध्ये हवा प्रदूषित करणाऱ्या पाच मुख्य प्रदुषकांचा हवा गुणवत्ता निर्देशांक मोजताना समावेश केला जातो. यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच अतिसूक्ष्म धूलिकण, ओझोन, सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड व कार्बन मोनो आॉक्साईडचे हवेतील प्रमाण मोजले जाते. प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून या गुणवत्ता निर्देशांकाची देखरेख केली जाते. सध्या आपल्या सभोवतालच्या हवेची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी SAMEER, SAFAR, AIR ही अॅप्ससुद्धा उपलब्ध आहेत. या अॅप्सचा वापर करून आपण हवेची गुणवत्ता जाणून घेऊ शकतो.

स्वतःला हवा प्रदुषणापासून वाचविण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याचा उहापोह करणे फार आवश्यक आहे. हवा प्रदुषणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी १) फटाके, लाकूड, पालापाचोळा, शेतातील उत्पादने, कचरा पेटवू / जाळू नये. २) विडी, सिगारेट, हुक्का ओढणे टाळावे. ३) स्त्रिया, बालके व ज्येष्ठ नागरिक यांनी हवामान चांगले नसतांना घराबाहेर फिरणे व व्यायाम टाळावा. ४) खराब हवामानात विशेषतः सकाळी व संध्याकाळी दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. ५) जास्त रहदारी व वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर तसेच कारखान्यांच्या परिसरातील वावर टाळावा. ६) बाहेर हवामान खराब असल्यास शक्यतो घरातच थांबावे.७) फुफ्फुसांचे व हृदयांचे आजार असणाऱ्यांनी आपली औषधे स्वतःजवळ ठेवावीत. ८) धूर विरहित इंधनाचा (गॅस, वीज) स्वयंपाकासाठी वापर करावा. ९) फेसमास्क वापरतांना चांगल्या गुणवत्तेचे वापरावेत. १०) दम लागणे, चक्कर येणे, डोळे चुरचुरणे वा छातीत दुखत असल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ११) चष्मे/गाॉगल्स, एन-९५ मास्क, रस्पिरेटर आणि घरात/कार्यालयात एअर फिल्टरचा वापर करून देखील हवा प्रदुषणापासून बचाव करता येतो.

घराबाहेरील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी १) सोलार एनर्जी सारखे पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत वापरावेत. याचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवावा. २) हवा प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. ३) घरगुती कचरा, औद्योगिक कचरा व सांडपाणी, म्युनिसिपल क्षेत्रातील कचरा व सांडपाणी यांची योग्य विल्हेवाट व व्यवस्थापन हवा प्रदुषण कमी करण्यासाठी आवश्यक आहे. ४) विजेचा वापर कमीत कमी करणे व कमी वीज लागणाऱ्या उपकरणांचा वापर याकामी उपयुक्त आहे. ५) इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा कमीत कमी वापर व सार्वजनिक वाहनांचा पुरेपूर वापर केल्यास वायुप्रदूषण पातळी कमी होते. ६) इंधनातील भेसळ रोखून वायुप्रदूषण कमी करता येते. ७) झाडे लावणे आणि वाढविणे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. ८) फटाके फोडणे बंद करून प्रत्येकजण हवा प्रदुषणास आळा घालण्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडू शकतो. ८) जंगलतोड थांबविणे तसेच जंगलात लागणाऱ्या व लावल्या जाणाऱ्या आगींवर नियंत्रण आणून वायू प्रदूषण कमी करण्यास मोठा हातभार लावता येईल. ९) इमारती बांधतांना वा पाडतांना, पुलांचे बांधकाम करताना, पूल पाडतेवेळी हवेत धूळ मिसळू नये म्हणून त्याठिकाणी मोठ्या पडद्यांचा वापर करणे, पाण्याचे फवारे वापरणे उपयुक्त ठरते.

घराघरांतून होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी १) स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी वापरत असलेल्या शेगडीची, स्टोव्हची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे.२) घरातील स्टोव्ह, शेगडीतून निघणारा धूर घरात साठून राहणार नाही अशाप्रकारे रचना केल्यास घरातील हवा प्रदूषित होणार नाही. ३) घरात चुलीऐवजी गॅसचा वापर यासाठी उपयुक्त ठरतो. ४) घरगुती स्वच्छतेसाठी वापरातील उत्पादने, प्रसाधने ही त्यातून कमीत कमी वायू, धूप निघणारी असावीत. ५) घरात माॉस्क्युटो काॉईल, धूप, रूम फ्रेशनरचा वापर तसेच धूम्रपान करू नये. ६) बाहेर हवामान खराब असल्यास दारे खिडक्या बंद ठेवाव्यात.७) वातानुकूलित यंत्रणेऐवजी पंखे वापरावेत. ८) अंडरग्राऊंड पार्किंगची जागा हवेशीर राहील याची काळजी घ्यावी.

अशारीतीने प्रत्येक जण वायू प्रदुषण कमी करण्यासाठी आपला सहभाग देऊ शकतो. यासाठी सुरूवात प्रत्येकाने पहिल्यांदा स्वतःपासून करण्याची आवश्यकता आहे. वायुप्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्या, होणारे दुष्परिणाम व वायुप्रदूषण रोखण्यासाठी, कमी करण्यासाठी आपली जबाबदारी याबाबत इतरांना माहिती देऊन प्रत्येक जण जनजागृती करु शकतो. चला तर मग स्वच्छ हवेसाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करू अन् “प्रयत्ने रगडिता कण वाळूचे तेलही गळे’’ ही उक्ती सार्थ ठरवू या.

— लेखन : डॉ कारभारी खरात
निवृत्त सहायक संचालक, (आरोग्य) मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९