गांडूळ आपल्या शेतकऱ्यांचे मित्र आहेत याची कल्पना अगदी अलीकडे पर्यंत कुणालाच नव्हती. तसंच वाळवी आपल्या शेतकऱ्यांची उपकारकर्ती मित्र आहे याची जाणीव देखील कोणाला नव्हती.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना वाळवीचे महत्व जाणवले नव्हते की काय असे वाटते. कारण पिकांना वाळवी पासून संरक्षण करण्यासाठी जमिनीत वाळवी मारण्यासाठी विषारी औषध वापरण्याची शिफारस बरेच वेळा केली जात होती.वाळवी शेतकऱ्यांवर किती उपकार करते याचा अभ्यास महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कुठेही फारसा होत नव्हता.
वीस पंचवीस वर्षांपूर्वी अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिकणारे मनोहर खके मृदा विज्ञान हा विषय शिकायचे तेव्हा अभ्यासक्रमात वाळवीच्या उपयुक्ततेचा उल्लेख देखील होत नव्हता अशी आठवण ते सांगतात.
आपल्या स्वतःच्या अनुभवावरून मृदा संशोधक या नात्याने खके सरांनी प्रत्यक्ष शेती मध्ये विविध प्रयोग करीत शेतकरी बंधू /भगिनींना वाळवी चे महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. आता एखाद्या एकांड्या शिलेदारासारखे ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाळवी चे महत्व शेतातील प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून देतात. शेतकरी बांधव हळूहळू त्यांच्या ह्या मोहिमेत सहभागी व्हायला लागले आहेत. देशातील कृषी विद्यापीठात देखील वाळवी उधई, पांढऱ्या मुंग्या, दीमक, आणि termite अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कीटकांवर पीएचडी दर्जाचे संशोधन होऊ लागले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा वेबसाईट वर https://shodhganga.inflibnet.ac.in/ नोंदवलेल्या संशोधन प्रकल्पावरून हे आता लक्षात यायला लागले आहे.
अशा महत्त्वाच्या संशोधनाचे निष्कर्ष मात्र सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. याचे कारण ते इंग्रजी भाषेत असतात. जड बोजड असतात. हे सर्व ज्ञान शोधपत्रिकेतच रिसर्च जर्नल मध्येच असते. तुम्हा आम्हा सामान्य वाचकांपर्यंत मराठी (किंवा मातृभाषेत) ते प्रसिद्ध होत नाही. वर्तमानपत्रात तर अशा गोष्टींना जागाच नसते. हे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचतच नाही. त्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे वाळवी विषयी असलेले गैरसमज तसेच टिकून रहातात. इतकेच नव्हे तर ते वाढत जातात. याबरोबरच अंधश्रद्धा आणि अज्ञान वाढत राहते. विषारी नाग आणि बिनविषारी सर्प सुद्धा वाळवीच्या वारुळात वास्तव्याला असतात हा तसाच एक अंधश्रद्धेचा आणि अज्ञानाचा भाग.
ही अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्याचे जणू व्रतच खके सरांनी हाती घेतले आहे. याविषयी नंतर केव्हातरी सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली पाहिजे.
“वाळवी लागली” याचा अर्थ शहरातील इमारतीतील कपाटे, पुस्तके, कपडे, स्वेटर्स यांच्यावर आता हल्ला होणार आणि मोठे नुकसान होणार हे जाणून कीटकनाशकाचे फवारे मारणे आता आवश्यक झाले आहे असे समजले जाते. शहरातील हे अनुभव चुकीचे नाहीत. असे उपाय करणे भागच असते. परंतु शेतात मात्र वाळवी दिसली की आता शेतातील वाळलेली खोडं, फांद्या. काटक्या, ढलप्या या हळूहळू फस्त करत झाडांना जीवदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असते. हे शेतकऱ्याच्या दृष्टीने शुभ चिन्ह मानलं पाहिजे असा आग्रह मृदा अभ्यासक श्री खके धरायला सांगतात. राज्यातील कृषी प्रकल्पांना वाळवी मूळे जणू संजीवनी मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
त्यापैकी काही उदाहरणे येथे नमूद केली आहेत: मेळघाटातील फळबागेत आंबा कलमे आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतात एवढ्या मोठ्या आणि खोलवर गेलेल्या भेगा आहेत की माणसाचा पाय त्यात जाण्याची भीती असते. यावर ऊपाय काय ? तर शेतातल्या काटक्या, वाळलेल्या फांद्या, पाला पाचोळा या भागावर पसरवून ठेवा. मल्चिंग करा असा सल्ला खके सर देतात. जमिनीत आर्द्रता टिकून राहण्यासाठी याची मदत होते. ओल खोलवर जाते. वाळवी येते तेव्हा ती हळूहळू वाळलेलं लाकूड, ढलप्या फस्त करायला लागते. वरचा पापुद्रा खाल्ला की खोडाचा/ फांदीचा ताजातवाना भाग दिसू लागेल. मूळ झाडाला संजीवनी मिळू लागली आहे असा त्याचा अर्थ आहे.
ऑस्ट्रेलिया, पश्चिम आफ्रिका, थायलंड, लेगोस आदी देशात नुकसानकारक वाळवी आणि उपकारक वाळवी यांची तुलना करण्याचे काम अग्रोनोमी एग्रीकल्चर पेस्ट कंट्रोल अशा विविध अंगानी संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.
स्वतः खके सर आपल्या व्यक्तिगत पातळीवर तसेच नैसर्गिक शेतीच्या ग्रुप वर प्रश्नोत्तरे, लेख, फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून वाळवी कसे काम करते हे शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करीत आहेत. वाळवी वाळलेल्या लाकडाला खात खात हळूहळू जमिनीमध्ये खोलवर प्रवास करत पाण्यासाठी वाट निर्माण करते. पावसा पाण्याच्या दिवसात त्यामुळे तिला आणखी खाली जाता येते. पिकांना त्यामुळे जगता येते. झाडांच्या मुळाच्या खोलवर जाता येते असे निष्कर्ष आता कृषी वैज्ञानिक काढू लागले आहेत.
पश्चिम आफ्रिका आणि झांबिया या देशांमध्ये मुंग्या आणि वाळवी यांच्या वाटचालीमुळे शेताच्या मातीचा वरचा थर अधिक उत्पादनक्षम आणि उपयुक्त होतो असे अनुभवाला आले आहे. या कीटकांच्या लाळेमुळे आणि विष्ठेमुळे शेत जमीन अधिक समृद्ध होते असे निष्कर्ष प्रयोगाद्वारे काढण्याचे आता प्रसिद्ध झाले आहे. वाळवीच्या वारुळाची माती मुद्दाम जाणीवपूर्वक पिकांची पेरणी करण्यापूर्वी शेतकरी करू लागले आहेत. गव्हाच्या अशा शेतीच्या उत्पन्नात 36 टक्क्यांनी वाढ झाली असे जाहीर झाले आहे.
पिकाची पेरणी करण्यापूर्वी आपल्या शेतावर लाकडी फळकुट पसरवून वाळवी ला आकर्षित करण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. चांगली कष्टपुष्ट वाळवी मुद्दाम गोळा करून आपल्या शेतातील तळ्यात टाकली जाते. ते माशांना खाद्य म्हणून उपयुक्त ठरते असेही अनुभव इंटरनेटच्या विश्वात वाचायला मिळतात.
आपल्याकडे वाळवीचे असे उपयोग अद्याप होत नाही. तसा कोणी विचार केल्याचेही ऐकिवात नाही. उलट “वाळवी लागली” असे काही ऐकले तर शेतकरी सुद्धा विषारी कीटकनाशके आणून फवारून या निष्पाप मित्राची हत्या मात्र करीत असतात, हे वास्तव आहे.
अशा पार्श्वभूमीवर खके सरांनी याविषयीचे प्रयोग किती वर्षांपूर्वी केले याची दखल घेतली पाहिजे. विदर्भातील मेळघाट या दुर्गम आदिवासी क्षेत्रात सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी हे प्रयोग यशस्वी केले होते. आज आदिवासी स्त्री पुरुषांचे आणि बालकांचे कुपोषण टाळायचे असल्यास त्यांना प्रथम स्थानिक भाजीपाला आणि फळ फळावळ लावायला शिकवले पाहिजे. त्याच्यावरच त्यांचे पोट भरले पाहिजे म्हणजे कुपोषणाची समस्या राहणार नाही या भूमिकेचा ते पुरस्कार करतात. त्याचे उत्तम परिणाम दिसून आले . परंतु शासकीय किंवा अ- शासकीय पातळीवर अशा गोष्टी उपेक्षित राहतात. तसेच याबाबतीतही घडले असे खके सर सांगतात.
जळगाव भागातील केळीचे उत्पन्न काढणारे श्री जयस्वाल यांनीही आपल्या केळीच्या बागेत वाळू लागलेल्या केळीच्या खांबाला वाळवी खाऊ लागली आहे हे पाहिल्यावर ही आनंदाची बातमी सरांना मुद्दाम फोन करून कळवली. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्या मोबाईल वरच्या व्हिडिओ वरून चित्रण करून ठेवले. वाळवी ने नुकसान तर केले नाहीच परंतु आपल्या केळीला नवे जीवन कसे दिले हे ते आता आपल्या मित्र परिवारा ला दाखवू लागले आहेत;
‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’ या उक्तीप्रमाणे हळूहळू ज्ञान पसरत चालले आहे.
— लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800