मराठी विज्ञान परिषदेचे ५८ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन नवी मुंबई येथे ९ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान साहित्य मंदिर वाशी येथे थाटामाटात पार पडले.
हे अधिवेशन मराठी साहित्य,संस्कुती व कला मंडळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
अधिवेशनाचे अध्यक्ष , प्राज इंडस्ट्रीज,पुणे चे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी हे तर उद्घाटक नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त श्री राजेश नार्वेकर होते.मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी हे स्वागताध्यक्ष होते.
डॉ चौधरी यांनी आपल्या भाषणात बदलत्या हवामानाचा वेध घेऊन त्यानुसार संशोधन होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.तर श्री नार्वेकर यांनी महा पालिकेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन नवी मुंबई शहर देशात सर्व प्रथम येण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

उद्घाटनपर समारंभात जीवन गौरव पुरस्कार आणि प्रा.मनमोहन शर्मा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जीवन गौरव पुरस्कार खगोल शास्त्रज्ञ डॉ सोमक रॉय चौधरी, कॅन्सर संशोधक डॉ राजेंद्र बडवे यांना तर संशोधन कार्यासाठी देण्यात येणारा प्रा.मनमोहन शर्मा पुरस्कार डॉ तुकाराम डोंगळे, प्रा अनंत कापडी, डॉ किर्तिकुमार बडगुजर, डॉ पुष्पिंदर कौर गुप्ता भाटिया, डॉ वंदना निकम, डॉ जयप्रकाश संगशेट्टी यांना प्रदान करण्यात आले. श्रीमती मृणालिनी साठे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

दुपारच्या सत्रात डॉ सोमक रॉय चौधरी यांनी खगोल शास्त्राचे विविध पैलू उलगडून दाखवले तर उद्योग आणि पर्यावरण परिसंवादात सर्वश्री डॉ एम पी देशपांडे,डॉ विजय हब्बु, केदारनाथराव घोरपडे यांनी सहभाग घेतला.या परिसंवादाचे अध्यक्षस्थान श्री एम एम ब्रह्मे यांनी भूषविले. या नंतर प्रा मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी वार्तालाप कार्यक्रम झाला.
सायंकाळ च्या सत्रात डॉ मानस मांजरेकर यांचे कांदळवन जैव विविधता या विषयावर व्याख्यान झाले.तर प्रा सुधीर पानसे यांनी विज्ञान कविता सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी, सकाळच्या सत्रात कॅन्सर संशोधक डॉ राजेंद्र बडवे यांनी कॅन्सर विषयक सांगोपांग माहिती देऊन महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे, याकडे लक्ष वेधले.तर घन कचरा व्यवस्थापन परिसंवादात उद्योजक डॉ पुनम हुद्दार, स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा वृषाली मगदूम आणि नवी मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त डॉ बाबासाहेब राजळे यांनी आपापल्या कार्याची माहिती दिली. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान पद्मश्री डॉ शरद काळे यांनी भूषविले.
दुपारच्या सत्रात विंचवाच्या विषावरील लसीचे संशोधन करणारे पद्मश्री डॉ हिम्मतराव बाविस्कर यांनी त्यांच्या शैलीदार व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकली.

सायंकाळच्या सत्रात उद्योग आणि ऊर्जा या विषयावर महाराष्ट्र शासन प्राधिकृत महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ दिपक कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर झालेल्या खुल्या अधिवेशनात पुढील अधिवेशनाचे निमंत्रण नवीन नांदेड शाखेने दिले. ते स्वीकारण्यात आले. तसेच एक विज्ञान एकांकिका सादर करण्यात आली. तसेच अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
अधिवेशनाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी आलेल्या प्रतिनिधींची सागरी जैव विविधता केंद्र, फ्लेमिंगो दर्शन आणि निसर्ग उद्यान केंद्र येथे अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती.
एकंदरीतच हे ३ दिवसांचे विज्ञान अधिवेशन उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील असे झाले. हे संपुर्ण अधिवेशन आपण खालील लिंक वर पाहू शकता….

— लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800