Friday, December 6, 2024
Homeसाहित्यविठ्ठल रचना

विठ्ठल रचना

आज आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने विविध कवी, गीतकार यांच्या रचना पुढे देत आहे. आषाढी एकादशी च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

१. पुंडलिकाच्या भेटीसाठी

आषाढाच्या हृदयामधले
ओले अत्तर घेतो पाऊस

क्षितिजावरच्या नील पटावर
अभंग कातर लिहितो पाऊस

वाऱ्यावरती पडघम येती
गजर पुकारित झरतो पाऊस

मेघांमधल्या पखवाजाच्या
तालावरती डुलतो पाऊस

भीमथडीच्या काठावरती
पहा कसा डुचमळतो पाऊस

पुंडलिकाच्या भेटीसाठी
विठ्ठल विठ्ठल गातो पाऊस

— अशोक बागवे

२. पांडुरंगी लीन

घडलीही नाही, आषाढीची वारी
अवयवदान वारी, नित्य मनी.

मृत्यूच्या नंतरी, पांडुरंगा घरी
देह लोभ तरी, नको फुका.

मृत्यच्या नंतरी, देह होई माती
स्थिर करू मति, देहांगदानी.

जाहले हे मन, पांडुरंगी लीन
अवयव दान, का न व्हावे ?

पाहू वाटे मूर्ती, मृत्यू न आडवे
नेत्रदान हवे, त्याच साठी.

वैद्यकीय शिक्षणी, पांडुरंग पाहू
आणि देह वाहू, त्याचे ठाई.

— सुनील देशपांडे.

३. “विमल-अचल”

विठ्ठलाचे रूप विराजे विमल-अचल
सर्वांना प्रिय लोभस निर्मळ मुख कमल IIधृII

कृष्ण रुक्मिणी शिव विष्णु असे सांप्रत
सर्व देव आहेत सामावलेले तुझ्यांत
सर्व संतांचे आहे मुख्य दैवत प्रेमळ II1II

पांढुर रंग दर्शवी शुद्ध सात्विक समाधान
तुळशीहार गळा कासे पितांबर लेऊन
विराजे कंठी कौस्तुभ मणी कानी कुंडल II2II

विटेवरी उभा कटेवरी ठेवून हात
अर्धोन्मिलीत नजरेनं भक्तांची वाट पहात
तव रूपाची आभा भेदातीत मंगल II3II

संतांनी रचले तव स्वरूपावर अभंग
शतकानु शतके वारकरी गाती अभंग
विश्वाचे दैवत किर्ती अगाध कृपाशील II4II

  • — अरुण गांगल. कर्जत- रायगड

४. विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विकल जाहलो
विसावेल मन
चरणी या

जन्मा घातलेसी
जगजेठी तूचि
जगीन आनंदे
तुज पायी

यामिनी अंधारी
याची नाही भीति
यात दिसे तव
तेजबिंदू

केली उधळण
केशर अबीर
केवढा दर्वळ
गजबजे

लगबग चाले
लहान महान
लय या वाद्यांची
अनुभवे

करा स्नान दान
करा पुण्यवाचन
कर कटावरी
पाहूनीया

रचिले अभंग
रटविले वेद
रसामृत पाजे
रमाधव

विषय विकार
जड डोईभार
यातना मिटवी
पांडुरंग (एकनाथ)

केली एकाग्रता
लक्ष्य एक आता
कमर कसून
रत मार्गी

— विजया केळकर. हैद्राबाद

५. साकडे

काळजाला काळजाची जोड दे रे विठ्ठला
माणसाला माणसाची ओढ दे रे विठ्ठला

दूर झाली माणसे विखरू नको देऊ कधी
माणसांना बांधणारी मोट दे रे विठ्ठला

खोल पोटाला उपाशी का रहावे लागते
पूर्ण नाही चंद्र मागत कोर दे रे विठ्ठला

चांगले वाईट समजे दे मला बुद्धी अशी
आवरू शकतो मना तो तोल दे रे विठ्ठला

अन्नदाता तूच अन भांडार सारे तूच तू
अन्न भरण्या सानुल्या ती चोच दे रे विठ्ठला

मित्र भारी भोवती पण एक नाही संकटी
संकटाला धावणारे दोन दे रे विठ्ठला

पाहवेना दुःख त्यांचे पावसाला धाड तू
त्या बळीलाही सुखाची झोप दे रे विठ्ठला

पाय दिधले ना तयांना चालती सांगा कसे
पांगळ्याला चालण्याला बोट दे रे विठ्ठला

भेदभावाचे कधी अस्तित्व ना राहो इथे
बंधुभावाचा खरा तू बोध दे रे विठ्ठला

राहती रस्त्यांवरी भरपूर येथे माणसे
आसऱ्याला एक त्यांना खोप दे रे विठ्ठला

दाखवेना मायबापा वॄद्ध आश्रम जी मुले
त्या मुलांना दोन हस्ते मोप दे रे विठ्ठला

काय वर्णू थोरवी माझे अडाणी शब्द ते
चाल लावायास वाणी गोड दे रे विठ्ठला

— प्रा. मोहन काळे. अकोला.

६. वारी चैत्यन्याची

वारकरी भक्ता। आस दर्शनाची।।
वारी चैतन्याची। पंढरीची ।।१।।

आषाढी कार्तिकी। भक्त गण भोळा।।
संत होती गोळा। जीवेभावें ।।२।।

हाती असे झेंडा।वारकरी उभा।।
चैतन्याचा। गाभा। पांडुरंग ।। ३।।

मन माझे धावे। पाहण्यास रूप।।
दाखवा स्वरूप। पांडुरंगा ।। ४।।

एक तरी वारी। जीवनात घडो।।
छंद जीवा जडो। दर्शनाचा ।। ५।।

भजनी रंगुनी। सोहळा बघावा।।
विठोबा पहावा। सुखासुखी ।।६।।

सांगते प्रतिभा। वारी चैतन्याची।।
शोभा पंढरीची। अनुपम ।।७।।

— प्रतिभा पिटके. अमरावती

७. …अभंग…. पांडुरंगा….

रूप तुझे भावे। शांती मना देई।
तुझे गुण गाई । अंतरात्मा ।।

नको मला काही ।फक्त पाठी देवा ।
तुझा हात हवा । आशिर्वादा ।।

घडो शुभ कार्य । सेवा छोटी मोठी ।
नको बुध्दी नाठी।जीवनात ।।

तुझी वारी भारी । मनी असे हाव।
घरी रमे जीव । कर्तव्यात ।।

नाही येता येत।मला अनवाणी ।
पूजा माझी मनी । गोड मान ।।

तुला द्याया नाही। धन,सोनं, काही ।
प्रेम, भक्ती माही ।देतो तुला ।।

  • — चित्रा मेहेंदळे. अमेरिका

८. पालखी

इंद्रायणी तिरी वैष्णवांचा मेळा |
दुमदुमली, अलंकापुरी |
निघे पालखी सोहळा
लागला टकळा पंढरीचा ||

हरीनामच्या गजरात तल्लीन पुणे |
माऊलीच्या सोहळ्यापुढे फिके मनभर सोने ||

सोपानकाका भेटी आली पालखी, सासवडी |
बंधूप्रेमाची रितच न्यारी ||

भंडारखोबरे उधळीत आली जेजुरी |
माऊलींच्या दर्शना आसुसला मल्हारी ||

वाल्हे, मुक्कामी वाल्मीकिंचे दर्शन |
माऊलींना झाली रामजन्माची आठवण ||

पादूकास्हानास नीरेत, भाविकांची गर्दी |
चंद्रभागेला गेली पालखीची वर्दी ||

टाळमृदंगाच्या गजरात आले लोनंद |
संतमंडीळीच्या उरात मावेना आनंद ||

हरीपाठाच्या ठेक्यात आले तरडगाव |
माऊलीचा अश्व घेई, उभ्या रिंगणात धाव ||

फलटण नगरीत पालखी विसावली |
प्रभूरामांच्या दर्शनाने संतमंडळी सुखावली ||

आषाढसरीत न्हाहत आले बरड |
पालखीसवे चाले साधुसंताचे वराड ||

पाऊले खेळतचं आले नातेपुते |
शंभूमहादेवाचे दर्शन घ्या शिखराचे ||

हसत खेळत आले माळशिरस |
आश्वासवे संतही धावती गोल रिंगणात ||

वेळापुरी दर्शन अर्धनारीनटेश्वर |
धावा दिसताची संत धावती दिसे पंढरपुर ||

आले भंडेशेगाव घ्या उभे रिंगण |
नजदिक आले विठुचे अंगण ||

वाखरी, मुक्कामी आला विठ्ठल समिप |
भेटीचा तो अनुप्यम्य सोहळा |

अवघा चराचर झाला एक ||
झाले जन्माचे सार्थक |
होता समचरणाची भेट ||

प्रत्येक जीवात्म्यात विठूराया |
तुझाचं रे व्हास तुझाचं व्हास ||
जन्मों जन्मी लाभो |

तुझ्या वारीची ही आस
तुझ्या वारिची हीच आस !!!

— आशा दळवी. दुधेबावी, सातारा

९. पंढरीची वारी

आषाढ सुरु होताच
आखाड सासरा येतो
जोरजोरात वा-यासंगे
पाणी बरसत राहतो

त्याच्या या आव्हानाला वारकरीही देतो साथ
विठ्ठल नामे गजरातच तो आनंदाने त्यात भिजतो

टाळ, मृदुंगाच्या गजरात
पायी मैलोमैल तुडविती
जागोजागी गावकरीही आनंदाने साथ देती

तुका, ज्ञाना, सोपान, मुक्ताई, नामदेवही करतो करणी
वारक-यांच्या पदयात्रेला संकटमोचन म्हणुनी वर्णी

शिस्तीमध्ये टाळ वाजती पाऊलेही थिरकती
विठूरायाच्या गजराने रिंगणात अश्र्व धावती

मनाने तर कधीच घेतली धाव पंढरपुरी
सुस्नात होऊनी ध्यान लावले चंद्रभागातीरी

कळस हालता झाली पहा हो त्यांची समाधी भंग
विठूरायाचे दर्शन होता, झाला आत्मानंद

विवेक, विचार, वैराग्य यांचा त्रिवेणी संगम वारकरी
संत ज्ञानोबांच्यानंतर म्हणती जय रामकृष्णहरी

वारकरी समुदायामध्ये नसे जातीपातीचा घोळ
भागवत सांप्रदायी असे हो विठ्ठलनामे कल्लोळ

आषाढवारीत भक्तीभावना असे सर्वांठायी
काम, क्रोध, मद, मत्सर विसरून रंगती विठूच्या पायी

  • – स्वाती दामले.

१०. सावळे परब्रह्म

झाली वैकुंठ पंढरी | क्षेत्र चंद्रभागे तीरी ||
सावळा बने श्रीहरी | उभा ठाके विटेवरी ||१||

क्षेत्र पावन भूवरी | विठुरायाची नगरी ||
त्रिखंडात तिच्या परी | नाही दुसरी पंढरी ||२||

अगा वैष्णवांच्या देवा | तुझ्या करूणेचा ठेवा ||
वाटे माहेर या जीवा | काय थाट म्या वर्णावा ||३||

भक्तांसाठी धाव घेशी | भक्तांच्या अधीन होशी ||
अभंग तारुन नेशी | भक्ती श्रेष्ठ अविनाशी ||४||

देई ऐसे वरदान | दूर सारावे अज्ञान ||
मिळविता आत्मज्ञान | शुद्धमती देई भान ||५||

आत्मबुद्धीसी सोडावे | भक्तीधन त्वा जोडावे||
सार्थक जन्माचे व्हावे | मुखी नाम सदा घ्यावे ||६||

— ज्योत्स्ना तानवडे. पुणे

११. वारकरी

जय हरी विठ्ठल -श्री विठ्ठल
आषाढी वारी निमित्ताने –
जाऊ चला हो पंढरपुरा ।।

व्हावे वारकरी पायी चालावे
आनंद मिळे केवळ आगळा
जाऊ चला हो पंढरपुरा
पाहण्या विठूराया सावळा ।।

घेउनी हाती पताका-गुढी
निघाला वारकऱ्यांचा मेळा
पाहण्या विठूराया सावळा ।।

वाट चालता हो पंढरीची
अष्टभाव मनी होती गोळा
पाहण्या विठूराया सावळा ।।

भजनी सारे तल्लीन होती
हातात त्या वीणा नि चिपळ्या .
स्मरती विठूराया सावळा ।।

होऊया वारकरी जन हो
जमवुया भक्त-गोतावळा
पाहण्या विठूराया सावळा ।।

व्हावे वारकरी पायी चालावे
आनंद मिळे केवळ आगळा
जाऊ चला हो पंढरपुरा
पाहण्या विठूराया सावळा ।।

जाऊ चला हो पंढरपुरा
पाहण्या विठूराया सावळा ।।

— अरुण वि. देशपांडे. पुणे

१२. विठ्ठल विठ्ठल

श्वास तू ध्यास तू
भास तू, आभास तू

ध्यान तू निधान तू
ज्ञान तू, परिमाण तू

कर्ता तू करविता तू
निर्माण तू निर्मिती तू

नाम तू हरिनाम तू
गजर तू जागर तू

मूर्त तू अमूर्त तू
भक्त मी भक्ती तू

माय तू बाप तू
लेक मी माऊली तू

साथ तू सहवास तू
संग मी सावली तू

नतमस्तक मी आशीर्वाद तू
प्रार्थना मी प्रसाद तू

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

— मीरा जोशी. नवीमुंबई

१३. आषाढी वारी

माऊली ची मी साधी सरळ वारकरी !!
नाही मी जाऊ शकतं माऊली
च्या वारी! !

दुःखी नाही मी मनी कारण
काही का असे ना त्या निमित्ताने
साक्षात माऊली आली माझ्या घरी !!

आम्ही माऊली चे दास
तिला हि माझ्या गळाभेटीची आस !!

नाही दिंडी; नाही फुगडी ; नाही रिंगण; नाही भारूड किर्तन टाळ मुदूंगाचा नाद ! !

वाहुन तुळशी पत्र लाऊन बुक्का
केली मी आरती केला घरीच
शंख व घंटीचा घंटानाद !!

अवतरली पंढरी घरीच
पांडुरंग हरी वासुदेव हरी
विठ्ठल विठ्ठल जय हरी
झाला नामघोष आणि
मनाच्या वीणेची छेडिली
मी तार! !

भाव भक्ती च्या टाळ मुदुंगा चा नाद
अवतरली पंढरी घरी जिथे तिथे
भासे मला माझ्या विठु माऊली चा
हा भास !!

नको देवा कसलाही वर्थ अहंकार फार !!
वृथा अभिमान फिरू नको देऊ माझ्या आसपास !!

सदैव देवा विठुराया राहु दे मला
तुझ्या चरणांना दास !!
देवयानी एकादशी आहे ही खास !!

सर्वाँना सुखी व निरोगी ठेव बा पांडुरंगा!
तुझ्या चरणी प्रार्थना आहे खास !!
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी 🙏
विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
देवा तुझी एकदा तरी
घडो पायी वारी 🙏
हिच आस आहे श्रीहरी
हिच आस आहे श्रीहरी 🚩

सौ.मंदा विजय शेटे. चेंबुर

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नमस्कार…..एकत्रित इतक्या कविता…वाचता-वाचता …
    मन रंगले-रंगले,पांडुरंगी लीन जाहले.
    जय हरी विठ्ठल-विठ्ठल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !