अमरावती येथील प्रतिष्ठित व प्रख्यात दैनिक हिंदुस्तान चे प्रबंध संपादक श्री विलासभाऊ मराठे यांच्यावर प्रतिभा पिटके
यांनी लिहिलेला “अजातशत्रू विलासभाऊ मराठे” हा लेख आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झाला. हा लेख वाचून जेष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांनी श्री विलासभाऊ मराठे यांच्यावर उस्फुर्तपणे लिहिलेला लेख पुढे देत आहे. श्री विलासभाऊ मराठे यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
– संपादक
काही व्यक्तिंशी आपली समोरासमोर भेट होत नाही, संवाद फारसा होत नाही, ती व्यक्ती आपल्यापासून दूर राहत असताना त्या व्यक्तिबद्दल आपल्या मनात एक प्रकारची आदराची, सन्मानाची भावना निर्माण होते ती तिच्या कार्यामुळे, शारीरिक हालचालींमधून दिसणाऱ्या विनम्रतेमुळे, सामाजिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानामुळे ! अशी एक व्यक्ती ज्यांना मी साधारणतः दीड-दोन वर्षांपासून ओळखतो ते वर्तमानपत्रातून, समाज माध्यमांतून आणि त्यांच्या तत्पर कार्यप्रणालीतून ! अमरावती येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक हिंदुस्थान या वर्तमानपत्राचे प्रबंधक संपादक श्री विलास मराठे ही ती व्यक्ती.
साधारण दोन वर्षांपूर्वी न्युज स्टोरी टूडे या वेबपोर्टलचे संपादक, सेवानिवृत्त माहिती संचालक आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ यांनी मला श्री मराठे यांचा संपर्क क्रमांक दिला. वास्तविक पाहता श्री विलासभाऊ ह्यांना मी तोपर्यंत ओळखत नव्हतो.
श्री भुजबळ सरांच्या सूचनेनुसार मी लेख पाठवायचा असे ठरवले परंतु श्री. भुजबळ सरांशी झालेल्या चर्चेतून विलासरावांचे कर्तृत्व पाहता आपले लेखन त्यांना आवडेल का नाही या विचाराने त्यांच्याशी चर्चा न करता एकेदिवशी सकाळी एक लेख त्यांच्या व्हाट्सअपवर पाठवला. त्याच रात्री अकराच्या सुमारास श्री विलासभाऊंनी दैनिक हिंदुस्थानची ऑनलाईन कॉपी पाठवली. साशंकतेने मी ती ओपन केली आणि संपादकीय पान उघडताच आश्चर्याचा धक्का बसला कारण माझा लेख चोवीस तासाच्या आत छापून माझ्या हातात आला होता.
दुसरे दिवशी सकाळी मी त्यांना फोन केला. तिकडून आलेल्या आवाजामुळे मी हरखून गेलो. धन्यवाद, आभार मानण्यासाठी फोन केला हेही विसरून गेलो. ‘लेख खूप छान लिहिला आहे. पाठवत चला…’ मोजक्या शब्दात केलेली स्तुती खूप काही देऊन गेली. तेव्हापासून मी श्री विलासभाऊ आणि हिंदुस्थानी परिवाराशी जोडला गेलो. आजवर मी दैनिक हिंदुस्थानसाठी लेख, पुस्तक परिचय लेख असे जवळपास तीस पेक्षा अधिक लेख पाठवले. सर्व लेख दुसऱ्याच दिवशी प्रकाशित होत आले आहेत. पुरस्कार, साहित्य चळवळ या संदर्भातील बातम्यांनाही अग्रक्रमाने स्थान मिळत गेले, मिळत आहे. जानेवारी २०२४ पासून दैनिक हिंदुस्थानमध्ये ‘भारतरत्नाचे मानकरी’ ही माझी लेखमाला दर गुरुवारी नियमितपणे सुरू आहे.
विलासरावांच्या स्वभावाचे मला त्यांना न भेटता जाणवलेले अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यांच्याकडे जी विनम्रता आहे ती अनुकरणीय, प्रेरणादायी आहे. सतत हसतमुख असणारे विलासरावांचे आईसाठी असलेले प्रेम पाहता अनेकदा गहिवरून येते. शिवाय भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिचे छायाचित्र समाज माध्यमांतून सर्वदूर पोहचविण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा हा छंद इतरांसाठी स्फूर्तिदायी ठरतो. खरेतर अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तिसाठी कोणताही पुरस्कार गौण असतो, परंतु गौरवाचा सन्मान अशा व्यक्तिंमुळे वृद्धिंगत होतो. नुकतेच श्री विलास मराठे ह्यांना एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता गौरव पुरस्कार आणि परिवर्तन प्रबोधिनी अमरावती या संस्थेचा परिवर्तन पुरस्कार ह्या दोन सन्मानाने गौरविण्यात आले आहे. आदरणीय मराठे ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
आदरणीय देवेंद्र भुजबळ सरांन या आदर्श व्यक्तिशी ओळख करून दिली, या बद्दल त्यांनाही धन्यवाद !
— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन: देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
श्री विलास मराठे यांचा प्रेमळ स्वभाव, कुणाही व्यक्तिला आपलसं करण्याची वृत्ती मी हिंदूस्थान कार्यालयाच्या भेटीत अनुभवली आहे. तेव्हा हिंदुस्थान कार्यालयात येणारे पाहुण्यांना चहा पाणी श्री मराठे यांच्या घरुन येत असे. पाण्याची तांब्या भांडं आणि चहाचा कप कुणी घरचा माणूस घेऊन येत असे. जेवणासाठी ही ते घरीच बोलवत. पुङ मी मुंबईत आल्यावरही मराठे कुटुंबियांनी स्नेह जपला होता.