काही परके शब्द, संकल्पना अशा असतात की, त्यांना आपल्या भाषेत नेमका समर्पक शब्द सापडणं खूप कठीण जातं.आता हेच बघा ना, मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकलला नेमका पर्यायी मराठी शब्द काय ? याचा विचारच करावा लागतो. लोकलला मुंबईची जीवनवाहिनी असं म्हणतात. परंतु लोकल म्हटलं की जे चित्र डोळ्यासमोर येतं, ते काही येत नाही. दररोज काही तासांची विश्रांती सोडल्यास, नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती सोडल्यास अक्षरशः ३६५ दिवस, अथकपणे मुंबईत लोकल धावत असते. मुंबईत मध्यरेल्वे, पश्चिमरेल्वे, आणि हार्बर असे लोकलचे ३ मार्ग आहेत.
भारतात ठाणे – बोरीबंदर अशी पहिली आग गाडी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्यामुळे दरवर्षी १६ एप्रिल हा रेल्वेदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या घटनेस दीडशे वर्षे झाली, त्या निमित्ताने ठाणे येथे १६ एप्रिल २००३ रोजी आयोजित कार्यक्रमास कोकण विभागाचा माहिती उपसंचालक म्हणून मी तर ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री सदाशिव कांबळे असे आम्ही चित्रीकरण पथकासह उपस्थित होतो.

आता या घटनेच्या आठवणीस कारणही तसंच आहे. पहिली विरार लोकल १२ एप्रिल, १८६७ रोजी धावली. या घटनेस १२ एप्रिल २०२५ रोजी १५८ वर्षे झालीत. सुरुवातीस एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची. सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.

या गाडीत महिलांसाठी दुसऱ्या श्रेणीचा वेगळा डबा होता. गम्मत म्हणजे धूम्रपानासाठी एक विशेष भागही असे. आता मात्र रेल्वेत धूम्रपान मना आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी !

त्याकाळी या गाडीत तीन श्रेणी होत्या. प्रवासी सामान्यत: दुसऱ्या श्रेणीस पसंती द्यायचे. प्रति मैलाचा दर किती होता, माहितीय ? ७ पैसे ! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. आज मुलांना १ पैसा हे नाणं होतं, हेच खरं वाटणार नाही !

त्यावेळी चर्चगेट ते विरार प्रवास आजच्या पेक्षा कमी वेळेत पूर्ण होत असे. आश्चर्य वाटतंय ना ? कारण ?
स्थानकांची संख्या कमी होती ! तेव्हा होती ती स्थानकं म्हणजे नीअल (नालासोपारा), बसीन (वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड !
लोकल हा शब्द १ फेब्रुवारी १८६५ रोजीच्या वेळापत्रकात पहिल्यानं वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द होता.
काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत ही गाडी झाली. पादचारी पूल झाले.
जगातली पहिली महिला विशेष गाडी पश्चिमरेल्वे वरच धावली.
मुंबईच्या वाढत्या विकासामुळे विरार पर्यंत धावणारी लोकल आता डहाणू पर्यंत धावतेय.

या विकासाचे ५६ वर्षांपासून प्रत्यक्षदर्शी असणारे माझे माहिती खात्यातील सहकारी, मित्र निरंजन राऊत हा सर्व प्रवास सांगताना आठवणीत छान रममाण झाले. मूळ बोर्डी रहिवासी निरंजन राऊत सांगू लागले, “पूर्वी आमच्या भागात उच्च शिक्षणाची सोय नव्हती. जवळचे महाविद्यालय म्हणजे मुंबईतील जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ किंवा पार्ले येथील पार्ले टिळक ! त्यामुळे चाकरमान्या प्रमाणे आम्हा विद्यार्थ्यांना या गाडीचा खूप उपयोग होत असे. गर्दी नसायचीच. सहज बसून प्रवास होत असे.

गाडीत जमलेली मैत्री, प्रवास हे एक वेगळं विश्व असायचं. घोलवड ते डहाणू व नंतर डहाणू ते चर्चगेट अशी दोन स्वतंत्र तिकीटं किंवा पास काढावा लागत असे. ही एक यातायातच असायची. दिवंगत मधु दण्डवते रेल्वे मंत्री असताना आम्ही ही कैफियत घेऊन त्यांना भेटलो. आश्चर्य म्हणजे आठ दिवसात आदेश निघाले. थेट तिकीट किंवा पास मिळू लागला. पुढे चर्चगेट ते डहाणू पर्यंत लोकल सुरू झाल्याने मोठीच सोय झाली.”
अशा या मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या विरार लोकलच्या पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800