भाग १ : डॉ. सुमित्राबाई वाघ
८ मार्च या महिला दिन निमित्ताने जाणून घेऊ या विलेपार्लेतील कर्तबगार स्त्रियांचा जीवन परिचय…
– संपादक
मुंबई महानगरातील “विलेपार्ले” एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध उपनगर आहे. विलेपार्ल्याला दीडशे वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे.
१९०६ मध्ये विलेपार्ले रेल्वे स्थानकाची स्थापना झाली. तेंव्हा रेल्वे कोळशावर चाले. नंतर जवळजवळ २५ वर्षांनी साधारण १९३० दरम्यान रेल्वेच्या उपनगर सेवेचे विद्युतीकरण झाले आणि रेल्वे विजेवर धावू लागली.
१९२१ मध्ये विलेपार्ल्याची लोकसंख्या फक्त सात हजार होती. १९३० नंतर लोकसंख्या झपाट्याने वाढली.
येथील जीवनशैलीवर उपनगरात राहणाऱ्या अनेक महिलांनी छाप सोडली आहे. येथील शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, इथली ग्रंथालये, वाचन संस्कृती, संगीत- नाट्य- कला संस्कृती यांनी समाजजीवन समृद्ध केले. विलेपार्ल्याच्या या जडण घडणीत गेल्या शंभर वर्षात सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाबरोबरच व्यक्ती आणि कुटुंब स्वास्थ्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक विद्वान विदुषींनी योगदान दिले. ज्या अनेक महिलांनी या विकासात सिंहाचा वाटा उचलला, त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन आजच्या पिढीला मिळालेला समृद्ध वारसा किती मोलाचा आहे याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने ही लेखमाला सादर करत आहे. पहिल्या विदुषीचा आज आपण परिचय करून घेत आहोत.
डॉ. सुमित्राबाई वाघ
विलेपार्ल्यातील जन्मदात्री – प्रसू . म्हणजेच बाळाला जन्म देण्यासाठी सहाय्य करणारी माता – प्रसुतितज्ञ महिला डॉ. सुमित्राबाई वाघ ! स्वातंत्र्यपूर्व काळापासून विलेपार्ल्यातील गरोदर महिलांची मसीहा !
सुमित्राबाईंचा जन्म १९०८ मध्ये घन:श्याम देसाई त्यांच्या गौड सारस्वत कुटुंबात झाला. सुमित्राबाईंचे बालपण कारवार मध्ये गेले कारण त्यांचे वडील कारवारचे मामलेदार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. पुढे निवृत्ती नंतर देसाई कुटुंब बेळगाव येथे स्थायिक झाले. त्या काळात मुलींचे शिक्षण ही काही आम बात नव्हती. परंतु सुमित्राबाईंचे वडील प्रागतिक विचारांचे होते, मुलींनी शिकावे, स्वावलंबी व्हावे असा त्यांचा आग्रह असे.
शालेय शिक्षणानंतर सुमित्राबाईंनी पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय पदवी संपादन केली. १९३० च्या सुमारास सुमित्राबाई विलेपार्ल्यात रहायला आल्या. विलेपार्ले तेंव्हा पंधरा हजार वस्तीचं एक लहानसं उपनगर होतं. नुकत्याच उपनगर रेल्वे गाड्या विजेवर धावू लागल्या होत्या. त्यामुळे हळू हळू लोकवस्ती वाढत होती. त्या काळात स्त्री प्रसुतितज्ञ मिळणं कठीण होतं.
सुमित्राबाईंनी पार्क रोडवर “किशोरी व्हिला“ या बंगल्याच्या तळमजल्यावर एक खोली भाडेतत्वावर घेतली आणि तेथे बाळंतपणासाठी एका लेबररूमची व्यवस्था करून प्रक्टिस सुरु केली. त्या काळात महिला नऊवारी साडी नेसत, सुमित्राबाई सुद्धा याला अपवाद नव्हत्या. त्यामुळे सामान्य महिलांनाही त्या पटकन आपल्याशा वाटत. मुळातच बुद्धिमान असल्याने त्यांना कानडी – कोंकणी – मराठी – गुजराथी – हिंदी – आणि इंग्रजी इतक्या भाषा अवगत होत्या. त्यामुळे विलेपार्ले पूर्व आणि पश्चिम उपनगरातील गरोदर स्त्रियांची प्रथम पसंती सुमित्राबाई असत.
ही सुरुवात म्हणजे आज “डॉ. सुमित्राबाई वाघ Maternity Hospital” म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोठ्या प्रसूतिगृहाची नीव होती. श्रद्धाशील वृत्तीच्या, मधुरभाषी असलेल्या सुमित्राबाईंचे नांव आणि काम लवकरच कर्णोपकर्णी झालं. त्यांचा दिवस विष्णूसहस्त्रनाम आणि मंगेशाच्या पूजेने सुरु होई. नियमित आणि शिस्तबद्ध व्यवहार, स्वाभिमानी, खंबीर, धोरणी आणि करारी वृत्तीच्या सुमित्राबाई एक अनुभवी आणि कुशल प्रसुतितज्ञ म्हणून लवकरच नावारूपास आल्या. दिवस भरल्यावर बाळाची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असा त्यांचं आग्रह असे. मात्र काही गुंतागुंतीच्या केसेस मध्ये मुंबईतील तत्कालीन नामवंत स्त्रीरोग शल्यचिकित्सक डॉ. पुरंदरे, डॉ. प्रधान, डॉ.शिरोडकर यापैकी कोणीतरी शस्त्रक्रियेसाठी येत असत.
१९३४-३५ दरम्यान सुमित्राबाईंनी जवळच असलेल्या धैर्यवान कुटुंबियांच्या धैर्य निवास बंगल्यातील तळमजल्यावर दोन मोठ्या खोल्या भाड्याने घेऊन प्रसुतीगृहाचा विस्तार केला.
एक काळ असा होता की एकाच वेळेस पंचवीस तीस गरोदर महिला प्रसूतीसाठी दाखल होत. पुढे पश्चिमेकडील स्थानिक महिलांसाठी त्या परिसरात सुमित्राबाईंनी प्रक्टिस सुरु केली. प्रसुतीनंतर बाळाला घरी घेऊन गेल्यावर त्या नवजात शिशुसाठी आणि ओल्या बाळंतीणीसाठी सुमित्राबाई स्वतः त्यांच्या घरी जाऊन तपासत असत. खूप तरुण वयांत त्यांनी स्वयंप्रेरणेने आणि दूरदृष्टीने अगदी एकहाती आपल्या व्यवसायात लक्षणीय प्रगती केली होती. शांत वृत्तीच्या, समंजस आणि प्रेमळ डॉक्टर म्हणून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये त्या लोकप्रिय होत्या. पार्ल्याच्या भाजी बाजारात तर अनेक महिला रस्त्यातच कृतज्ञ भावनेने त्यांच्या पाया पडत.
स्वातंत्र्यानंतर १९५० दरम्यान मुंबई उपनगरात विलेपार्ले-अंधेरी-जोगेश्वरी या तीन गावांची मिळून एक ग्रामपंचायत होती. लोकसंग्रहामुळे समाजाभिमुख असलेल्या सुमित्राबाई काही वर्षे या ग्रामपंचायतीत सदस्य होत्या. आज पार्क रोड वरील Maternity Hospital ची जागा त्यांनी १९५० साली खरेदी केली होती. आणि प्रसुतीगृहाला शिशुमंदिर असे नांव दिले होते. जुने पार्लेकर जे आज ८० ते ८५ वर्षे वयाचे आहेत त्यांचे जन्म याच शिशुमंदिरात झाले आहेत.
विलेपार्ल्याच्या समाजजीवनाला प्रभावित करणारी, आरोग्यसंपन्न करणारी ही कर्तृत्ववान अग्रणी विदुषी अल्पायुषी ठरली. अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी १ डिसेंबर १९६३ रोजी सुमित्राबाईंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन !
— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद,
आशाताई…!
सुमित्राताई वाघ यांच्या कार्याला अभिवादन…!