Tuesday, July 23, 2024
Homeयशकथाविलेपार्ल्यातील दीपशिखा

विलेपार्ल्यातील दीपशिखा

निर्मलाताई परांजपे : भाग २

विलेपार्ल्यातील बालकांच्या शिक्षणाबाबत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रमाबाई परांजपे बालमंदिराच्या जडण घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या निर्मलाताई परांजपे, पूर्वाश्रमीच्या सरोजिनी दाबके यांचे लग्न लहान वयात झाले आणि त्या परांजपे कुटुंबाच्या सुनबाई झाल्या. सासरे विष्णू बाळकृष्ण परांजपे विलेपार्ल्यातील प्रसिद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्व ! ते प्रागतिक विचारांचे होते. त्यांच्या सल्ल्यानुसार निर्मलाताईंनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्या एम.ए. झाल्या. त्यांची शिक्षणाबद्दलची आस्था बघून सासऱ्यांनी त्यांना पत्नी रमाबाई परांजपे यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या बालमंदिराच्या शैक्षणिक कार्यामध्ये लक्ष घालायला सांगितले आणि १९४८ पासून निर्मलताईंनी बालमंदिराला पूर्णपणे वाहून घेतले.

१९५४ साली बालमंदिरचा ट्रस्ट झाला. संस्था रजिस्टर झाली. आधुनिक विचारसारणीच्या निर्मलताईंची बालशिक्षणा विषयीची भूमिका वेगळी होती. इटलीच्या डॉ. मारिया मॉंटेसरी यांच्या पद्धतीनुसार लहान मुलांना दटावून-धमकावून किंवा मारून-मुटकून शिक्षा करून शिकवण्यापेक्षा हसत-खेळत सहज सुलभ शिक्षण साहित्य उपयोगात आणून शिकवले तर ती मुलें शिकवलेले सहज आत्मसात करतात. लहान मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी किंडर गार्टन पद्धतीची बालमंदिरे असावीत असा निर्मलाताईंचा मानस होता. “किंडर गार्टन” हा शब्द जर्मन भाषेतला. याचा शब्दशः अर्थ आहे “लहान बालकांची बाग” शिक्षण देण्याची ही वेगळी पद्धत जर्मन शिक्षणतज्ञ फेड्रीक फोबेल यांनी सुरु केली आणि ती अत्यंत अनुकरणीय अशी आहे अशी निर्मलाताईंची खात्री होती. हीच पद्धत त्यांनी रमाबाई परांजपे बालमंदिराच्या शिक्षण पद्धतीत वापरली.

आपल्या सासूबाईंच्या नावाने चालवलेल्या या बालमंदिरात आधुनिक पद्धतीचे शिक्षण व संस्कार लहान मुलांना मिळते याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

निर्मलाताईंच्या कारकिर्दीतच बालमंदिरात इंग्रजी माध्यमाचा विभाग तसेच नर्सरी सुरु झाले आणि आज याच रमाबाई परांजपे बालमंदिराचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला आहे. निर्मलाताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या कार्यवाह पदावर काम केले.मागील वर्षी निर्मलाताईंना रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी देवाज्ञा झाली.

श्रीमती आशाताई गांधी : भाग ३

सानेगुरुजी आणि राष्ट्रसेवादलाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलेल्या विद्वान विदुषी आशाताई गांधी या पूर्वाश्रमीच्या किशोरी पुरंदरे. किशोरीचा जन्म नाशिक येथे प्रागतिक विचारांच्या पुरंदरे कुटुंबात १९ एप्रिल १९३१ रोजी झाला. वडील कॉंग्रेसच्या विचारसरणीचे अर्थातच स्वातंत्र्य लढ्याला पाठींबा देणारे ! १९४२ साल उजाडले “अंग्रेजो भारत छोडो” चा नारा सर्वत्र घुमू लागला. लहानगी ११ वर्षांची किशोरी भारत छोडोच्या पत्रिका घरोघरी वाटत असे. पुढे तर हरिजन वाड्यातही फिरती सुरु झाली आणि संध्याकाळी राष्ट्रसेवादल शाखा तसेच स्फूर्ती गीते आणि बौद्धिक यामुळे बालवयातच राष्ट्रसेवादलाच्या समाजवादी विचारसरणीने किशोरीला घडवले. पुढे त्यांनी शालांत परीक्षेनंतर सी.पी.एड. आणि डी.पी.एड. चे शिक्षण पूर्ण केले .त्यानंतर त्या कांदिवलीच्या कन्याशाळेत शिक्षिका पदावर रुजू झाल्या.
किशोरीचे राष्ट्रसेवादलाच्या पूर्णवेळ कार्यकर्ते श्री दत्ता गांधी यांच्याशी विचार व मन जुळले आणि त्यांनी १९५१ साली दत्ता गांधींशी आंतर जातीय विवाह केला. किशोरी पुरांदरेची आशा गांधी झाली. त्यांचं लग्न जुळवण्यात समाजवादी नेते आणि माजी मंत्री सदानंद वर्दे यांनी पुढाकार घेतला. त्याच वर्षी गांधी दाम्पत्य विलेपार्ल्यात वास्तव्याला आले, आणि कायमचे पार्लेकर झाले.

लग्नानंतर आशाताईंनी बी.ए. ची पदवी संपादन करून इतिहास या विषयात सुवर्णपदक मिळवले. काही काळ पार्ले टिळक विद्यालयात अध्यापन करून १९८१ मध्ये आशाताई मुंबईच्या खार उपनगरातील बी.पी.एम. हायस्कूल मधून मुख्याध्यापक पदावूर निवृत्त झाल्या. त्यांनी राष्ट्रीय बाण्याचे हजारो विद्यार्थी घडवले. शाळेचा निकाल सुधारला.

निवृत्तीनंतर आशाताईंनी सामाजिक कार्यात विशेषतः राष्ट्रसेवादलाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. विलेपार्ल्यातील सर्व महिला संस्थांची एक संघटना “अहिल्या मंडळ” स्थापन केले. गरीब वस्त्यांमधून प्रौढ साक्षरता वर्ग सुरु केले. महापालिकेच्या शाळांमधून अवांतर विशेष वर्ग घेऊन कमजोर विद्यार्थ्याना शिकवले. गरिबांसाठी स्वस्त धन्य दुकान चालवले. महिला मंडळांसाठी स्त्री समस्या निवारणासाठी उद्बोधन कार्यक्रम आयोजित केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सत्याग्रही महिलांना तयार करण्याचा अनुभव तर होताच, त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांनी मेधा पाटकर यांची साथ देऊन विस्थापितांसाठी मोलाचे योगदान दिले.

किल्लारी भूकंपग्रस्तांच्या अनाथ मुलांसाठी “ आपले घर “ तसेच सहयोग ट्रस्ट , साधना मेळावे यात आशाताईंचा अग्रभाग होता. सरदार सरोवर विस्थापितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी गांधी दाम्पत्याने चाळीस लाख रुपयांचा निधी उभा केला. विलेपार्ल्यातील रामानंद सहनिवासाचे कार्यवाह आणि अध्यक्ष पदावरून त्यांनी दहा वर्षे जबाबदारी सांभाळली . महाराष्ट्र राष्ट्रसेवादलाने आशाताईंचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला होता.

तसेच विलेपार्ल्यातील साठे फौंडेशन तर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अखेर वृद्धापकाळात १५ सप्टेंबर २०२१ रोजी या दिपाशिखेने नवी मुंबईतील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये अंतिम श्वास घेतला आणि इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन.

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. खूप छान लेख व कविता ह्यांनी संपन्न असलेला अतिशय सुंदर, वाचनीय अंक 👍👍💐

  2. अतिशय माहितीपूर्ण, सुंदर लेख आहे. आशा मावशी आपले मनःपूर्वक धन्यवाद,

    डॉक्टर सुमित्राबाई वाघ, माननीय निर्मलाताई परांजपे ह्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः