भाग : ४
श्रीमती रमाबाई चेंबुरकर
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तसेच उत्तरार्धातही विलेपार्ल्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्रीमती रमाबाई चेंबुरकर, एक धडाडीच्या विद्वान विदुषी. मुंबईतील एक उपनगर जुन्या चेंबूर गावाची पाटीलकी असलेल्या प्रसिद्ध म्हात्रे कुटुंबात २९ नोव्हेंबर १९०२ रोजी त्यांचा जन्म झाला. नामवंत चित्रकार द्वारकानाथ म्हात्रे यांच्या रमाबाई कन्या. त्यांचे मोठे काका गणपतराव नामवंत शिल्पकार. त्यांचा विलेपार्ल्यात भव्य स्टूडीओ होता. धाकटे काका रघुनाथराव प्रसिद्ध डॉक्टर होते. अशा प्रतिभावान कुटुंबातील या लेकीने माहेरच्या म्हात्रे घराण्याचे नांव उज्वल केले.
१९२६ मध्ये श्री माधवराव चेंबुरकर यांचेशी विवाह झाल्यावर रमाबाई विलेपार्ल्यात राहायला आल्या. पार्ले टिळक विद्यालयाच्या शेजारी चेम्बुरकरांचा टुमदार बंगला होता तेथेच त्यांचे वास्तव्य होते. माधवराव आणि रमाबाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आर.एस.एस.) कार्यात सहभागी होते. रमाबाई १९३८ पासून अविरत १२ वर्षे महापालिकेच्या लोकनियुक्त सभासद होत्या. तसेच मार्केट व गार्डन समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. विलेपार्ले पश्चिमेकडील मार्केट आणि पूर्वेकडील महात्मा गांधी रस्त्यावरील केसकर उद्यान हे दोन्ही रमाबाईंच्या प्रयत्नांचे फळ आहे. रमाबाईंच्या सामाजिक कार्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी सेंट जॉन एम्ब्यूलन्सचा सुश्रुषा आणि प्रथमोपचार वर्गाचा शिक्षणक्रम पूर्ण केला होता, त्यामुळे आपत्तीकाळात रमाबाई वैद्यकीय सहाय्य करू शकत होत्या. १९५२ च्या कॉलरा साथीत त्यांनी रुग्णाची निस्वार्थपणे अविरत सेवा केली. महापालिकेतील सहभागामुळे विशेष औषधे आणि इंजेक्शने त्या उपचारासाठी तातडीने उपलब्ध करून देऊ शकल्या. वेळप्रसंगी रमाबाई पिडीताच्या घरी जाऊन इंजेक्शने देत असत.

त्या काळात एखाद्या महिलेने घराबाहेर पडून समाज कार्यात पुरुषांबरोबर सहभागी होणे अतिशय दुर्मिळ होते. १९३५ ते सत्तरच्या दशकापर्यंत रमाबाई लोकमान्य सेवा संघात विविध पदांवर कार्यरत होत्या. संघाच्या कार्यकारिणीत त्या एकमेव महिला सदस्य होत्या. रमाबाईंचे महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट होते, महिलांनी सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात आवर्जून सहभाग घ्यावा असा त्यांचा आग्रह असे.
रमाबाई कलावान होत्या, हा कलेचा वारसा त्यांना वडील आणि काकांकडून मिळाला होता. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी भरतकाम, शिवणकाम अशा कला जोपासाव्या यासाठी त्यांनी भरतकाम, शिवणकामाचे विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरु केले. रमाबाई विलेपार्ल्यातील महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त तसेच रमाबाई परांजपे बालमंदिराच्या अध्यक्ष होत्या. विलेपार्ल्यातील महिलांना संघटीत करून त्यांनी १९६२, १९६५ तसेच १९७१ च्या युद्ध काळात सैनिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करून दिलासा देण्याचे मोलाचे काम केले.

विलेपार्ल्याच्या सामाजिक जडणघडणीवर अमित छाप सोडणाऱ्या या विदुषीने २ मे १९७८ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आणि इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या घराजवळच्या रस्त्याचे नामकरण “रमाबाई चेंबुरकर मार्ग” असे करण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन.
(संकलन बागेश्री परीख यांच्या सहाय्याने.)
भाग : ५
मंगलाताई भागवत
शैक्षणिक, सामाजिक आणि महिला सक्षमीकरण अशा तीनही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मंगलाताई भागवत, पूर्वाश्रमीच्या उषा वामन जोशी.
उषाचा जन्म कोल्हापूर जवळ इचलकरंजी येथे ५ मार्च १९२२ रोजी झाला. लहानग्या उषाला मातेचे प्रेम-माया फार काळ लाभले नाही. तिचा सांभाळ काकांनी केला. पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयातून उषाने पदवी प्राप्त केली. मुळातच वाचनाची आवड, त्यात काका आणि आतेभावाने केलेले वाचनाचे संस्कार त्यामुळे तरुण वयातच उषाने विवेकानंद, केशवसुत, टिळकांचे गीतारहस्य, मार्क्स-लेनिन यांचे आर्थिक विषमता अशा अनेक ग्रंथांचे वाचन आणि मनन केले.
पुढे ९ जून १९४३ रोजी मुंबईच्या माधवराव भागवतांशी उषाचे लग्न झाले. काही काळ दादर येथील वास्तव्यानंतर १९५१ साली भागवत कुटुंब विलेपार्ल्यात “समृद्धी” या स्वतःच्या प्रशस्त बंगल्यात रहायला आले. आणि पार्लेकर झाले. बहुश्रुत मंगलाताईंनी दादरच्या वास्तव्यात माहीम महिला संघात समाजाच्या वंचित घटकांसाठी चाळ वस्त्यांमधून विविध उपक्रमांतून कार्य सुरु केले होते आणि समाजवादी चळवळीतील लढाऊ वृत्तीची कार्यकर्ती म्हणून नावलौकिक मिळवला होताच, तसेच याच काळात मार्क्सवादी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी “मार्क्सवादाची तोंडओळख” हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले.
पार्लेकर झाल्यावर या सामाजिक कार्याच्या अनुभवावर विलेपार्ल्यातील इतर अग्रणी महिलांबरोबर १४ जानेवारी १९५२ रोजी “विलेपार्ले महिला संघ” या शैक्षणिक व सामाजिक संस्थेची त्यांनी स्थापना केली. संस्था समृद्धी बंगल्यातच सुरु झाली. मंगलाताईंच्या दूरदृष्टीमुळे संस्थेने अल्पकाळातच लक्षणीय प्रगती केली.
विलेपार्ले पूर्वेकडील पहिली संपूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच पहिले संपूर्ण मराठी माध्यमातील महिला महाविद्यालय सुरु करण्याची श्रेय याच संस्थेकडे जाते. गरजू महिलांसाठी उद्योगिनी, आणि विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी, दूध-सकस आहार तसेच काही शैक्षणिक उपक्रम मंगलाताईंनी सुरु केले. महिला संघाचे नांव कर्णोपकर्णी झाले.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य आण्णासाहेब कर्वे यांची विलेपार्ले महिला संघातील भेट ऐतिहासिक ठरली. आज या संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळा मराठी व इंग्रजी माध्यमातील आहेत, तसेच इंटरनैशनल स्कूल सुद्धा आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित यांच्या पुढाकाराने सुरु झालेली देशातील सर्वात जुनी महिलांची संस्था म्हणजे “अखिल भारतीय महिला परिषद” या संस्थेच्या माहीम शाखा प्रतिनिधी या नात्याने १९५५ मध्ये फिनलंड मधील हेलसिंकी येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेला मंगलाताई हजर होत्या. तसेच स्वित्झरलंड येथे आंतरराष्ट्रीय माता परिषदेत मंगलाताईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
मंगलाताईंना संगीताची आवड होती आणि छंद म्हणून त्या काही काळ संगीत शिकल्याही होत्या. आणि योगायोग असा की बालगंधर्वांच्या निधनानंतर माझ्या वडिलांच्या म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने बालगंधर्वांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरु केलेल्या “बालगंधर्व संगीत सभा” या सांस्कृतिक संस्थेची स्थापना, मंगलाताई आणि माधवरावांच्या “समृद्धी” बंगल्यातच सुहासिनी मुळगांवकर, पंडित व्ही.आर.आठवले यांच्या उपस्थितीत लालजी देसाई यांच्या मैफिलीने झाली. तेंव्हा मंगलाताईंनी सर्व उपस्थित रसिकांचा आदराने पाहुणचार केला होता. मंगलाताईंना वाचनाची होती तशीच लेखनाचीही आवड होती माधवरावांच्या सूचनेवरून १९९३ मध्ये “कुण्या एकीचे अंतरंग” हे आत्मचरित्र लिहिले, आणि हे पुस्तक सर्वोत्कृष्ठ साहित्य निर्मितीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. मंगलाताई “पार्लेभूषण” पुरस्काराच्या मानकरी होत्या.
या विद्वान विदुषीने वयाच्या ९२ व्या वर्षी ९ मार्च २०१४ रोजी इहलोकाची यात्रा संपवली. मंगलाताईंच्या समर्पित जीवनाला त्यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्ताने त्रिवार वंदन.!

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800