Saturday, July 27, 2024
Homeयशकथाविलेपार्ल्यातील दीपशिखा

विलेपार्ल्यातील दीपशिखा

भाग : ६

श्रीमती सुनिता गोगटे

हाडाचा शिक्षक निवृत्तीनंतरही अध्यापनाचे कार्य जीवनभर करीतच असतो आणि तसेच सामाजिक कार्याचेही आहे. सुनिता गोगटे सुद्धा याला अपवाद नव्हत्या. वनवासी कल्याण आश्रम म्हणजे गोगटे बाई असे समीकरणच जणू विलेपार्ल्यात सर्वतोमुखी झालं होतं ! अशा विलेपार्ल्यात सुपरिचित असलेल्या श्रीमती सुनिता गोगटे पूर्वाश्रमीच्या सुनिता देवल.

सुनिताताईंचा जन्म कोकणातील एका समृद्ध आणि सुसंस्कृत देवल कुटुंबात २२ जुलै १९४१ रोजी झाला. तेथेच रेवदंड्याच्या जिल्हापरिषद कन्याशाळेत प्राथमिक आणि ठाण्यात माध्यमिक शिक्षण झाले. पुढे काही काळ मुंबई महापालिकेत नोकरी करून, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून सुनिताताईंनी कला शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शिक्षकी पेशाला आवश्यक अशी बी.एड. ची पदवी संपादन केली. सुनीताच्या वडिलांचे ठाणे नगर वाचनालयाच्या व्यवस्थापनात मोठे योगदान होते त्यामुळे सतत पुस्तकांच्या सहवासात राहून तसेच थोर साहित्यिकांच्या आणि संशोधकांच्या सहवासामुळे सुनीताला वाचनाची गोडी लहान वयातच लागली. ठाण्यातील सांस्कृतिक वातावरण तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून प्रेरणा आणि वडिलांचे संस्कार यातून सुनिताचे आदर्श शिक्षकाचे ऋजू व्यक्तिमत्व घडले.

१९६५ साली सदानंद गोगटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर सुनीताताई पार्लेकर झाल्या. १९६६ पासून ते निवृत्ती पर्यंत सुनिताताईंनी पार्ले टिळक विद्यालयात मराठी आणि संस्कृत भाषा शिकवल्या आणि संस्कृतचे विनामूल्य विशेष वर्गही घेतले, जेणेकरून भाषेत कमजोर असलेल्यांना लाभ झाला.

निवृत्ती नंतर १९९९ मध्ये सुनिताताईंनी अखिल भारतीय स्तरावरील १९५२ मध्ये स्थापित झालेल्या “वनवासी कल्याण आश्रम” या संस्थेला आपले जीवन समर्पित केले ते शेवटच्या श्वासापर्यंत !

महाराष्ट्रात या संस्थेची १८ वसतीगृहे आहेत. संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याचे उत्तरदायित्व त्यांनी स्वीकारले. यासाठी वसतिगृहांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देणे, तेथील व्यवस्थापन तपासणे, तेथील ग्रंथालयांतून विविध विषयावरील पुस्तकांचा पुरवठा करणे, त्याचबरोबर वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधणे, त्यांच्या गरजा, समस्या जाणून घेऊन त्यांची उकल करून मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीवर लक्ष ठेवणे, तसेच वनवासी आदिवासींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, प्रगतीसाठी संधी मिळावी, ग्रामीण वनविभाग आणि शहरे यांतील दरी कमी करून वनवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सुनिताताईंनी केलेले प्रयत्न अवर्णनीय आहेत.

अनेक वर्षे वनवासिंनी बनवलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मुंबई उपनगरांतून आयोजित करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम असो अथवा वनवासी सुगरणींनी बनवलेल्या रुचकर व खमंग भाजणीला मार्केटमधील वाढत्या मागणीसाठी सहाय्य करणे असो, सुनिताताईंनी निस्वार्थपणे यशस्वी प्रयत्न केले. लोकमान्य सेवा संघाच्या ग्राहक पेठेत संस्थेकडून त्यांना या वस्तूंच्या विक्रीसाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. शहरवासी आणि वनवासी यांच्यातील आपपर भाव नष्ट होऊन एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी शहरवासीयांच्या आश्रम भेटी आयोजित करण्याच्या अभिनव उपक्रमाला सुरुवात करून मोलाचे कार्य केले.

हे सर्व करतांना सुनिताताईंमधील अध्यापक त्याना स्वस्थ बसू देईना. त्यांनी वनवासी आश्रमातील विद्यार्थ्यांनी बहुश्रुत व्हावे या उद्देशाने “रानपाखरं” या त्रैमासिकाचे संपादन आणि प्रकाशन सुरु केले. आश्रमवासी मुलांकडून विशेष हस्तलिखित बनवून घेणे, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे, विविध योजना व प्रकल्पांबद्दल मुलांना माहिती देणे, थोरांची चरित्रे व इतर साहित्यातून लहान वयातच आश्रमवासी मुलांवर देशभक्तीचे, राष्ट्रीय एकतेचे संस्कार करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य सुनिताताईंनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. या क्षेत्रातील आपल्या अनुभवकथनातून तरुण कार्यकर्त्यांकडून आश्रमाचा कार्यविस्तार साधण्यासाठी सुनिताताईंनी सतत धडपड केली.

सुनिताताईंकडून आलेल्या समाजसेवेच्या संस्कारांतून त्यांच्या दोन उच्च विद्याविभूषित कन्या आणि एक पुत्र सामाजिक जाणीवेचा हा वारसा पुढे चालवत आहेत. या सेवाव्रती दिपशिखेने अल्पशा आजारानंतर आषाढी द्वादशीच्या दिवशी ३० जून २०२३ रोजी या इहलोकीची यात्रा संपवली. सुनिताताईंच्या स्मृतीला त्रिवार वंदन !

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८