Saturday, July 27, 2024
Homeयशकथाविलेपार्ल्यातील दीपशिखा

विलेपार्ल्यातील दीपशिखा

भाग : ७

कृष्णाबाई खंबदकोण

कृष्णाबाई खंबदकोण एक स्वयंनिर्मित, खंबीर आणि तरी तितकेच ऋजू व्यक्तिमत्व ! कृष्णाबाई खंबदकोण यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी कर्नाटकातील एका लहानशा खेडेगावात झाला. आई वडिलांचे चौथे अपत्य आणि त्यातही मुलगी म्हणून जन्मापासूनच अवहेलना नशिबी आली. आईचे सुरक्षेचे आणि मायेचे कवच त्यांना फार काळ लाभले नाही. वयाच्या पाचव्या वर्षीच मातृवियोगाचे दु:ख लहानग्या कृष्णाला सहन करावे लागले. पुढील आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगाना तोंड देण्याची शक्ती ध्रुढ करण्यासाठी जणू बालपणीच नियतीने कृष्णाबाईच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली.

आर्थिक ओढाताण, अनेक कौटुंबिक समस्यां अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन स्वतः अर्थार्जन करून, अपार कष्ट करून कृष्णाबाईंनी मुंबई विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवी संपादन केली आणि पश्चिम रेल्वेत लिपिक पदाची नोकरी मिळवली. त्याकाळात स्त्रियांनी अर्थार्जनासाठी नोकरी करणं साधारण बाब नव्हती. मुळातच बुद्धिमान असलेल्या कृष्णाबाईंनी रेल्वे विभागात अनेक स्पर्धापरीक्षा नेटाने उत्तीर्ण करून पश्चिम रेल्वेत ऑडीटर पदापर्यंत मजल मारली. एक कर्तव्यदक्ष आणि सहृदय महिला अधिकारी म्हणून कृष्णाबाईंनी सहकाऱ्यांमध्ये मानाचे स्थान मिळवले.

एक महिला अधिकारी पुरुष सहकाऱ्यांकडून आदराची वागणूक मिळवते ही काही त्याकाळात साधी सोपी गोष्ट नव्हती.म्हणतात नं One cannot demand respect, but one has to command it ! तसेच काहीसे कृष्णाबाईंच्या बाबत झाले ! हा आदरभाव त्यांनी स्वतःच्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तशीर कामातून संपादन केला होता.

१९६२ साली गुरुप्रसाद सोसायटी मध्ये कृष्णाबाईंनी सदनिका घेतली आणि त्या पार्ल्यात राहायला आल्या आणि खऱ्या अर्थाने पार्लेकर झाल्या.

कृष्णाबाई आजन्म अविवाहित राहिल्या कारण त्यांच्यावर स्वतःपेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या मतिमंद बहिणीची आणि आजारी वृद्ध वडिलांची जबाबदारी होती. कुटुंबातही त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले. स्वतःच्या शारीरिक कष्टांकडे, आजारपणाकडे दुर्लक्ष केले आणि बहिणीची अनेक आजारपणे कृष्णाबाईंनी काढली. परंतु त्यांनी कधीही बहिणीला मतिमंदांच्या आश्रमात पाठवून दिले नाही. देवाने हिच्या सेवेकरताच आपल्याला जन्म दिला आहे अशी त्यांची धारणा होती.
या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांच्यातील सकारात्मकतेने मात केली. त्या आनंद शोधत राहिल्या आणि त्यांना तो मिळाला त्यांच्या विविध छंदांतून ! शास्त्रीय संगीताचा अभ्यास, भरतकाम, बागकाम, वाचन, कविता करणं, टाकावू वस्तूंतून कलात्मक टीकावू वस्तू बनवणे, पाक कलेत नवनवे प्रयोग करणे असे अनेक छंद त्यांनी जोपासले. तसेच आध्यात्माकडे त्यांचा ओढा होता, त्या कृष्णभक्त होत्या. त्यांची संपूर्ण भगवद्गीता मुखोद्गत होती. इतकंच नाही तर शास्त्रीय संगीताच्या अभ्यासामुळे सर्व अध्याय निरनिराळ्या रागदारीत बसवून त्यांनी अनेक वाहवा मिळवणारे कार्यक्रमही सादर केले.

कृष्णाबाईंनी श्रीकृष्णावर अनेक कविताही रचल्या. ती कवने इतकी प्रभावित करणारी होती की पार्लेकर असलेल्या प्रसिद्ध संगीतद्न्य डॉ. सुशीला पोहनकर यांनी त्या संगीतबद्ध केल्या आणि “कृष्णं वंदे” या नावाची ध्वनिफीत सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा, अंजली पोहनकर इत्यादि गायकांच्या सुमधुर आवाजांत ध्वनिमुद्रित करून प्रकाशित केली आहे.

कृष्णाबाई मान्यताप्राप्त योग शिक्षिका होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्यसंपन्न असण्याला महत्व देऊन अनेक महिलांना प्राणायाम आणि योगासने शिकवली.

कृष्णाबाईंचे मराठी, हिंदी, कानडी, संस्कृत, इंग्रजी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व होते. पाणिनीच्या व्याकरणाचा सखोल अभ्यास करून त्यांनी अनेक वर्षे परिश्रमपूर्वक कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवले. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांच्या प्रबोधनपर मुलाखती प्रसारित झाल्या. अनेक संस्थांनी त्यांच्या दातृत्व गुणांचा यथोचित सन्मान केला.

अतिशय साधं जीवन जगणाऱ्या कृष्णाबाईंनी स्वतः कसलीही हौस मौज अथवा चैन केली नाही आणि आपली स्वकष्टार्जित मिळकत अनेक गरजूंसाठी कार्यरत संस्थाना देणगी देऊन, आर्थिक भार उचलून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाची एक शाखा “ कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्र “ त्यांच्याच नांवाने अनेकांसाठी दिशादर्शक ठरले आहे. नेरे, पनवेल येथील कुष्ठरोग निवारण समितीचे शांतीवनातील “ कृष्णाबाई खंबदकोण रुग्णनिवास “ अनेक पिडीतांना दिलासा देत आहे, या रुग्णनिवासाचे उदघाटन गांधीवादी सेवानिवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे हस्ते झाले होते.

विलेपार्ल्याच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा “ कृष्णाबाई खंबदकोण बालविभाग “ बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजवून त्यांचे मनोरंजन करत आहे. या व्यतिरिक्त उत्कर्ष मंडळाचे मूक-बधीर विद्यालय, शिवाजी विद्यालय विलेपाले, नानावटी हॉस्पिटल मधील “ Helping hand institute for cancer patients “ अशा अनेक संस्था त्यांच्या आर्थिक सहाय्याच्या लाभार्थी आहेत.

“आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यांसाठी,
त्या त्यागाच्या संतोषला जगी या उपमा नाही.
जन्म असावा देण्यासाठी हेच मनाला ठावे,
ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे, नाचत नाचत गावे.”
सुधीर फडकेंचे हे गीत कृष्णाबाईंना अतिशय प्रिय होतं. जणू तेच त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान होतं. दानरूपाने आपल्या अस्तित्वाच्या पाउलखुणा मागे ठेवून कृष्णाबाईंनी २ ऑगस्ट २०१८ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी या नश्वर जगाचा निरोप घेतला आणि आपली इहलोकीची यात्रा संपवली. पार्लेकर कृष्णाबाईंचे सदैव ऋणी राहतील. त्यांच्या पुण्यस्मृतीला शतशः नमन !
संकलन साहाय्य : श्यामला भट

आशा कुलकर्णी

— लेखन : आशा कुलकर्णी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८