महाराष्ट्र शासनातर्फे २७, २८ व २९ जानेवारी,२०२४ असे तीन दुसरे विश्व मराठी संमेलन, नवी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र घरत यांनी या संमेलनास तीनही दिवस उपस्थित राहून अतिशय चिकित्सकपणे लिहिलेला हा वृत्तांत आपल्याला नक्कीच आवडेल.
– संपादक
एकूण मराठीची अवस्था पाहता मराठी ‘पुअर’ असल्याबद्दल अनेकजण गळे काढतात. अशावेळी दुबई, अबुधाबी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या व जगाच्या कानाकोपऱ्यातील देशांमधून आलेली व तिकडे मराठीचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार, विकास करण्यासाठी कटिबध्द असलेली अनेक मराठी माणसे विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने नवी मुंबईत एकत्र आली व आपल्या मायमराठीला ‘प्युअर’ व ‘रीच’ कशी करता येईल यासाठी काय काय करीत आहेत ते सांगत होती, ही घटनाच मोठी आश्वासक म्हटली पाहिजे.
मराठा आरक्षण मोर्चाचे वादळ नवी मुंबईत घोंगावत असतानाच दुसरे ‘विश्व मराठी संमेलन’ त्याच नवी मुंबईत आकारास येत होते. जगाच्या विविध देशांमधील कर्तबगार मराठी माणसे या निमित्त नवी मुंबईत आली आणि त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने पहिले ‘विश्व मराठी संमेलन’ मुंबईत, वरळी येथे भरवले होते. तर दुसरे संमेलन नवी मुंबईत भरविले. यानंतरचे तिसरे ‘विश्व मराठी संमेलन’ बहुधा नागपूर येथे या वर्षाच्या अखेरीस किंवा जानेवारी २०२५ मध्ये पार पडेल असे सूतोवाच मराठी भाषा मंत्री, शालेय शिक्षण मंत्री तसेच मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी २९ जानेवारी रोजी झालेल्या सांगता समारंभात केले. मुंबईत चर्नी रोड येथे ३७७० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर मराठी भाषा भवन व शालेय शिक्षण विभागाची एक संयुवत भव्य इमारत उभारली जाईल तसेच राज्यभरातून येणाऱ्या मराठी भाषेतील साहित्यिकांसाठी निवासाची व्यवस्था, भाषाविषयक उपक्रम राबवण्यासाठी नवी मुंबईत ऐरोली येथे मराठी भाषा भवन उपकेंद्राची निर्मिती करण्यात येणार असून तेथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी बालोद्यान, सुसज्ज ग्रंथालय व जवळपास ४०० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह सुध्दा प्रस्तावित करण्यात आले आहे.
२७, २८ व २९ जानेवारी असे तीन दिवस वाशीच्या सिडको प्रदर्शनी केंद्रात चाललेल्या या दुसऱ्या ‘विश्व मराठी संमेलना’ला जास्तीत जास्त वेळ हजेरी लावून मला विविध कार्यक्रमांचा साक्षीदार बनता आले. तीन दिवसांच्या अल्पावधीत एकाच आयोजनात महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, नवी मुंबईचे स्थानिक दोन्ही आमदार, मराठी भाषेसंदर्भातील विविध मंडळे-समित्यांचे अध्यक्ष, अ.भा.मराठी सहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष, विख्यात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, मनसे प्रमुख राज ठाकरे, मराठीतील विविध नामवंत कवी, हास्यजत्रेमधील तसेच मराठी चित्रपट- नाट्य- दूरचित्रवाणी मालिकांमधील नामवंत कलावंत, लेखक-कवी- नाटककार आणि महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी सोडून परदेशात अनेक वर्षे राहताना तेथेही आपले कर्तृत्व सिध्द करणारी मराठी माणसे असे एवढे सारे मराठी तारांगण एकाच वेळी उपस्थित राहण्याची माझ्या मते नवी मुंबईच्या उभारणीनंतरची ही पहिलीच वेळ असावी.
या विश्व संमेलनाच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते. मराठा आरक्षण मोर्चाचा मुक्काम २५ जानेवारीच्या रात्रीपासून नवी मुंबईत होता. २७ तारखेला सकाळपासूनच वाशीचा शिवाजी चौक मोर्चेकऱ्यांनी सर्व बाजूंनी वेढला होता. तेथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्या आंदोलनाची समाप्ती केली आणि ते थेट संमेलनस्थळी उपस्थित झाले. त्यामुळे ते तेथे काय बोलणार, जगभरातील मराठी माणसांना काय सांगणार याचीही उत्सुकता अनेकांना होती. बाकीच्या गोष्टींबद्दल बोलल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की ‘भाषा ही प्रवाही असली पाहिजे, तिने नवे शब्द स्विकारले पाहिजेत, समाजमाध्यमांवर मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे. तरुणांना आवाहन होईल, तरुणाईला आवडेल अशी मराठी भाषा लेखकांनी लिहायला पाहिजे.’ हे सारे लेखकांनी किती मनावर घेतले ते हळुहळु समजेलच.
त्यानंतर तिथे पार पडलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी एका सादरीकरणानंतर दुसरे सादरीकरण होण्याच्या मधल्या वेळेत तेथील निवेदिका ध्वनिक्षेपकावर काही महिलांच्या प्रतिक्रिया या संमेलनानिमित्त घेत होती. एका स्थानिक महिलेला निवेदिकेने या साऱ्या आयोजनाबद्दल काय वाटते ते विचारले. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ती स्थानिक महिला उत्तरली…एवढे अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या परक्या देशात राहुनसुध्दा इथे आलेले आपले मराठी लोक ‘प्युअर’ मराठी बोलतात हे मला खूप आवडले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तिने लगेच ‘प्युअर’ या आंग्ल शब्दाला मराठीत स्विकारत त्याचा ‘परिणामकारक’ वापर केल्याचे मला जाणवले आणि याबद्दलचा एक ऐकलेला विनोदी चुटका मला आठवला. गणू इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्याचा मित्र त्याला विचारतो..‘गण्या तिकडचे तुला चकित करणारे काय वाटले ?’ गण्या क्षणाचाही विलंब न लावता उत्तरतो की..‘सद्या..अरे तिकडचे लहान मुले-मुलीही काय फाडफाड इंग्रजी बोलतात !’ यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण मराठीत अशा कित्येक शब्दांना आपण मराठीत केंव्हाच पावन करुन घेतले आहे. बटण, इंजेवशन, एक्स रे, लिफ्ट, टेबल अशांसाठी अनुक्रमे कळ, औषधी सुई, क्ष-किरण, उद्वाहन, मेज हे मराठी शब्द उपलब्ध असतानाही मूळ इंग्रजी शब्दच वापरतो. त्यासाठी मराठी मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची वाट पाहात नाही. पण मराठी बोलताना किती शब्द परक्या भाषेतील वापरावेत ? याचे भान हवे. नाहीतर मग ‘ॲलोपथिक मेडिसिन फर्स्ट टाईम युज करतो’ या वाक्याला आपल्याला मराठी समजावे लागेल व त्यातील मराठी शब्द विजेरी घेऊन शोधावे लागतील.
या विश्व मराठी संमेलनामध्ये जगातल्या विविध देशांमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळे सुरु करुन त्यांचे काम समर्पित वृत्तीने करणारे या मंडळांचे अनेक पदाधिकारी आले होते. त्यांच्यातील अनेकांना नवी मुंबई, मुंबई व महाराष्ट्रातून आलेल्या मराठी माणसांना आपल्या कामांबद्दल, आयोजने, उपक्रम, योजना, आगामी कार्यक्रमांबद्दल बरेच काही सांगता आले.
अमेरिकतील बृहन्महाराष्ट्र मंडळ १९२५ मध्ये स्थापन करण्यात आले. या मंडळाचे ७६ वे वार्षिक अधिवेशन हा लेख वाचला जात असेल त्यावेळी (२,३,४ फेब्रूवारी दरम्यान) वाराणसी येथे पार पडत असेल हे ऐकून माझा ऊर अभिमानाने भरुन आला. विशेष करुन मराठी माणसांनी स्थापन केलेल्या संस्था कशा लवकर फुटतात हेच जिकडेतिकडे सांगितले जात असण्याच्या काळात अमृतमहोत्सवी अमेरिकी बृहन्महाराष्ट्र मंडळाची ही घोडदौड मोठी प्रशंसनीय आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात स्वाभाविकपणे येत जाणारा एकाकीपणा कमी करण्यासाठी तिथे आयोजित केली जाणारी विविध चर्चासत्रे, त्यांना मिळणारा दांडगा प्रतिसाद, तेथील मराठी स्त्री पुरुषांचे क्रिकेट संघ आणि त्यांच्या चुरशीच्या स्पर्धा, महिलांच्या संघांना देण्यात आलेली ‘रॉकींग राणी’, ‘डॅझलिंग उर्जा’ वगैरे नावे, विविध धार्मिक विधींसाठी भटजी मिळत नसल्याने चालवण्यात आलेले पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग वगैरे माहिती ऐकून समाधान वाटले. हे तर काहीच नाही. मला मूळचे रायगड जिल्ह्यातील रोहा येथले डॉ.श्री प्रसाद प्रफुल बारटके हे या विश्व मराठी संमेलनात भेटले. ते गेली पंधरा वर्षे अबुधाबीसारख्या मुस्लिम देशात आहेत आणि तेथील महाराष्ट्र मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे हे मंडळ गेली ३५ वर्षे सक्रीय असून मराठीच्या संवर्धनासाठी काय करता येईल ते पाहात असते.
दुबईतील महाराष्ट्र मंडळ ५० वर्षे काम करीत असून नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही चळवळ तेथे पोहचली आहे. एक हजाराहुन अधिक मराठी पुस्तके त्यांनी दुबईतील मराठी माणसांसाठी उपलब्ध करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी दिलेली ही सारी माहिती मी ध्वनिफितबध्द करुन ‘नवे शहर’च्या समाजमाध्यमावर प्रदर्शित केली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्राला आधीचे लाभलेले राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी हे विविध कारणांनी वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या मराठीबाबतच्या काही वक्तव्यांनीही ते अडचणीत आले होते. विद्यमान राज्यपाल महामहिम श्री. रमेश बैंस हे त्यामानाने बऱ्यापैकी उदारमतवादी, मितभाषी असल्याचे वाशीमध्ये त्यांनी केलेल्या भाषणातून जाणवले. आपण जन्माने छत्तीसगढ येथील रायपूरचे असल्याचे सांगत कुशाभाऊ ठाकरे हे आपले गुरु होते व आपण राज्यपालपदाची शपथ मराठीत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पंतप्रधानांनी राष्ट्रभाषा व मातृभाषेला प्राधान्य देण्याचे ठरवले असून राज्यातील विविध विद्यापीठांचा कुलगुरु म्हणून आपण मेडिकल व इंजिनियरिंग अभ्यासक्रमाची विविध पुस्तके मराठीत भाषांतरीत करुन देण्याबाबतचे आदेश विद्यापीठांना दिल्याचेही मान. राज्यपाल यावेळी म्हणाले.. ही बाब मराठी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरावी.
२७, २८ व २९ जानेवारी हे तिन्ही दिवस मराठी भाषा विभागाचे व शालेय शिक्षण खात्याचे मंत्री श्री दीपक केसरकर हे यजमान म्हणून या विश्व मराठी संमेलनात उपस्थित राहिले होते. कुणाची राजकीय अथवा व्यक्तिगत मते वेगवेगळी असू शकतील. पण श्री. केसरकरांनी हे सारे आयोजन नेटकेपणाने केल्याचे दिसून आले. अपवाद त्याच्या प्रसिध्दीचा ! कारण नवी मुंबईतीलच अनेकांना आपल्या दारात असे काही भव्य दिव्य आयोजन केले आहे हेच माहित नव्हते. गल्लीबोळातल्या कसल्यामसल्या कार्यक्रमांची इमारतभर उंचीची बॅनर्स, पोस्टर्स लागतात. पण एवढ्या मोठ्या संमेलनाचे व्यवस्थित बॅनर, होर्डीग, पोस्टर नवी मुंबईत सर्वत्र पाहायला मिळू नये ?
२७ जानेवारीस मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनात सादर केलेली विजेती लोकांकिका ‘एकूण पट १’ ही शिक्षणाप्रतिच्या एकूणच सामाजिक, राजकीय अनास्थेवर झगझगीत प्रकाशझोत टाकणारी वाटली. ना. केसरकरांनी लगेच जिंदादिली दाखवत त्या लोकांकिकेतील प्रमुख विद्यार्थीनीची भूमिका साकारलेल्या महाविद्यालयीन मुलीला स्वतः व्यक्तीगतरित्या अडीच हजाराचे व लोकांकिकेच्या साऱ्या चमूला दहा हजाराचे रोख पारितोषिक दिले, ही बाब मला विशेष उल्लेखनीय वाटते. मराठीला पुढे नेणारे, मराठी माणसांना एकत्र आणणारे, मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार, विकास करणारे, प्रोत्साहन देणारे असे अनेक कार्यक्रम आपल्या अवतीभवती वारंवार पार पडत राहिले तर मराठी ही पुअर न होता प्युअर व रीच होईल. तिच्या सर्वांगीण समृध्दीसाठी सर्व संबंधितांना खूप खूप शुभेच्छा.
— लेखन : राजेंद्र घरत. ज्येष्ठ पत्रकार, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800