Saturday, April 13, 2024
Homeलेखविस्मरण

विस्मरण

काही गोष्टी विसरलेल्याच चांगल्या असतात. कधी कधी घरामध्ये, कार्यालयात, शेजारी, प्रवासात, दुकानात थोडे वाद-विवाद झाले की आपल्या मनात तीच गोष्ट घर करून राहते. त्यामुळे मनस्ताप होतो. समोरच्याला काही फरक पडत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतात. म्हणून अशा गोष्टीचे विस्मरण झालेलंच बर असते.

देवाने माणसाच्या मेंदूत अशी प्रक्रिया करून ठेवलेली आहे. कशाला उद्याची बात ? म्हणत भविष्याची उगीच चिंता करत असताना ताण वाढतात. शरीरावर व मनावर त्याचे विपरीत परिणाम होतात.

एखादी गोष्ट योग्य वेळी न आठवणे, कधीच न आठवणे, त्यातील कोणताच भाग न आठवणे म्हणजे विस्मरण होय. मला कधी कधी काही शब्द, नाव आठवत नाहीत, तेव्हा मी त्या मागचा सलग शब्द लक्षात ठेवते. किंवा आधीचा मुख्य शब्द आणि त्याला जोडलेला शब्द लक्षात ठेवते. त्यामुळे मला सहसा विस्मरण होत नाही. खरं म्हणजे विस्मृती ही मानसिक प्रक्रिया आहे.

एखाद्या माणसाचा आपल्याला राग आला, त्या व्यक्तीशी आपलं भांडण झालं की आपण त्या व्यक्तीला डोक्यात ठेवतो. तिचेच स्मरण करतो. त्यामुळे बाकीच्या गोष्टी आठवत नाहीत. त्यावेळी विस्मरण झालेलं चांगलं असते.

कधी कधी आपण चष्मा, चावी, पेन यासारख्या वस्तू सहज विसरतो. ‘मामा की ऐनक’ हा धडा आपल्याला हिंदीत पाचवीला होता. धड्यातले काका डोक्यावर चष्मा अडकवून ठेवतात, आणि घरभर शोधत असतात. हे वाचल्यावर तेव्हाच्या बाल सुलभ मनाच्या समजुती प्रमाणे हसू यायचं, पण आता विस्मरणाचा अर्थ कळतो.

देवाने प्रत्येक माणसाला स्मरणाप्रमाणे विस्मरणाचा कप्पा दिलेला आहे. त्यामुळे नकारात्मक गोष्टी आपोआप विसरले जातात. आणि जीवनातील दुःख कमी होते. आनंदाचे क्षण निर्माण होतात आणि सकारात्मक वातावरण तयार होते. ही चांगली गोष्ट आहे.

परीक्षा आली की पेपर लिहिताना जीव तोडून केलेला अभ्यास नेमका विसरायला होते. भाषण करताना किंवा वक्तृत्व स्पर्धेच्या वेळी नेमका एखादा चांगला मुद्दा किंवा शब्द आपण विसरतो. त्यासाठी जाणून-बुजून प्रयत्न केले तर आपल्याला हवे असलेले शब्द आपण आठवू शकतो.

नकारात्मक प्रसंग सारखे घडले किंवा आपण नकारात्मक विचार करत गेलो तर त्या दिवशी विस्मरण जास्त झाल्याच लक्षात येतं. ज्या गोष्टीमुळे विस्मरण होते त्या गोष्टी आपण जाणून-बुजून टाळल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सारखं सारखं मला आठवतच नाही, माझ्या लक्षात राहत नाही, मी विसरते असं बोलू नये. त्यामुळे नकारात्मक भावना तयार होऊन विस्मरणाची मानसिकता तयार होते. आणि आपण खरंच विसरायला लागतो म्हणजेच विस्मृती होते.

विस्मरण दोन प्रकारचे असते.
1) अल्पकालीन म्हणजे short tern memory
2) दीर्घकालीन स्मृती म्हणजेच Long term memory.
आपण जे पाहिलेले असते, निरीक्षण केलेले असते ते ज्ञान असते. आपल्यावर जे संस्कार होतात, जे काही वाचलेले असते किंवा अभ्यास केला असेल ते काही काळाने विसरले जाते. कारण वाचलेलं 30 सेकंद टिकते. त्यानंतर ते विसरले जाते. त्यास अल्पकालीन स्मृती असे म्हणतात.

जेव्हा अभ्यास करून, वाचलेले किंवा आपल्यावर झालेल्या संस्कार यातून मिळालेले ज्ञान अनेक दिवस अनेक वर्षापर्यंत टिकून राहतात त्यास दीर्घकालीन स्मृती असे म्हणतात. सण, समारंभ, वाढदिवस, लग्न, स्नेह संमेलन, निरोप समारंभ, पदवीदान समारंभ इत्यादीचे स्मरण आपल्याला जवळजवळ कायम राहते. काही संकेत आपल्या मेंदू पटलावर नोंद घेते ते प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात.

आपण पुस्तकांचे केलेले वाचन, पाहिलेले नाटक, सिनेमा हे लक्षात राहते. कारण ते मेंदूत साठवून ठेवतो. कधी कधी मुलांचा जोरात रडण्याचा आवाज, कर्कश आवाज, कंटाळा बसवणारे लाऊड स्पीकर, घंटेचा आवाज, कोणताही कर्कश आवाज यामुळे स्मृतीमध्ये अडथळे येतात. त्यामुळे विस्मरण होऊ शकते.

मोबाईल मुळे आपल्याला फोन नंबर पाठ नसतात. कारण त्याची पुन्हा पुन्हा उजळणी सुद्धा होत नाही. त्यामुळे विस्मरण होते. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचे पुन्हा पुन्हा प्रत्यानयन केले नाही तर विसरायला होते. म्हणून आपण जाणून-बुजून उपयोगाच्या, सकारात्मक, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत.

कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी खूप वर्षांनी शिक्षकांना भेटला तर तो विचारतो सर, मॅडम मला ओळखलं का ? तर ते शिक्षक ओळखत नाहीत. आणि म्हणतात नाही ओळखलं रे ? कारण तेव्हाची ओळख मेंदूमध्ये साठवली नाही.

चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
1) आठ तास झोप घ्यावी.
2) छंद जोपासावेत.
3) आवडीची पुस्तके वाचावीत.
4) वाचलेले समजून घ्यावे.समवयस्काशी संवाद साधावा.
5) संदर्भ लक्षात ठेवण्याची सवय लावणे.
6) आनंदी राहणे.
आपली स्मृती चांगली राहण्यासाठी नियोजन करून जे ज्ञान घेतले आहे त्याची उजळणी केली तर स्मृती चांगली राहील व विस्मृतीचे प्रमाण नक्कीच कमी होईल असं मला वाटते.

डॉ अंजूषा पाटील

— लेखन : डॉ.अंजुषा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments