Monday, November 11, 2024
Homeलेखवृद्धाश्रम : गरज की तडजोड ?

वृद्धाश्रम : गरज की तडजोड ?

नटसम्राट वि. वा. शिरवाडकर आपल्याला सांगून गेलेत की ‘पुढ्यातलं जेवणाचं ताट द्यावं, पण बसायचा पाट कधी देऊ नये’ अगदी खरं वास्तव आहे हे. तरी पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा असं होताना दिसत नाही हे दुर्दैवच.

काबाडकष्ट करून पैसा मिळवायचा, घर बांधायचं, मुलांना उत्तम उच्च प्रतिचं शिक्षण द्यायचं, आकाशाला गवसणी घालणारी त्यांची स्वप्नं पोटाला चिमटा काढून वा आपल्या आवडी निवडी बाजूला सारून पुर्ण करायची, ही आपली संस्कृती. त्यांना भरघोस पॅकेजची नोकरी मिळण्यासाठी संधी मिळवून द्यायची मग, अशा मुलाची लग्नगाठ ही पॅकेज पॅकेजशी बांधली जाते असे चलनी दिवस आता आले आहेत.

लाखोंच्या पॅकेजेसमुळे आताच्या नवं पिढीचे जीवनमानच पुर्णतः बदललेले दिसून येते. आता अलिशान फ्लॅट, अलिशान कार, श्रीमंती रहाणीमान, दोघेही नोकरी करून रग्गड पैसा घरी आणणारे, हॉटेलातील जेवण असा एकूण फंडा वाढीस लागला आहे, जुन्या पिढीची जुनी माणसे याला अजून सरावलेली नाहीत. (काही अपवाद वगळता) त्यांना हा सर्व खर्च म्हणजे उगाचचाच खर्च वाटतो अन मग रहाणीमानात तफावत निर्माण होते, वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होतात, कधी टोकाच्या भांडणाचे, शेवट काय ? तर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात दाखल करणं, भले महिन्याचे चार्जेस कितीही असले तरी ते भरायला, सोसायला या नोकरदार पोरांकडे भरपूर पैसा असतो.
सर्वच ठिकाणी असं चालतंच असं नाही. पण आजकाल बहुतांशपणे वृद्धाश्रमांचा ‘आधार’ घेतलेला दिसतो.

मला काही वृद्धाश्रमांना भेटी द्यायचा योग आला, काही वृध्दाश्रमांच्या गेट बाहेर असणाऱ्या पाट्या वाचनात आल्या. १) ‘गळून पडलेल्या या पाचोळ्यावरून हळूवार चाला, त्यांच्या ऐन उमेदीत त्यांनी सावली दिलेय आपल्याला,
२) ‘ इथे माणसं रहातात ज्यांचं काळीज आधिच फाटलेलं आहे, त्यांना आणखी विदीर्ण करू नका.
३) हे आपलं घर आहे. अगदी घरी राहिल्यासारखे रहा.

किती समर्पक आहेत नं या पाट्या ? संपूर्ण आशिया खंडात असणाऱ्या वृद्धाश्रमांची मोजदाद केली तर असे दिसून येते की सगळ्यात जास्त वृद्धाश्रम हे पुणे जिल्ह्यात आहेत अन पस्तीस पेक्षा जास्त वृद्धाश्रम हे फक्त सिंहगड रोडवर आहेत. म्हणजेच वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही.

काडी काडी जमवून संसार करायचा, पै पै वाचवून पाल्याला शिकवायचा, अन नेत्र थकले, गात्रंही थकली आता सुखाने मुलांकडे जगू असं म्हणताना वृद्धाश्रमाची वाटचाल करायला लागावी हे दुर्दैवच आहे. पिढी पिढीतल्या मानसिकतेत जे बदल होत गेले त्याचीच ही परिणीती आहे का ? असा प्रश्न पडावा.

बघा नं, आजकाल विवाह जमवताना घरात किती ‘डस्ट बीन’ आहेत ? हे ही विचारले जाते, अरे ज्यांनी आज आपल्याला पैशांच्या राशीत लोळता येईल इतपत मोठं केलं ते डस्ट बीन ? याला काय म्हणावं बरं ? फक्त राजा राणीचा संसार असावा, त्यात म्हाताऱ्या माणसांच्या कचऱ्याच्या टोपल्या नसाव्यात असं मनांत असणाऱ्या तरूण पिढीच्या मनाचं संतुलन बिघडलं आहे की काय? हा एक ज्वलंत प्रश्न माझ्यासारख्या वयस्कर माणसाला पडतोच पडतो. स्वामीकृपेने माझा मुलगा, माझी सूनबाई माझी यथायोग्य काळजी घेतात, हे आनंदसूख मी अनुभवतो आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते. दुधावरची साय असणारी माझी दोन नातवंडे, त्यांच्यासोबत माझा वेळ छान जातो. वृद्धाश्रमात रहाण्याची कल्पना जरी मनाला शिवली तरी सर्वांगावर भीतीची थरथर निर्माण होते.

कणकवलीचे कवी श्री राजस रेगे यांची एक कविता “दुसरे घर” ही आहे, त्यात “बाबा आता निघायलाच हवं, गाडीची वेळ झाली” हे आपल्या सासऱ्याला सूनबाई सांगते आहे, वाचतानाच डोळ्यात पाणी येतं हो.

आताच्या तरूण पिढीचे उत्पन्न, त्यांचे वागणे – आचरण, त्यांचे छंद, नाना ढंग, पहाता ज्या वयस्कर, बुजूर्ग मंडळींना त्यात ॲडडेस्ट होता येत नाही त्याला पर्याय म्हणजे वृद्धाश्रम असावा का? Many Hearts Many Minds, हे शेवटी निखालस सत्यच.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. बदलत्या सामाजिक गरजा लक्षात घेऊन वृद्ध व्यक्तींना राहायला सोईचे स्थान असणे ही काळाची गरज आहे. पूर्वी असे नव्हते या विचाराने या गरजेला कुरवाळत बसण्यापेक्षा वृद्धांनी आपल्याला यासाठी मानसिकता बनवली पाहिजे.

  2. अतिशय वेधक , आणि आजच्या तरुण राहणीमानाची मानसिकता ! ….सबब, अशा वृध्द माणसांना का रहायला जावे लागते वृध्दाश्रमात ? याची कारण मिमांसा चिटणीस साहेबांनी मांडली पाहिजे होती, कारण वयाच्या 80 नंतर वृध्द लोकांना ऐकू येत नाही ! …..एकंदर छान लिखाण !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments