Saturday, July 27, 2024
Homeलेख"वृध्दाश्रम" काळाची गरज

“वृध्दाश्रम” काळाची गरज

कोणे एकेकाळी भारतातील संयुक्त कुटुंब व्यवस्था ही जगात गौरविल्या जात होती. पण हळू हळू शहरात आणि आता तर ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने वृद्धाश्रम दिसत आहेत.

आजच्या लेखात लेखिका स्वाती दामले यांनी “वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे” असे समर्थन केले आहे.

याबाबतीत आपल्याला काय वाटते? याविषयीची आपली मते, कल्पना, अनुभव जरूर कळवा.
– संपादक

आजकाल वृध्दाश्रमांची संख्या वाढतच चालली आहे. जवळजवळ प्रत्येक तालुक्यात जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे वृध्दाश्रमांची स्थापना होतांना दिसते. या मागचे कारण काय ? हे आज कुणाला सांगण्याची गरज आहे असे मला तरी वाटत नाही. कारण आपल्या आजुबाजूची परिस्थिती, कुटुंबांमधले वादविवाद, एकमेकांशी होणारे संवाद यातून कळते की प्रत्येक घरात अगदी छोट्या नातवंडांसहित सारेच स्वतःच्या मोबाईलच्या राज्यात व्यस्त असतात. आपल्या घरात अजून कोणीतरी राहतयं, त्यांच्याशी संवाद साधायला हवा ही गोष्टच त्या व्यस्त लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक गपगुमान स्वतःशीच गप्पा मारीत राहतात. त्यात एकच व्यक्ती असेल तर तिची मनःस्थिती आणखीनच वाईट !

आजकाल जवळ जवळ प्रत्येक घरातले तरुण नोकरी व्यवसायानिमित्त परदेशी किंवा बाहेरगावी राहात आहेत. त्यामुळे घरातील त्यांचे जवळचे सदस्य म्हणजे बायको आणि मुले. आईबाबांना फक्त कसे आहात असं विचारलं की झालं. मग या कंटाळवाण्या जीवनातून सुटका मिळण्याचा एकच सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे वृध्दाश्रम !

खरंच! मी स्वतः वृध्दाश्रमात जाऊन दोन दिवस राहून आले आहे. तेथील पुरुष, महिलांशी मोकळेपणी संवादही साधला आहे. कशा आहांत? असं विचारायची खोटी की लगेच सगळ्याजणी आपण किती खूष आहोत हे सांगायला लागल्या. प्रत्येकीचे मत एकच होतं. घरापेक्षाना हे घर छान आहे. कारण आपल्याच वयाची, आपल्याच विचारांची माणसं इथे आहेत त्यामुळे वादविवाद, भांडणतंट्यांना कांही वावच नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांना कुणी ओळखत नाही. त्यामुळे आपल्या मनातले गरळ इथे बिनधास्त ओकता येते आणि मन मोकळे करता येते. इथे राहायला आल्यापासून खेळ, गाणी, गोष्टी, चर्चा, भेंड्या यांत मस्त वेळ जातो. वाचनालयात पुस्तके, वर्तमानपत्रे कधीही वाचायला मिळतात.

जेवणखाण्याची तर काय चंगळच आहे. रविवारी गोड पदार्थ, रात्री दूध ! आणि आपल्या खोलीत जा आणि कधीपण कितीही आराम करा. शिवाय सकाळ संध्याकाळ एकमेकांना सावरत मजेत हिरवळीवर फेरफटका आणि झोपाळ्यांवर झुलायला पण मजा !

सगळ्या पुरुषांची पण अशीच मजा. इथे कॅरम, बुध्दिबळ, पत्ते खेळायचे. आरामात बसून टी.व्ही पण पाहता येतो.

इथे कांही जोडपी फार वयस्कर नव्हती तरी आनंदात राहात होती. त्यातल्या एकाने सांगितलेलं कारण वेगळंच होतं. म्हणाले, “मुलगी सासरी, मुलगा, सून परदेशी. मग रोजचा सकाळचा स्वयंपाक. त्यातून उरलेल्या बरोबर रात्री नविन पदार्थ. त्यात उरलेलं सकाळी खायचं. म्हणजे सारखं शिळपाकं आणि भाजी आणा, बिलं भरा, कपडे धुवा, या सगळ्याचा इतका कंटाळा आला आणि मग ठरवलं इथे यायचं. डोक्याला कुठलाच ताप नाही. सगळं आयतं हातात मिळतं. अगदी आरामात जगतो आहोत. आणि हो, एक महत्वाचं कामही करतो आम्ही दोघं. जे कोणी दुःखात, त्रासलेले दिसतात त्यांच्याशी बोलून त्यांना मन मोकळं करायला सांगतो. काय चाललयं मनात ते एकदा बोलून टाका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि आम्ही कांहीही कुणालाही सांगणार नाही बरं”.

आता एवढं सगळ ऐकल्यावर, परिस्थिती पाहून लक्षात येते आहे ना की आज वृध्दाश्रमांची खरंच किती गरज आहे. आजच्या काळाची गरज वृध्दाश्रम !

स्वाती दामले

— लेखन : स्वाती दामले. बदलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८