जंगल मंगल विद्यापीठातील निवडणूक !
जेव्हा हे आगळं वेगळं जंगल मंगल विद्यापीठ स्थापन झालं तेव्हा पहिल्याच सिनेटमध्ये असा प्रस्ताव मंजूर झाला होता की, इथे कसलही राजकारण चालणार नाही. निवडणुका होणार नाहीत. या विद्यापीठाची उद्दिष्टेच वेगळी होती. निसर्गाचे संवर्धन करायचे. वाघ, सिंह यासारखे हिंस्त्र जंगली पशू असोत, की गाय, बकरी सारखे शांत मवाळ प्राणी असोत, की पशू पक्षी असोत, साऱ्यांनी एकजुटीने राहायचं. आहे ते मिळून शेअर करायचं.
याच उदात्त भूमिकेतून सर्वांनी गजराज यांची कुलपती म्हणून नेमणूक केली. कुलगुरू निवडी विषयी घोळ निर्माण झाला तेव्हा उघड्या, खोल गुहेत चर्चा होऊन अडीच वर्षे सिंह कुलगुरू अन् वाघीण उपकुलगुरू व्हायचं ठरलं. नंतर वाघ कुलगुरू अन् सिंहीण उपकुलगुरू अशी सत्तेची वाटणी झाली. गायी कडे कुलसचिव पदाची जबाबदारी आली, जी तिने अधिष्ठाता रेड्याच्या मदतीने छान सांभाळली.
सगळं व्यवस्थित सुरू असताना, लांडग्याच्या कळपाने कोल्हा, बंदर यांच्याशी छुपे छलकपट करून, मोर्चे काढून नव्याने निवडणुका झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरला. त्यांना उंदीर, मांजर अशा लहान वर्गाची, कावळे, गिधाडे अशा पक्षाची देखील साथ मिळाली. त्यावेळी वाघाची टर्म सुरू होती. त्याच्यावर या सर्व मंडळींनी प्रेशर आणलं. कधी नव्हे ते जंगल मंगल विद्यापीठात दोन तट निर्माण झाले. मग बघता बघता दोनाचे चार असे करता करता सगळं जंगल गटातटात विभागलं गेलं. खास सिनेटचे अधिवेशन बोलवावं लागलं. या सिनेट मध्ये बराच गोंधळ झाला. कोण कोणत्या बाजूने हेच कुलगुरू ना कळेनासे झालं. गुप्त बैठकांचे प्रमाण वाढले.रात्री बेरात्री गुहेत चर्चा व्हायला लागल्या. दबाव इतका वाढला की कुलपती गजराज यांना निवडणुका घोषित कराव्या लागल्या !
कधी नव्हे ती जंगल परिसरात पत्रकारांची वर्दळ वाढली. झाडाझुडपाच्या आडून टी वी चॅनेल चे कॅमेरे सतर्क झाले. चिमण्या पोपट, लांडगे कोल्हे, साप विंचू देखील बाईट द्यायला लागले ! प्रत्येकालाच कॅमेरा समोर मिरवायची हौस निर्माण झाली. काही अल्सेशियान कुत्रे तर रोज पत्रकार परिषदा घ्यायला लागले.
जंगलातल्या विद्यापीठ परिसरातलं वातावरण बघता बघता बदललं. गढूळलं. कुणीही वाट्टेल ते बोलणार, एकमेकावर आरोप करीत सुटणार. अडीच वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं असा जाब विचारणार. त्यानंतर आम्ही आल्यावर चित्र कसं बदललं हे फुशारक्या मारत सांगणार. वाघ, सिंहांनी, कोल्हे लांडगे यांना नावे ठेवायची, लांडग्यांनी कुत्र्यांना, गाढवांना दोष द्यायचा, ढोंगी बगळे, व्हेल मासे यांनी आमच्या सारख्या जलचर प्राण्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं म्हणून आरडाओरडा करायचा, आकाशात उडणाऱ्या पक्षानी आम्हाला स्पेशल स्टेटस, वेगळा दर्जा मिळावा म्हणून चिचिवाट करायला लागले. कधी नव्हे ते मोर्चे, घोषणा, आरोप प्रत्यारोप, शिवीगाळ अशा चिखलफेकिने जंगल मंगल विद्यापीठा चा परिसर दणाणला !
आश्चर्य म्हणजे गजराज देखील हतबल झाल्या सारखे मूग गिळून गप्प बसले. त्यांनी वाघ, सिंहांना तुम्ही तुमचे काय ते बघा, अन् सांभाळा कारभार असे मोकळे रान सोडले..
खरे तर हे या विद्यापीठात अपेक्षित नव्हते. इथे सारे गुण्यागोविंदाने राहत होते. उलट शेजारच्या परिसरातील माणसेच जनावरासारखी वागायला लागली होती. खून, बलात्काराच्या बातम्या रोज ऐकू येत होत्या. स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे रोज वेशीवर टांगली जात होती. जंगलात फक्त पाळीव प्राणी, पक्षी, जलचर असे वर्ग होते. पण शेजारी धर्म, जाती, पोट जाती अशा भिंती होत्या. त्याने समाज विभागला गेला होता. ते एकमेकांचा द्वेष करीत होते. घर, संपत्ती, जमीन जुमला अशा छोट्या मोठ्या कारणाने भांडत होते. काही गडगंज श्रीमंत.. कोट्याधीश.. तर काहींना दोन वेळच्या जेवणाची चिंता ! असंतोष सारखा वाढत होता. कधी तो हिंसाचारात परिवर्तित होत होता. धन दांडग्या राजकारणी पुढाऱ्यांचे कळप वाढत होते. अस्थिरता वाढत चालली.
अन् अचानक बातमी आली की, शेजारच्या प्रांतात निवडणुका होणार आहेत. तशी घोषणाच तिथल्या निवडणूक आयोगाने केली आहे. आचार संहिता की काय म्हणतात ती लागली आहे.
अचानक जंगल मंगल विद्यापीठातील मंडळीच्या लक्षात आलं. सगळे पत्रकार आता शेजारच्या प्रांतात धावून गेले. टी वी च्यानल च्या कॅमेऱ्यानी देखील जंगल मंगल विद्यापीठाकडे पाठ फिरवली. आता मोर्चाचे चित्रीकरण होणार नाही. रोज सकाळी बीट घ्यायला कुणी पत्रकार येणार नाहीत ! मग काय उपयोग आपल्या घोषणांचा, मोर्चाचा, सभांचा ?
आता मोर लांडगे, कोल्हे कुत्रे, गाढव गिधाडे सगळे सावध झाले. आपल्या कडे कुणी ढुंकून बघणार नसेल, आपली दखलच घेणार नसेल तर काय उपयोग या निवडणुका घेण्याचा ? जे आहे, जसे आहे ते ठीक चाललेच होते की ! अन् निवडणुका घेऊनही काय फरक पडणार आहे जंगलात ? त्यापेक्षा जे आहे ते उत्तम चाललेय की ! उलट आपल्याकडे बरीच शांतता आहे. वाघ, सिंह कुणाच्या वाटेला जात नाहीत विना कारण. माकडे, कोल्हे, साप, विंचू सारे आपापल्या जागी खुश असतात. आता माणसे झाडे तोडायला लागली. त्यामुळे पक्षानी घरटी कुठे बांधायची ? नद्या, समुद्र प्रदूषित झाल्याने बगळे, मासे, यांनी काय करायचे ? असे प्रश्न आहेत. पण माणसाचे वागणे अती झाले तर त्यांना धडा शिकवण्याची क्षमता या प्राण्यात निश्चितच आहे.
गजराज यांनी वाघ सिंहा च्या सल्ल्याने खास अधिकार वापरून जंगलातील निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या. जंगल मंगल विद्यापीठ आता पहिले सारखे शांत आहे. आनंदी आहे. शेजारच्या प्रांतात मात्र धूळवड सुरू आहे !
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800