(वृत्त- दिंडी)
काय झाली हो चूक उभयतांची
एक पुत्रासी दूर धाडण्याची
स्वप्न एकच ते मनी जपुन होतो
प्राप्त करुनी यश पूत गृही येतो ॥१॥
लेक भारी हो गुणी आणि ज्ञानी
अती लोभस अन् गोड मधुर वाणी
मान राखी तो वडिल माणसांचा
गर्व नच त्यासी कधीही कशाचा ॥२॥
काय जादू हो असे त्याच देशी
विसर पडतो का त्यास मायदेशी
परत येण्याचे नाव घेत नाही
जवळ वाटे का तोच गाव त्याही ॥३॥
वदे आम्हासी का न तिथे जावे
“सर्व त्यजुनी का कसे सांग यावे
याच मातीतच सरले आयुष्य
याच भूमीतच उर्वरित भविष्य” ॥४॥
नसे आम्हा तर अपेक्षा कशाची
पडो कानांवर खबर तव सुखाची
वृद्ध आम्ही रे आश्रमात जावे
एकमेकासह सुखाने रहावे ॥५॥
दुःख होते रे फार तुझ्यासाठी
कुठे आहे ती आमुचीच काठी
कथा आहे ही बहुतशादिकांची
हरवलेल्या त्या जेष्ठ बांधवांची ॥६॥

— रचना : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर