Sunday, January 19, 2025
Homeसाहित्यव्हॅलेंटाईन डे : काही कविता

व्हॅलेंटाईन डे : काही कविता

१. व्हॅलेंटाईन डे, एक प्रेम दिवस

संदेश प्रेमाचे
साठवावे हृदयात
समर्पण व्हॅलेंटाईनचे
रुजावे मनात.

ध्यास प्रेम
श्वास प्रेम
आयुष्याचे बलिदान प्रेम

साम्राज्य पसरावे
परस्परप्रेमाचे
उमाळ्याच्या सुखद भावाचे

गतस्मृतींना धुमांरे फुटावेत
आठवांचे मोहोळ उठावेत

गुलाब, मोगरा सुगंध पसरावा
गाठी भेटीचा आनंद साजरा करावा

स्मरण दिन तो अमर झाला
प्रेमाची कबुली देऊन गेला

पुन्हा पुन्हा प्रेमदूतास स्मरावे
कृतज्ञतेने मन भारून जावे

एक ओंजळ सुमनांची
ग्वाही हृदयी स्नेहाची

— रचना : मीरा जोशी

२. मुग्ध प्रेम

प्रेम म्हणजे प्रेम असतं
गुलाबाचे गुलाबावर असतं फार
गुलाबाचे मोगर्‍यावर असतं
जाई, जुई, चमेली संगे हार

चेहर्‍यावर गुलाब फुलतो
मना मनात प्रेम उमलतं
दरवळ कोडं उलगडतो
ज्याचं त्याला उमजतं

जेव्हा जाणीव होते मनास
स्पर्श, नजर, विलगल्या ओठातून
शब्द कधी बोलके कधी मौन
कळावे निरागस चुंबनातून

अनायास प्रेमास रंग यावा
पाकळीने दवबिंदू झेलावा
भावनांचा जलद कल्लोळ व्हावा
गालावर आसू एक ओघळावा

मुग्ध व्हावे ऐशा प्रेमावर
न विसरलेला ऐसा क्षण
आठवून कां न झुलवावा ?
दिन-विशेष असा तो विलक्षण !!

– रचना : विजया केळकर. नागपूर

३. प्रेम गाथा

कापूर ठेवता टोकाला, क्षणातच पेटते वात
अखंड उजळते जीवन स्नेहाची मिळता साथ

खूण पटता निजांतरीची प्रेम जडे निमिषात
चैन पडेना जीवाला अस्वस्थता उरी अंतरात

मनाचा विचार होता प्रेमात नसतो व्यवहार
कठोर समाजाचे होतात कधी शब्दांचे प्रहार

प्रेमाची नसते काही परंपरा किंवा परिभाषा
दोन मनांना ती अडचण ठरत नसते भाषा

जुळली मने, मते, मैत्री लाभता दीर्घ सहवास
रोजचे जाणे येणे सर्व मोसमी एकत्र प्रवास

परिपूर्ण नसे कोणी ठायीअसतात गुणदोष
यावे मग फुलपाखराने बाहेर फोडूनी कोष

प्रेमात असते अनुसरण शरण समर्पण
नितळ निर्मळ असावा सदा समाजाचा दर्पण

प्रेमात नसते हक्काची निव्वळ कर्तव्य भावना
स्वच्छंद जगाया प्रेमात नसते केवळ वासना

प्रेमात ओलांडायचा कधी परिवाराचा परिघ
प्रेमात पार करायची संस्कारांची लक्ष्मण रेघ

मनस्वी वर्तनी बेसावध क्षणांची होते मग खबर
वर्तमान होता इतिहास नोंदते प्रेम गाथा, बखर

— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments