माझी मोठी बहीण (नात्याने आत्याची मुलगी, पण माझ्याच आई-वडिलांना आपले पालक मानणारी आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी) सौ. माधवी सतीश वैद्य, म्हणजेच आमची सर्व भावंडांची लाडकी “सुताई“
(पूर्वाश्रमीची कुमारी सुनील हेमचंद्र राजे) हिचा दिनांक १२ एप्रिल, २०२४ रोजी तारखेने आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच तिथीनुसार ७५वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करायचा होता. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचेच “शब्द-माधवी” पुस्तक रुपात निर्माण करून तिला आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करत होते; पण संपूर्ण जगाला आपले प्रेम देण्यासाठी उत्सुक असलेली ही आमची ताई त्याआधीच दिनांक ९ एप्रिल, २०२४ रोजी अल्पशा आजाराचे निमित्त होऊन, आम्हाला सोडून देवाघरी गेली. तिच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला तिच्या पुस्तक प्रकाशनाचा समारंभ करण्याची आमची इच्छा तिच्या निधनानंतर, स्मृतीदिनानिमित्त पूर्ण करावी लागली. दु:खात सुख इतकेच की “पुस्तक छापून त्याच्या प्रती घरी आलेल्या आहेत” ही बातमी तिच्या आजारपणात आम्ही तिच्या कानावर घातली आणि त्यानंतर तिने समाधानाने डोळे मिटले. मात्र त्या पुस्तक वेडीने तिच्या स्वतःच्या पुस्तकाचा स्पर्श, सुगंध आणि शब्द-स्वाद ह्यांचा आस्वाद अनुभवलाच नाही.
शेकडोंनी पुस्तके स्वतः विकत घेऊन वाचणारी, त्यावर भरभरून बोलणारी आणि इतरांना भेट स्वरूपात पुस्तके विकत घेऊन देणारी आमची ताई आज तिचे पुस्तक हातात घेऊन पाहू शकत नाही, ही खंत मनात आहेच; परंतु दिनांक २३ एप्रिल हा “जागतिक पुस्तक दिन” म्हणून साजरा होत असतानाच आमच्या ह्या “पुस्तक-वेड्या” बहिणीचे पहिलेवहिले आणि आता एकमेव पुस्तक “शब्द-माधवी” आम्ही आमच्या स्मृती-गंध समूहातर्फे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, हे समाधानही थोडे नाही.
शाॅपिझन प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या आणि स्मृती-गंध समूहातर्फे निर्माण करण्यात आलेल्या ह्या पुस्तकातील साहित्याचे संकलन व संपादन स्मृती-गंध समूहाच्या संचालिका,म्हणजे मी (सौ.मृदुला राजे) व माझी कन्या प्राची राजे ह्यांनी केलेले असून , पुस्तकामध्ये प्राची राजे ह्यांचा “संचालिकेच्या नजरेतून” हा लेख, माझी प्रस्तावना आणि सौ.माधवी वैद्य ह्यांची कनिष्ठ भगिनी सौ. स्मिता वैद्य ह्यांचा शुभेच्छा संदेश समाविष्ट आहे.
मराठी तिथीनुसार हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच जन्माला आलेल्या माझ्या ताईला मी तिचेच “शब्द-माधवी” पुस्तक अर्पण करून त्यातली माझी “प्रस्तावना” इथे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्या लाडक्या ताईला सादर वंदन. शब्द-माधवी, प्रस्तावना…
“माझी बहीण सौ. माधवी वैद्य (पूर्वाश्रमीची कु. सुनील हेमचंद्र राजे ) हिच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे आणि त्याला प्रस्तावना लिहिण्याचा सन्मान मला मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजते.
सौ.माधवी वैद्य ही नात्याने माझी आत्ते बहीण; पण सख्ख्या मोठ्या बहिणीचे प्रेम आणि जिव्हाळा तिच्याकडून मला नेहमीच लाभत आला. माझ्या प्रत्येक सुखदुःखात ती वाटेकरी झाली, आणि सुखाचे माप भरभरून वाहात असताना माझे कौतुक केले, तसेच संकटांना सामोरे जाताना प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीशी उभी राहिली. आज तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, तर तिच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण वळणावर तिच्या पाठीशी उभे राहण्याचा हा एकमेव पर्याय देवाने मला उपलब्ध करून दिला आहे ; तो म्हणजे तिने हौसेने फुलवलेली ही साहित्यिक वाटिका सर्व कुटुंबीय आणि मित्र-परिवाराला वाचण्यासाठी खुली करून देणे, ह्या “फुलवेडी”ची साहित्य-सुमने वाचकांपर्यंत पोहचवणे आणि त्यातील मधुगंध “शब्द-माधवी” ह्या स्वरूपात वाचकांच्या मनात, हृदयात दरवळत ठेवणे ! आज ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून मी कृतकृत्य झालेली आहे.
आमची आजी कै.सौ.सरस्वती बाई फडणीस ही शतकापूर्वी जन्मलेली असूनही आधुनिक विचारांची आणि प्रगल्भ बुद्धीची कवयित्री होती. तिचे काव्यलेखन कोठेही प्रकाशित झाले नसले, तरीही ते आम्हां नातवंडांना नेहमीच प्रेरणादायी ठरले, आणि तिचा हा साहित्यिक गुणधर्म घेऊन आम्ही तिची काही नातवंडे साहित्य-लेखन करू लागलो.
सौ. माधवी वैद्य ह्यांची आई कै.सरला हेमचंद्र राजे ह्यांनी सुद्धा कधी कौटुंबिक कारणास्तव, तर कधी उत्स्फूर्तपणे कविता, लेख लिहून आपल्या आईचा साहित्यिक वारसा पुढे नेण्यासाठी मदत केली. दुर्दैवाने त्यांचे लेखनही प्रकाशित होण्याची संधी मिळाली नाही, पण आपल्या आईच्या जन्मदिवशीच जन्माला येऊन आईचे स्वभावधर्म व साहित्यिक गुणधर्म अंगिकारत, त्यांची ही ज्येष्ठ कन्या सौ. माधवी वैद्य, कधी स्वानंदासाठी, तर कधी इतरांना आनंद देण्यासाठी लेखन करत राहिली.
सौ. माधवी वैद्य ह्यांचे वडील कै.हेमचंद्र शंकर राजे हे एक अतिशय उत्तम चित्र-शिल्प कलाकार तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांची साहित्यिक क्षेत्रातील वाटचाल सुद्धा उल्लेखनीय होती. त्यांनी कलाक्षेत्रात मार्गदर्शन करणारी काही पुस्तके लिहिली; एवढेच नव्हे, तर दोन स्वतंत्र व्यावसायिक नाटके सुद्धा लिहून, ती रंगमंचावर गाजवली.
अशा रीतीने आजी, आई व वडिलांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या सौ.माधवी वैद्य ह्या आपले साहित्यिक सुप्त गुण घरच्याघरी, स्वतःच्या वहीमध्ये व्यक्त करत, अनेक वर्षे लेखन करत आहेत. त्यांच्या ह्या लेखन कलेचा आस्वाद इतर कुटुंबियांना व मित्र परिवारालाही घेता यावा, त्यांच्या माध्यमातून समाजातील इतर वाचकांपर्यंत पोहचावा आणि मुख्य म्हणजे ह्या मधुस्त्रावासारख्या मधुर साहित्याचा मनमुराद आनंद सर्वांना लाभावा, ह्या हेतूने “स्मृती-गंध समूहा”तर्फे सौ.माधवी वैद्य ह्यांचा हा पहिलाच लेखन-संग्रह प्रकाशित करण्यात येत आहे.
“शब्द-माधवी” मधले लेखन नावाप्रमाणेच गोड आहे, मधुर आहे. ह्या संग्रहात सौ. माधवी वैद्य ह्यांच्या तेरा निवडक कविता, पाच लेख आणि तीन कथांचा समावेश करण्यात आला आहे. असा हा एकवीस साहित्यिक मोदकांचा नैवेद्य माधवी ताईंनी श्री गणेश चरणी अर्पण केला आहे., आणि तो गणपती बाप्पाच्या मोदकांइतकाच मधुर आणि रसाळ आहे, स्वादिष्ट आहे. ह्यांपैकी बहुतेक कविता, लेख वगैरे व्यक्तिनिष्ठ किंवा प्रसंगनिष्ठ असून, आपल्या कुटुंबियांना अर्पण केलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेली हृदयंगम कविता किंवा आपली कन्येसम भाची आणि पुतणी सौ.जुईली हिच्या लग्नाच्या निमित्ताने लिहिलेली मंगलाष्टके, ह्या कविता जरी कौटुंबिक असल्या तरी त्यातले काव्यगुण कौतुकास्पद आहेत.
लेख विभागात सौ.माधवी ताईने तिचे वडील कै.हेमचंद्र राजे ह्यांच्या जन्म-शताब्दी निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करणारा जो लेख लिहिला होता, आणि स्मृती-गंध समूहाच्या माध्यमातून तो विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आला होता, त्या लेखाचे संकलन करण्यात आले आहे. आपल्या पित्याबद्दल अत्यंत अभिमानाने लिहिलेला हा लेख म्हणजे माधवी वैद्य ह्यांच्या साहित्य लेखनाचा मानबिंदू आहे. अशाच आपल्या आईला, मामीला अर्पण केलेल्या आदरांजली स्वरूप लेखात किंवा त्यांच्या जीवनाला आकार देणारे “बाळमामा” ह्यांना शुभेच्छा देणा-या लेखात माधवी ताईंचा हृदयंगम भावाविष्कार पाहावयास मिळतो. ह्या विभागातील “मैत्र जीवाचे” हा लेख छोटासाच असूनही ललितलेखनाचा सुंदर आविष्कार आहे.
कथा विभागातील मोजक्याच पण भावपूर्ण कथा माधवी ताईंच्या लेखणीचा मोठा आवाका उलगडून दाखवतात. ह्या तीनही कथा “भाऊबीज” , “आईची माया” आणि “दैव जाणिले कुणी” ह्या आशयसंपन्न आहेत, स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणा-या आहेत, आणि मुख्य म्हणजे वाचकांच्या मनाचा ठाव घेत, त्यांना गुंतवून ठेवणाऱ्या आहेत.
हा लेखन-संग्रह फक्त एकच साहित्य प्रकार हाताळणारा नाही, तर सर्वसमावेशक आहे आणि लेखिकेचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व सिद्ध करणारा आहे.
लेखिका सौ. माधवी वैद्य ह्यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्याच साहित्याचे संकलन करून, त्यांना स्मृती-गंध समूहातर्फे ही शब्दरूप भेट देण्यात येत आहे. लेखिकेला उदंड आयुष्य लाभावे आणि तिच्या हातून पुढच्या आयुष्यात अधिक सकस, दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहावी, ह्या शुभेच्छांसहित मी हा “शब्द-माधवी” संग्रह वाचकांच्या स्वाधीन करत आहे. माधवी ताईंचे हे लेखन वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा व्यक्त करत मी माधवी ताईंना मनःपूर्वक शुभेच्छा देते.”
— लेखन : सौ. मृदुला राजे. जमशेदपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800