Saturday, July 27, 2024
Homeसेवाशरणागति तर झाली. पुढे काय ?

शरणागति तर झाली. पुढे काय ?

१९७१ च्या भारत पाकिस्तान युध्दात भारताचा विजय झाला. बांगलादेश मुक्त झाला. या युध्दात मेजर विनायक गुप्ते यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. पण ९३००० युद्ध कैद्यांना भारतात हालवायचे म्हणजे सोपे काम नव्हते. बांगलादेशची वाहतूक व्यवस्था फारशी प्रगत नव्हती. इतक्या मोठ्या संख्येने युद्धकैदी हालवायचे, तेही सुखरूप आणि शक्य तितक्या कमी वेळात म्हणजे आर्मी समोर मोठेच आव्हान उभे राहिले.

आम्ही तातडीने तात्पुरते कॅम्प (Transit camps) आणि Semi permanant तुरुंग उभारण्यास सुरुवात केली. एकेक समस्या हळूहळू सुटू लागल्या. कैद्यांना स्वसंरक्षणा पुरते शस्त्र व अगदी थोडा दारुगोळा बाळगण्याची परवानगी दिली. कारण आता बांगलादेशींचा attitude बदलला होता. कोण केव्हा एकट्या दुकट्यावर हल्ला करेल नेम नव्हता. Transit camps उभे राहिले, आर्मीने बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सरकारने स्थायी स्वरूपाची जागा युद्धकैदी ठेवण्यासाठी देऊ केली. ह्या संपूर्ण कार्यात इंडियन रेल्वेने खूप मोलाचे, उल्लेखनीय सहकार्य केले. आणि १५ जानेवारी १९७२ पर्यंत सर्व कैदी भारतात transfer करून झाले.

जागतिक इतिहासाकडे पाहिले तर बहुतांश सुसंस्कृत देशांनी म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका ह्या देशांनी जागतिक महायुध्दाच्या वेळी कैद्यांना जिनिव्हा करारानुसार नीट वागणूक दिली. जपानने मात्र चीनी कैद्यांना नीट वागवले नाही. मात्र ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन कैद्यांना वेगळी वागणूक दिली.

दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने रशियन कैद्यांना अत्यंत निर्दयतेने वागवले. अधिक खोलात शिरू गेलो तर ‘ युध्दकैद्यांना वागवणे ‘ हा एक वेगळाच विस्तृत विषय होईल. म्हणून तूर्तास आपल्या विषयाकडे वळतो.
भारतीय म्हणून सांगताना मला अभिमान वाटतो की येवढ्या प्रचंड संख्येने पाकिस्तानी कैदी आपण भारतात आणले पण त्यांना अत्यंत आदर्श वागणूक दिली. माणुसकीने वागवले.
उदाहरणच द्यायचे तर फैमिलीसह राहणारा सिव्हिलियन स्टाफही त्यात होता. ह्या काळात ३०० मुलांनी जन्म घेतला.फक्त १९७१ च नाही तर १९६२, १९६५ च्या युद्धानंतरही आपण कैद्यांना नेहमीच सहानुभूतीने वागवले.

मुख्य मुद्दा :-

मुक्तिबाहिनी उभारण्या पासून, ट्रेनिंग देण्यासाठी मेजर गुप्ते मार्च ७१ मध्ये बांगला देशात गेले. ते सर्व बंगाली बनून, वेषांतराने ट्रेनिंगचे काम करत होते. त्यांनी सिव्हिलियन किंवा शेतकऱ्यापासून युद्धाचे ट्रेनिंग देऊन सैनिक निर्माण केले. तिथपासून ३ / ४ डिसेंबरला प्रत्यक्ष युद्ध सुरु झाले ते १६ डिसेंबरपर्यंत. नंतर Surrender. असे एकूण १० महिने सलग ते बांगला देशात ( पूर्व पाक ) होते. युद्ध संपले आणि पुन्हा ते 16 राजपूत, 165 Mountain Brigade मध्ये join झाले. वाटले ‘ चला ! हुःश ! आता थोड़ी रजा घेण्याची गरज आहे” .
हा विचार त्यांच्या मनात येण्याचाच अवकाश की, ब्रिगेडियर पन्नू ह्यांनी 16 Rajput च्या २ कंपनीज घेऊन, मालदा येथे 5000 कैदी ठेवता येतील असा कॅम्प उभारण्याची ऑर्डर दिली.

“मेजर गुप्ते, पश्चिम बंगाल मधील मालदा ह्या ठिकाणी तातडीने P O W कॅम्प उभारण्याचे काम सुरु करण्याची ऑर्डर तुम्हास देत आहे. ताबडतोब मालदा येथे पोचावे व कार्य सुरु करावे .” (आराम हा शब्द सैनिकांच्या शब्दकोषात नसावा.)
मेजर गुप्ते यांनी पायांतले बूटही काढले नव्हते तोच ही तातडीची ऑर्डर हातात. त्यांनी तसेच ताबडतोब ‘ नटोर ‘ सोडले. बरोबर चार सैनिकांचा छोटा escort घेतला होता. त्यांच्या दोन कंपनी दुसऱ्या दिवशी join होणार होत्या. साधारण मध्यरात्रीच्या सुमारास ते मालदा येथे पोचले. हातात वेळ फार कमी होता. त्यामुळे सरळ तडक कलेक्टरच्या बंगल्यावर गेले. मध्यरात्री त्यांना पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. पण तोपर्यंत सगळाच अधिकारी वर्ग 24 x 7 कार्यरत असायचा.
मेजर गुप्ते यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच त्याने तत्काळ त्यांना त्याच्या बंगल्यातच एक स्वतंत्र खोली दिली. त्यांच्या माणसांना रेस्ट हाऊसमध्ये जागा दिली. कलेक्टर जागा म्हणजे सगळा स्टाफही जागा हे सांगायाला नकोच.

मेजर गुप्ते,

हे सर्व नटोरहून आलेत म्हणजे जेवलेले सुद्धा नसणार हे जाणून संभाषणाच्या मध्येच दोन मिनिटे आत जाऊन त्याने त्याच्या पत्नीला उठवले व आमच्या जेवणाची सोय करण्यास सांगितले.
त्याची पत्नीही त्याला साजेशीच होती. मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने स्वैंपाकघर सुद्धा बंद होते व किचन स्टाफला सुट्टी दिली होती. ती माऊली इतकी दयाळू, कर्तव्यदक्ष की स्टाफला न उठवता तिने स्वतः स्वैंपाक केला आणि सर्वांना गरमगरम जेवण वाढले. जोडीला रसगुल्ले ! १० महिन्यांनी नजरेस पडलेले !
[अधिकारी नवऱ्यांच्या बायका सुद्धा अनेकदा अशा कर्तव्यदक्ष असतात. कर्तबगार नवऱ्याला, कोंदणच जणू ! ]
सर्व माणसे जेवून तृप्त झाली.

जेवणाची सिद्धता होईपर्यंत कलेक्टर आणि मेजर गुप्ते बोलत बसलो होते. त्याने विचारले,
“व्ही . डी. ( मेजर गुप्ते यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म) युद्ध संपले, जिंकले सुद्धा आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी काय मदत करू शकतो ? “
मी : ” ५००० सैनिकांसाठी कॅम्प उभा करायचा आहे, उद्या पासून ट्रकने कैदी यायला सुरुवात होईल.” इ. सांगितले . आतापर्यंत रात्रीचे दोन वाजून गेले होते. कलेक्टर म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही थोडा आराम करा आपण सकाळी ६ वाजता बाहेर पडू ! “
आराम कसला करतो ? हां! मस्त आंघोळ करून फ्रेश झालो. पावणे सहाला खोलीत चहा, बिस्कीटे हजर !
ठीक सहा वाजता बंगल्यातून बाहेर पडलो. एका सरकारी शाळेच्या मोठ्या इमारतीत पोचलो. ( कलेक्टर स्वतःही रात्रभर झोपला नव्हताच.) सुमारे २० सिव्हिल ऑफिसर आमची वाट पहात हजर होते . कलेक्टरने बंगाली भाषेतून त्यांना विविध कामे नेमून दिली . ” संध्याकाळी ६ पर्यंत तयारी पूर्ण व्हायला हवी . पण ऑर्डर नाही . भाषा विनंतीची🙏
ठरलेल्या वेळेवर आम्ही पोचलो तर आश्चर्याने तोंडात बोट घालायची पाळी आली.

POW Camp पूर्ण तयार !🤔
शाळेच्या सभोवती १२ फूट उंचीचे इलेक्ट्रिक वायर कुंपण , ज्यातून इलेक्ट्रिक करंट खेळवला होता,
१५ फूट उंचीचे आठ Watch Towers, जाण्यायेण्या साठी फक्त दोन गेटस , पाण्याच्या मोठाल्या टाक्या, धान्य, भाज्या, दूध, फळे , जळाऊ लाकूड इ.नी सुसज्ज स्वैंपाकघरे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास तयारी म्हणून जनरेटर्स, त्याबरोबर मेंटेंनन्स टीम, मेडिकल टीम, टेलिफोन्स !
बापरे ! एका प्रिझनर कॅम्पला लागू शकणारे सर्व उपलब्ध केले होते . तेही जेमतेम १२ तासात !
जिल्हा मुख्यालयाचे हे काम बघून मेजर गुप्ते फारच प्रभावित झाले . सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना “बाबू ” म्हणून हिणवले जाते आणि उपहासाने बघितले जाते . ” बाबू ” लोकांचा हा करिश्मा सर्वांनी मुद्दाम दोनदा वाचावा अशी मी विनंती करते .

सरदार पटेल IAS / lCS लोकांना Steel Frame ( पोलादी स्तंभ ) म्हणत त्याचा प्रत्यय आला.
इतकेच नव्हे तर सिव्हिल अथॉरिटींनी कैद्यांच्या करमणुकी साठी हिंदी सिनेमा दाखवण्याची सुद्धा सोय केली होती. मुगल-ए – आझम तर त्यांचा आवडता पिक्चर . मधुबाला स्क्रीनवर दिसताच कैदी उठून उभे रहात व टाळ्यांचा कडकडाट होई. अनारकली हा दुसरा आवडता पिक्चर .
मालदा येथे आपण स्थापलेला कॅम्प बेस्ट कॅम्प होता. अर्थात कलेक्टर आणि त्याचा स्टाफ ह्यांनाही श्रेय द्यायला हवे. अनेकांच्या सहकार्यानेच असे भव्य काम शक्य होते.
कलेक्टरने करून घेतलेले हे नेत्रदीपक काम पाहून आनंद तर झालाच पण प्रश्न उभा राहिला कारण खर्चाच्या sanction बद्दल लेखी सरकारी आदेश किंवा ऑर्डर काहीच नव्हते . मी तसे कलेक्टरला विचारले ,
” हा इतका खर्च कोण देणार? “
कलेक्टरने प्रेमाने , आपुलकीने त्याचा आश्वासक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि हलकेच माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला,
” मेजर गुप्ते ! खर्चाची काळजी करू नकोस . तुम्ही युद्धात इतकी अमूल्य कामगिरी बजावली आहे, युद्ध जिंकले सुद्धा आहे आता आम्हाला आमचे कर्तव्य करु द्या . तुम्हाला किंवा इंडियन आर्मीला एका कवडीचेही बिल आम्ही देणार नाही निश्चिंत रहा . “
इथे मुद्दाम नमूद करते की इलेक्ट्रिसिटी , पाणी, डाळ, तांदूळ भाज्या, फळे, दूध इ. पुरविणाऱ्या कोणीही पैसे घेतले नव्हते अगदी ट्रक, टॅक्सी, रिक्षा चालवणाऱ्यांनी सुद्धा !
केवढा हा मोलाचा सहभाग !

POW Camp Malda- Part ll

कैद्यांना रेल्वेने transfer करायला सोईस्कर व्हावे म्हणून निरनिराळ्या रेल्वे स्टेशनांच्या जवळपास prisoners camp उभारण्यात आले होते . माझा मालदा येथील कॅम्प हा त्यातीलच एक . माझी 16 Rajput unit युद्धबंदीना नटोर पासून मालदा येथे घेऊन येण्याच्या escort duty वर नेमली होती. कॅम्प मधील मजेदार अनुभव सांगतो .
२४ डिसेंबर च्या संध्याकाळी ते दुसऱ्या दिवशी येणा-या बंदींची यादी वाचत होते . इतक्यात त्यांच्या कानावर आवाज पडला,
” हॅलो मेजर गुप्ते ! तू प्रसिद्ध लेग स्पिनर सुभाष गुप्तेचा नातेवाईक आहेस का? “
मान उचलून वर पाहिले तर प्रश्न विचारणारा होता, पाकिस्तानचा प्रसिद्ध लेग स्पिनर कर्नल शुजाउद्दीन ! २७ टेस्ट मॅचेस खेळलेला . १९५२-५३ आणि १९६० – ६१ मध्ये पाकिस्तान टीमबरोबर भारतात आलेला. त्यामुळे त्याचे क्रिकेट क्षेत्रात खूप मित्र होते. मेजर गुप्ते स्वतः आर्मी कडून क्रिकेट खेळलेला, क्रिकेटप्रेमी आणि फर्स्ट क्लास क्रिकेट अंपायर होतो . त्यामुळे आमच्यातील कैदी व केअरटेकर हे नाते केव्हाच संपले. आम्ही क्रिकेट मित्र बनलो. एकत्र बसून चहा, बिस्कीटे आणि क्रिकेटच्या गप्पा चालायच्या . १९७१ मध्ये सुद्धा त्याला प्रसिद्ध उद्योगपती , टेस्ट क्रिकेटर श्री.माधव आपटे ह्यांच्या पेडर रोडवरील आलिशान बंगल्यातील डिनरची स्पष्ट आठवण होती.
असेच आम्ही दोघे जात असताना मी ब्रेकफास्ट साठी थांबलो . कर्नल शुजाउद्दीन बरोबरच होता म्हणून त्यालाही बोलवले . मी एका छोट्या Suite मध्ये होतो तिथे पूजेची खोली होती. कर्नल शुजाउद्दीनने त्या खोलीत नमाज पढण्याची इच्छा व्यक्त केली . मी लगेच अनुमति दिली . माझा सेवेदार (ऑर्डर्ली ) आणि गार्डस ना ही गोष्ट आवडली नाही, हे माझ्या नजरेतून सुटले नव्हते . मी कर्नलला नमाज पढण्यासाठी खोलीत एकटे सोडले आणि माझ्या माणसांना बाहेर बोलवून समजावून सांगितले की ही पूजेची खोली आहे, इथे कोणत्याही धर्माचा माणूस त्याच्या धर्माच्या पद्धती प्रमाणे पाहिजे त्या देवाची प्रार्थना करू शकतो. मी स्वतः देखील नेहमी एक छोटीशी, चांदीची गणेशमूर्ती जवळ बाळगत होतो आणि ती माझ्या खोलीत प्रामुख्याने दिसेल अशी ठेवलेली असायची . ( सर्व युद्धांमध्ये हा गणपती माझ्या सोबत, खिशात असायचा. )

छोटे छोटे अनुभव

650 कैदी घेऊन आम्ही प्रवास करत होतो . . बहुधा जेवणाच्या वेळी त्यांच्यातील एक पळून गेला खूप शोधाशोध करूनही सापडला नाही . वरिष्ठांकडे नोंद केली . दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून नदीकिनारी एक ओळख न पटलेला मृतदेह सापडल्याचा रिपोर्ट दिला. बॉडी ओळखू येण्याच्या स्थितीत नव्हती . गुपचूप पळून जाणाऱ्या त्याला बहुतेक खूप मारपीट केली असावी . युद्धातून परत न आलेल्यांना सुदैवाने त्यांचे देश पेन्शन देतात .
१० जानेवारी १९७२ पर्यंत बरेचसे कैदी जवळपासच्या रेल्वे स्टेशनां वरून transit camp पर्यंत पोचवले गेले होते . तिथून ते रोज एका ट्रेनने एका वेळी १००० कैदी प्रमाणे परमनंट कॅम्पला बिहार, उतरप्रदेश, मध्यप्रदेश असेपोचवले जात होते . त्यांचे रेशन , वैद्यकीय व पोस्टल सुविधा इंडियन आर्मी प्रमाणेच होते .शिवाय 145/- रु महिना प्रमाणे साबण तेल आणि बीडी करिता भत्ता दिला जाई . बीडी वर ते फार खूष असत.

पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न

१६ / १७ डिसेंबर ७१ च्या रात्री 205 Pak Infantry Division Commander, Brigadier Tajmul Hussain Malik, त्याचा एक ऑफिसर आणि छोटा escort पळून गेले . रात्रभर पळत राहून सिलिगुरी जवळ बॉर्डर ओलांडून, काठमांडू मार्गे पाकिस्तानांत जाण्याचा त्यांचा बेत होता . पहाट होण्यापूर्वी थोडा वेळ ते Mango Grove मध्ये लपले . रात्रीच्या अंधारात पुन्हा पळण्याची त्यांची योजना होती . आणि अचानक ……
प्रातर्विधीसाठी आलेल्या खेडुतांनी त्यांना लपलेले पाहिले , कुत्रेही भुंकू लागले . गावातील लोकांनी चपळाई करून सर्वाना पकडले आणि मारहाण सुरू केली त्याचवेळी इंडियन आर्मीचे गस्तीवरील सैनिक गोंधळ ऐकून तेथे आले . त्यांनी ब्रिगेडियर व त्याच्या बरोबरच्या लोकांना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आणि नंतर Pow Camp मध्ये त्यांची रवानगी केली .
आगीतून फुफाट्यात !
विशेष म्हणजे हाच ब्रिगेडियर तजमुल हुसेन मलिक ‘हिली ‘ येथील लढाईत आमच्या विरुद्ध खूप शौर्याने लढला होता.

सुलभा गुप्ते

— लेखन : सुलभा गुप्ते.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८