Saturday, January 18, 2025
Homeसाहित्यशासकीय अधिकारी संमेलनाचे फलित

शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित

शासकीय अधिकारी म्हटलं की, बऱ्याचदा काही मोठी सकारात्मक प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे येत नाही. पण सर्वच शासकीय अधिकारी तसे नसतात, नाहीत, हे पुण्यात झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या  साहित्य संमेलनाने दाखवून दिले. त्यामुळे  ज्या कुणाला या संमेलनाची मूळ कल्पना सुचली त्यांचे आणि या संमेलनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या  पुणे महानगर पालिका, यशदा, संवाद संस्था आणि इतर सर्व संबंधितांचे प्रारंभीच अभिनंदन केले पाहिजे.

पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात २० ते २२ डिसेंबर २०२४ अशा तीन दिवस चाललेल्या संमेलनाला जोडूनच या रंग मंदिरातील कलादालनात भरविण्यात आलेले पुस्तक प्रदर्शन आणि विशेषत: चित्रकार, छायाचित्रकार, नाणी संग्रहक काष्ट शिल्पकार, खडू कलाकार अशा जवळपास २० अधिकारी, कर्मचारी यांनी मांडलेल्या कलाकृती या जणू संमेलनाचे विशेष आकर्षण ठरल्या.

महत्वाचे म्हणजे या कला दालनात तरी अधिकारी – कर्मचारी असा भेदभाव ठेवला नसल्याचे पाहून आनंद झाला. एखादा सफाई कर्मचारी सुध्दा किती मोठा कलाकार असू शकतो, हे या दालनात पाहायला मिळाले. अन्य काही कलाकार देखील कर्मचारी संवर्गातील होते. कलेला जसं जातीपातीचे, धर्माचे, देशाचे, प्रांताचे, वयाचे असे कसलेच बंधन नसते, तसे ते कुठल्या पदाचे ही नसते, हे इथे पाहायला, अनुभवयाला मिळाले, ही या संमेलनाची मला तरी मोठीच फलश्रुती वाटली.

सुनील महाजन यांचे मनोगत 👇

संमेलनाचे विशेष म्हणजे, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, त्यामुळे साहित्य निर्मितीत निर्माण होणाऱ्या अडचणी, परराज्यातील मराठी अधिकाऱ्यांचे अनुभव अशी अधिकाऱ्यांच्या कामाची कक्षा विचारात घेऊन विषय निवडल्या गेले होते. या अनुषंगाने आयोजित परिसंवादात, चर्चासत्रात, मुलाखतीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी अतिशय हिरीरीने भाग घेऊन आपली मते, विचार, अनुभव मांडले. तीन  दिवस चाललेल्या या संमेलनाचे सूत्र संचालन व्यावसायिक नव्हे तर स्वतः अधिकारी असलेल्या डॉ. सोनाली घुले – हरपाळे, प्रांजल शिंदे – चोभे यांनी अतिशय सफाईदारपणे, प्रसन्नपणे, समयसूचकता दाखवत करून “हम भी कुछ कम नहीं” हे सिध्द केले.

संमेलनाचे उद्घाटन करताना, शासकीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘यशदा’ चे महासंचालक निरंजन सुधांशू यांनी, या संमेलनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कलागुण मांडण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे नमुद करत ‘यशदा’त शासकीय अधिकाऱ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा, म्हणून कायम स्वरुपी कलादालन उघडण्यात येईल, याचे सूतोवाच केले. याला जोडूनच शासकीय सेवेतील आजी माजी अधिकारी कर्मचारी यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनासाठी सुध्दा या कला दालनात जागा देण्याबाबत अवश्य विचार करावा असे सुचवावेसे वाटते.

यावेळी अधिकारी सर्वश्री शेखर गायकवाड यांच्या “इलेक्शन स्कृटिनी अँड नॉमिनेशन”, सरकारी ऋतुचक्र, शंकरराव मगर लिखित, “विद्येच्या प्रांगणातील संघर्ष यात्री”, गणेश चौधरी लिखित, “ग्रामीण विकासातील माझे प्रयोग”, दिगंबर रोंधळ लिखित, “कुळ कायदा”, राजीव नंदकर लिखित, “सुखाचा शोध” आणि प्रा डॉ भावना पाटोळे लिखित “उत्तर भारतातील मंदिरे” या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

संमेलनाचे उद्घाटन करताना निवृत मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांनी प्रारंभीच आपण एक वाचक म्हणून इथे बोलणार आहोत असे सांगून त्यांच्या वाचन प्रेरणेचे मूळ, भावलेली पुस्तके याचे विवेचन करून, शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता जपावी, असे सार्थ आवाहन केले. यावेळी इतरही वक्त्यांनी समयोचीत मार्गदर्शन केले.

“अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने” या विषयावरील परिसंवादात, साहित्य निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांच्या कडून वेळ प्रसंगी मिळणारी सापत्न भावाची वागणूक, असूया, धोरणात्मक, तांत्रिक अडचणी, समाजाशी संवाद तुटणे, गैरसमज, तिरस्कार, आत्मगौरव, आत्मवंचना अशा आव्हानांना तोंड द्यावे लागते, असा सूर व्यक्त झाला. या परिसंवादात सर्वश्री भारत सासणे, विश्वास पाटील, किरण कुलकर्णी, प्रल्हाद कचरे हे सहभागी झाले होते.

“इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती आणि अनुभव” या विषयावरील परिसंवाद केवळ उद्बोधकच ठरला नाही तर भाषा नीट न समजल्याने कसे गोंधळ होतात, हे सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी हलक्या फुलक्या शैलीत सांगितल्याने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन देखील झाले. या परिसंवादात आसाम – मेघालय या राज्यात १५/१६ वर्षे सेवा बजावून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले आय ए एस अधिकारी विशाल सोळंकी, राजस्थान मध्ये कार्यरत असलेले आय पी एस अधिकारी संतोष चाळके, ३९ वर्षे सेवारत असलेले अरुण उन्हाळे यांनी भाग घेतला होता.

या संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात १५ हून अधिक कवी अधिकाऱ्यांनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकर, निवृत सनदी अधिकारी आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य असलेले डॉ दिलीप पांढरपट्टे  होते. सहभागी कवींचे आशय, विषय, भाषा प्रभुत्व, रचनांची मांडणी, यामुळे हे कवी संमेलन चांगलेच रंगतदार ठरले.

गुन्ह्यांची उकल करताना, समाजाचा गुन्हेगारी चेहरा समोर येत गेला, संताजी वरील साहित्य कृतीला परवानगी मिळण्यासाठी पुस्तकाचा दस्तावेज विविध विभागातून ६ महिने फिरत होता असे विविध अनुभव निवृत्त पोलीस महानिरीक्षक, लेखक बी जी शेखर यांनी “प्रशासनातील लक्षवेधी साहित्य निर्मिती” या चर्चासत्रात कथन केले.

‘कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य‌’ विषयावरील चर्चासत्रात सर्वश्री डॉ. ओमप्रकाश यादव, कमलाकर हट्टेकर, डॉ. राजेंद्र गोळे, डॉ. विकास गरड, सतीश बुद्धे सहभागी झाले होते.

शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर प्रभावीपणे होत असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापरण्यास सोप्या, उत्तम ॲप्सचीही निर्मित होते यामुळे प्रशासकीय कामकाजात मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. माहितीचे (डेटाबेस) संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक शासकीय कामे एका क्लिकवर होण्यास मदत होणार असे मत व्यक्त करण्यात आले.

मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रशासनातील कामकाजात सर्वसामान्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटविणाऱ्या भाषेचा अवलंब झाला पाहिजे, असा सुर  व्यक्त करीत बोली भाषेशी निगडित भाषेचा वापर व्हावा, कायदे, नियमांची माहिती सोप्या शब्दांत दिली जावी, अशी अपेक्षा ‘प्रशासनात बदलत गेलेली भाषा‌’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. या चर्चासत्रात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अपर मुद्रांक नियंत्रक संजयसिंह चव्हाण यांचा सहभाग होता. किशोर, बालभारतीचे संपादक, आमच्या माहिती खात्यातील माजी सहायक संचालक श्री किरण केंद्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‌‘माझे वाचन‌’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात निवृत्त सनदी अधिकारी सर्वश्री महेश झगडे, आमचे मित्र  सुनील पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक सनदी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचा सहभाग होता. अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी या सर्वांशी अतिशय सुंदर, सहज संवाद साधला.

वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावतात, नव्या संकल्पना सुचतात, आत्मविश्वास वाढतो, असे श्री महेश झगडे यांनी व्यक्त करून वाचनाअभावी प्रशासनात काम करणाऱ्यांची सर्जनशील विचारसरणी कमी झाल्याची खंत  व्यक्त केली.

श्री सुनील पाटील म्हणाले, “आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचन आवडते याचा विचार केला तर वाचनाची दिशा ठरविता येते. कामकाजात कितीही व्यस्त असलो तरी वाचनाची आवड असेल तर वाचनासाठी वेळ काढता येऊ शकतो. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होत आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. उलट वाचनासाठी सुध्दा सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

चर्चासत्रात भाग घेताना, ज्ञानेश्वर खुटवड म्हणाले, “दैनंदिन कामकाजात गुंतलेले असताना वाचनासाठी वेळ काढणे अशक्य नाही. कार्यालयांमध्ये छोट्या वाचनालयांची निर्मिती करावी, भाषा सुलभ आणि शुद्ध लेखन योग्य असावे याकरिता विविध उपक्रम राबविले जाणे आवश्यक आहे.”

डॉ. हेमंत वसेकर म्हणाले, “वाचन कमी असल्याने प्रश्नांची उकल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्यातील क्षमता वाढविण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. संदर्भासह प्रश्न विचारले गेल्यास दैनंदिनी कामकाज सुकर होण्यास मदत होते.”

पुणे जिल्हापरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सोनाली हरपळे – घुले आणि अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अभिषेक पराडकर यांचे कथाकथन उपस्थितांना चांगलेच भावले.

ठराव

संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात पुढील ५ ठराव एकमताने  संमत करण्यात आले.

१) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन.
२) ऑक्सफर्ड शब्दकोषाच्या धर्तीवर मराठी बोलीभाषेतील नवनवीन शब्दांचा संग्रह वाढीस लागावा याकरिता शासनाने अभ्यास समिती नेमावी.
३) शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य कृतीला शासनातर्फे पुरस्कार दिले जावेत.
४) सामान्यांना समजतील अशा सुलभ मराठी भाषेत शासन निर्णय, कायद्यांची माहिती दिली जावी.
५) शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाला राज्य शासनाने अनुदान द्यावे.

एकंदरीतच मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे तीन दिवसीय राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पथदर्शी ठरले, यातच या संमेलनाचे यश दिसून आले मात्र पुण्यात लाखोंच्या संख्येने  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जर लक्ष्य करण्यात आले असते तर सभागृह सदोदित भरलेले राहिले असते, तसेच ते त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरले असते असे मात्र जाणवले. असो. संमेलन आयोजकांचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. अधिकारी संमेलनाचे फलित अतिशय क्रमवार, सुस्पष्ट,
    माहितीपूर्ण,समावेशक, मर्मग्राही आणि प्रेरकपणे अधोरेखित केले आहे.
    मा.देवेंद्रजींचे विशेष आभार आणि अभिनंदन!

    – डाॅ.आनंद प्रभाकर महाजन,पुणे.

  2. फारच छान संकल्पना आहे अधिकारी कर्मचारी यांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मध्ये लपलेला वक्ता,लेखक आणि कवी यामधून जगा समोर दिसून येतो आहे आणि एक चांगले व्यासंगी व्यासपीठ निर्माण केले गेले आहे असे वाटते तसेच या कामीं कष्ट घेणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आणि या बाबत लेखन करून आमचे पर्यंत पोहचविणारे देवेंद्र भुजबळ व अलका भुजबळ यांना देखील खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  3. फारच छान संकल्पना आहे अधिकारी कर्मचारी या मध्ये लपलेला वक्ता , लेखक व कवी यामधून बाहेर दिसू शकतो शासनातील अधिकारी व कर्मचारी यांना एक चांगले व्यासपीठ निर्माण केले गेले आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद फक्त पुढील वर्षी पासून याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिल्यास नवोदित साहित्यिकांना वाव मिळेल अशी खात्री वाटते

  4. शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन भरणे ही कल्पनाच खूप छान, अभिनव वाटली आणि त्याचे विस्तृत वर्णन व फोटोज पाहून मनापासून आनंद झाला. खूप छान विषयांवर चर्चासत्रे, उत्तम ठराव, ह्या सर्व गोष्टींवरून “अभिरुचीसंपन्न संमेलन” असे वर्णन करता येईल. 👍💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय