अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळ शिकागो, यांच्या वतीने नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील एक लोकप्रिय उपक्रम म्हणजे ‘साहित्य कट्टा’ हा होय. या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अमेरिकेत मराठी भाषेची जोपासना करून वाचन-लेखनाद्वारे ती वृद्धिंगत करणे, सभासदांच्या मनात मराठी साहित्याविषयी गोडी निर्माण करणे, नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या साहित्याच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ देणे, ज्यांच्यात साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करणे आणि अर्थातच उत्तम कार्यक्रम आयोजित करून श्रोत्यांचे मनोरंजन करणे हे आहेत.
या ‘साहित्य कट्टा’च्या आयोजकांनी नुकतेच महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध कवींना आभासी कार्यक्रमाला आमंत्रित करून ‘चला कवितांच्या गावी’ हा कार्यक्रम सादर केला.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-कवयित्री कांचन प्रकाश संगीत, विठ्ठल कुलट, सुनील यावलीकर, विजय सोसे, आणि गजानन मते यांनी आपल्या निवडक कविता वाचून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कवींनी सादर केलेल्या कवितांचा व त्यांच्या निवेदनाचा सर्व श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.
विठ्ठल कुलट आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमानिमित्त तयार केलेले खास आकर्षक बॅनर प्रेक्षकांना खूप आवडले.
प्रत्येकाने आपल्या विशिष्ट शैलीत कवितेची पार्श्वभूमी सांगत, काव्यवाचन व कधी काव्यगायन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. शिकागो परिसरातील मराठी श्रोते आवर्जून मोठ्या संख्येने या Online कवी संमेलनास आले होते व उत्स्फूर्तपणे दाद देत होते. या कवींनी सोप्या व रसाळ शैलीत रचलेल्या कविता ऐकून मंडळातील नवसाहित्यकांना यातून चांगलीच स्फूर्ती मिळाली. सादरकर्त्यांनी आपल्या कवितांद्वारे विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित कवितांद्वारे सर्वांना रखरखत्या उन्हामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात नेले.
विठ्ठल कुलट यांच्या मातीतील ओल, चंद्र, मास्तर,या कविता मातीशी जोडल्या आहेत. अर्थातच त्यातला मायेचा ओलावा मनाला स्पर्शून जातो. ‘कोजागिरीचा चंद्र’ ऐकताना चंद्राचे धरणीशी असलेले नाते चांदोमामाच्या रूपाने प्रेम देऊन जाते.
कांचन प्रकाश संगीत यांच्या पाणी दांडत दांडत, सुज्ञ देह, श्वास या कविता वरवर वाचल्या तर प्रेम, निसर्ग असा साधा विषय असणाऱ्या पण अतिशय खोल विचार करायला लावणाऱ्या आहेत. माणूस आणि निसर्गाचे नाते सांगणाऱ्या ह्या कविता सामाजिक भान कसे हरपत चालले आहे ह्याविषयी बोलणाऱ्या आहेत. आपल्या अंतरात्म्यात जे सुख दडलंय ते शोधत माणूस कसा भरकटत आहे याचे दर्शन कांचन संगीत यांच्या कवितांमधून झाले.
सुनील यावलीकर यांच्या पारा, जीवाश्म, नांद, कबिराचा सुर, आत्मकथा या कविता थोड्याशा उदासीन वाटेने चालणाऱ्या असल्या तरी त्यांना एक प्रकाशाची सोनेरी कडा आहे. आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या कवितांमधून नक्कीच सापडतो. तिमीराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्या ह्या कविता आहेत.
विजय सोसे यांनी मुख्यतः पावसावर आधारित पाऊस आला, चांदण्या रात्री, विठ्ठल आला रे पाऊस झाला रे, तरी वावर पेरले या कविता सादर केल्या. पाऊस आणि शेतकरी यांचे अतूट नाते त्यांनी आपल्या कवितातून मांडले. कधी पर्जन्य राजा रुसून जातो आणि शेतकरी हतबल होतो तर कधी ह्याच पर्जन्य राजाचे प्रेम पिकांच्या रूपाने बहरून येते आणि शेतकरी राजाला आनंद देऊन जाते. हे नाते उलगडताना कधी मुक्तछंद तर कधी अभंगाची जोड छान साधली होती.
गजानन मते यांच्या गझल प्रकारावर आधारित अरे ढगा, रानात हिंडताना, आंब्याचा मोहोर, तू नसताना, हसरा हसरा चेहरा या कविता फारच छान होत्या. निसर्ग, पाऊस, माती अशा मानवी मनाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या पण वैविध्यपूर्ण कविता त्यांनी वाचून दाखवल्या.
या सर्वच कवींच्या कवितांमधून माणूस आणि निसर्ग यांच्या नात्यांमधील नाजूक धाग्यांचे बंध हळूवार एकेक करून उलगडले गेले आहेत. ह्या सर्व कवितांमधून एक मात्र जाणवते ते म्हणजे मानवी मनाचा शोध किंवा त्याचा थांग लागणे मात्र कठीणंच. आपल्या मायमराठीला या कविता अधिकच समृद्ध करतात.
या कार्यक्रमाचे संयोजन व संचलन माधव गोगावले आणि त्यांचे सहकारी ‘साहित्य कट्टा’चे संयोजक अश्विनी कुंटे, श्रद्धा भट, उल्का नगरकर, मंजुषा पांडे आणि समीर बोंगाळे यांनी केले.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800
रिमझिम पाऊस तसाच कविता गायनाचा मुसळधार कार्यक्रम वाचून आनंद वाटला.
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र