आपल्या असामान्य विद्वतेमुळे शिक्षणक्षेत्रात ज्यांचे नाव अतिशय आदराने घ्यावे असे यवतमाळच्या आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे नामवंत प्राचार्य डॉक्टर उदय नावलेकर होय. त्यांनी पारवेकर महाविद्यालयाचा एकदम कायापालट केला आहे. अमरावती विद्यापीठाने उत्कृष्ट प्राचार्य पूरस्कार देवून त्यांना सन्मानित केले ते उगीच नाही.
डॉ उदयजी सुरवातीला उमरखेड येथे गावंडे महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. आपल्या प्राध्यापकी जीवनात त्यांना संघर्षाचा सामना करावा लागला. ३४ वर्षांचे असतांना डॉ नावलेकर प्राचार्य म्हणून पारवेकर महाविद्यालयात रुजू झाले. त्यांच्या कामाचा झपाटा काही औरच ! विद्यापीठाचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार पारवेकर महाविद्यालयाला मिळाला. बोअर किंवा नळाचे पाणी उपलब्ध नसतांनाही टॅंकरने पाणी आणून त्यांनी झाडे जगवली, फुलवली हे त्यांचे कर्तृत्व ! महाविद्यालयाला नॅक उत्कृष्ट मानांकन मिळाले. नॅकचे पीअर टीम मेंबर म्हणून त्यांची निवड झाली. अनेक प्राध्यापकांना त्यांनी मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी अनुदान मिळवून दिले. त्यांना “प्लेसमेंट“ ह्या प्रमोशनल फिल्मसाठी राष्ट्रीय स्तरावर जर्मन कंपनी बॉश तर्फे पन्नास हजार रुपयांचें बक्षीस मिळाले आहे.
आपल्या क्षेत्रात नाव कमावणारे अनेक विद्यार्थी नावलेकर सरांनी घडविले. उदा. आयएएस झालेले अंदमान निकोबारचे कलेक्टर अझरुद्दीन काझी, भारताचा हॉकी गोलकीपर आकाश चिकटे, आयपीएल आणि रणजी क्रिकेटर अक्षय कर्णेवार, नॅशनल खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्लेअर स्मिता बोनकीले, गोल्ड मेडालिस्ट प्रीतम सरग अशा नावांची मोठी यादीच आहे. कृतज्ञ व कृतघ्न अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा आपण अनुभव घेतो तसा डॉक्टरांनीही घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना आता माणसे चांगल्या प्रकारे वाचता येतात. आपण नेहमी म्हणतो की सरस्वती व लक्ष्मी एकत्र राहत नाहीत पण डॉक्टरांच्या जीवनात लक्ष्मी व सरस्वती दोघी त्यांच्या सोबत आहेत. लहान वयापासून अनेक चढउतार त्यानी पाहिले. उदा. शिक्षण घेत असतांनाच त्यांचे वडील वारले तेंव्हा अंत्यसंस्कारासाठी ही त्यांच्याकडे पैसे नव्हते, ही गोष्ट ते कधीच विसरू शकत नाहीत.
पांढरकवडा हे त्यांचे मूळ गाव! शेजारी राहणाऱ्या प्रसन्न, स्मितहास्य असणाऱ्या रश्मी रानडेंशी त्यांचा विवाह झाला. ही सुंदर जोडी देवानेच बनवलेली असावी. चांदीच्या मंगळसूत्रानेच संसाराला सुरवात झाली आणि रश्मीताई लक्ष्मीच्या रूपाने त्यांच्या गृहलक्ष्मी झाल्या. नावलेकर दाम्पत्याचे वैवाहिक जीवन अतिशय सुखाचे, आनंददायी आहे. त्यांचा मुलगा सार्थक डॉक्टर आहे तर मुलगी सृष्टी इंजिनिअर असून जर्मनीत झलॅंडो कंपनीत लीड पदावर आहे.
तल्लख बुद्धिमत्ता व कष्ट करण्याची मानसिक तयारी असलेले डॉ उदय ज्या कामाला हात घालतील ते काम यशस्वी होणारच ! सर्वगुणसंपन्नता हा त्यांचा विशेष गुण. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांची धडाडी लक्षणीय आहे. विद्यार्थी दशेत असतांना यवतमाळ ते काश्मीर हा प्रवास सायकलने करणाऱ्या उदयजींनी पुढे अमेरिका, कॅनडा, थायलंड, हाँगकाँग, दुबई अशा अनेक देशांचा अभ्यास दौरा केला. नुकतेच जर्मनीत मुलीला भेटायला गेल्यावर त्यांनी एडॉल्फ हिटलरच्या जीवनाचा सखोल अभ्यास केला. म्युझियमला भेटी देऊन त्यांनी एक डॉक्युमेंटरीं फिल्म तयार केली. चांगल्या डॉक्युमेंटरी फिल्म बनविण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. मोनालिसा, लता मंगेशकर ,ईलॉन मस्क यांच्यावर त्यांनी बनविलेल्या फिल्म आपण “उदय नावलेकर “ ह्या यूट्यूब चॅनेलवर जरूर पहाव्यात म्हणजे त्यांच्या कल्पक बुद्धीची आणि अभ्यासाची आपल्याला कल्पना येईल. रोटरी इंटरनॅशनलचा अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार मिळविणारे विदर्भातील ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
प्राचार्यपदाची धुरा हाती घेतल्यावर त्यांच्या कार्याला अधिकच झळाळी मिळाली व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ इत्यादी सगळ्यावर त्यांचे बारीक लक्ष असते. प्रत्येक घटक आनंदी असावा, कार्यकुशल असावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सरांच्या प्रेमळ व आश्वासनात्मक वागणुकीमुळे प्रत्येक जण त्यांच्यावर प्रेम करतो. आपल्या कामात दक्षता ठेवतो.
प्रतिष्ठित अशा रुईकर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. ट्रस्टद्वारा निर्मित संस्थेची दैदिप्यमान प्रगति हे सरांच्या अथक प्रयत्नांचे फलित होय. यवतमाळला उजव्या सोंडेच्या गणपतीचे फार जुने जागृत मंदिर आहे. या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. मंदिराचे स्वरूप पूर्णतः पालटले. श्रद्धाळूंची गर्दी वाढली याचे श्रेय सरांना आहे. अध्यात्म व विज्ञान ह्यांची अतिशय उत्तम सांगड हे त्यांच्या जीवनाचे आणखी एक वैशिष्ट्य !
सेवेचा एक भाग म्हणून त्यांनी डोळ्यांचा दवाखाना व फिजिओथेरपी सेंटर सुरू केले. दर चतुर्थीला तेथे मोफत चष्मे वाटप केले जाते. अनेक वैद्यकीय शिबीरे घेतली जातात. सेवाधर्म हा सरांच्या रक्तात भिनलेला आणखी एक गुण ! चंदनाने कितीही ठरविले तरी त्याचा सुगंध त्याला झाकता येईल का ? आज सर्व स्तरात त्यांच्याविषयी जे आदर, प्रेम आहे ते त्यांना सुखासुखी थोडे मिळाले ? त्यासाठी त्यांची अविश्रांत मेहनत, परोपकाराची भावनाच कारणीभूत आहे.
प्राचार्य नावलेकरांनी नांझा येथे एक सुंदर सुसज्ज अशी शाळा उभारली आहे. तेथील फळबाग अतिशय रेखीव आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेत समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. गेल्या २० वर्षात ओपन कॅटेगरीच्या एकाही विद्यार्थ्याचा या शाळेत प्रवेश झाला नाही. ह्या शाळेत ३००० स्क्वेअर फूटचे ॲाडीटोरीअम, बास्केटबॉल कोर्ट, कम्प्युटर व लँग्वेज लॅब, आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून १८००० पुस्तके असणारे सुंदर ग्रंथालय आहे. रुईकर ट्रस्ट संचालित या शाळेच्या घवघवीत यशाच्या मागे डॉ नावलेकरांची प्रचंड इच्छाशक्ती, शिक्षणाचा प्रसार व्हावा, प्रत्येकाला शिक्षण मिळावे ही त्यांची आंतरिक तळमळ हेच खरे कारण आहे.
स्वतः नावलेकर उत्कृष्ट खेळाडू आहेत. भालाफेक व क्रिकेट वर त्यांचे विशेष प्रेम ! प्रत्यक्ष जीवनात, कार्य करताना चुकीच्या विचारांना मार्गदर्शन करताना अचूक वेध कसा घ्यावा हे त्यांना छान अवगत आहे.
अतिशय समाधानी आनंदी स्वभावाचे डॉ उदयजी नावलेकरांविषयी जाणून घेण्याचा मी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न वाचकांना आवडेल अशी आशा आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना करते की डॉ उदय नावलेकरांना आयुष्यात अधिकाधिक यश मिळो व दशदिशात त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहो.
— लेखन : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
डॉक्टर उदय नावलेकर यांचा सुंदर परिचय प्रतिभाताईंनी दिला आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद! उदय सरांना त्यांच्या प्रत्येक कामात घवघवीत यश मिळो.
डॉ उदय नावलेकर यांचा खूप छान ओघवत्या भाषेत परिचय करून दिला यासाठी प्रतिभाताई पिटके मॅम यांना धन्यवाद. श्री नावलेकर सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
डॉ. उदय नावलेकर सरांचा परिचय वाचून फार आनंद झाला. हे खरेखुरे नायक आहेत. त्यांना भावी कार्यासाठी मनापासून शुभेच्छा..!!
माहिती दिल्याबद्दल प्रतिभाताई पिटके यांना अनेकवार धन्यवाद…!! 🙏
… प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007