आज अवतीभवतीचे सर्वच क्षेत्रात गढूळलेले वातावरण बघता शिक्षण क्षेत्रात नव्या धोरणाने सुचविलेले चांगले बदल तर गरजेचे आहेतच पण त्याही पुढे जाऊन एका अमुलाग्र क्रांतीची गरज आहे.
आपण शिक्षणा विषयी बोलतो तेव्हा सध्याचे शिक्षण नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने योग्य नाही, त्यात अमुलाग्र बदल व्हायला हवेत, अगदी शिकवण्याच्या पद्धती पासून तर अभ्यासक्रम, परीक्षा, मूल्यांकन असे सारेच बदलायला हवे याबद्दल एकमत असते. पण गेल्या सात आठ दशकात या सर्व अंगाने सातत्याने बदल झाले आहेत. तरीही आपण कसलेही दोष नसलेली आदर्श शिक्षण पद्धत शोधून काढली नाही. ते शक्यही नाही. कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण कितीही आदर्श पद्धती निर्माण केल्या तरी त्यात कुणीतरी काहीतरी दोष काढणारच.
शिक्षणाचे वयानुसार टप्पे आहेत. पायऱ्या आहेत. आपले शालेय शिक्षण ज्याला आपण पायाभूत शिक्षण म्हणतो, त्यात फारसे बदल गरजेचे नाहीत. कारण आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ही रचना आपण स्वीकारली आहे. त्यात कालानुरूप जे काही थोडेफार बदल करायचे ते स्वीकारून आपण केलेली वाटचाल योग्यच आहे. प्रश्न बारावी नंतरचा, कॉलेजच्या उच्च शिक्षणाचा आहे. विद्यापीठाच्या पदवी बाबतचा, उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्तराचा, विषयाचा, विभागाचा, शाखांचा आहे.
सध्याच्या पद्धतीत आपण कितीही मुक्त स्वातंत्र्याच्या गप्पा केल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता, त्याची परिस्थिती, आकलन शक्ती, त्याची आवड निवड याचा फारसा विचार झालेला नाही. काय शिकायचे, कसे, किती शिकायचे याचे निर्णय विद्यार्थी घेऊ शकत नाही. हे स्वातंत्र्य त्याच्याकडे नाही. ठराविक प्राध्यापक, ठराविक अभ्यास मंडळे, ठराविक अधिष्ठाता हे निर्णय एकतर्फी घेतात. सगळे काही हीच मंडळी ठरवतात. समस्या इथून निर्माण होतात. मी हॉटेल मध्ये गेल्यावर मला हवे ते जेवण ऑर्डर करू शकतो. एव्हढेच नव्हे तर थोडे तिखट कमी, तेलकट नको, साखर नको अशा सूचना देऊ शकतो. आवडी निवडी सांगू शकतो. असाच चॉईस विद्यार्थ्याला कॉलेज मध्ये का नसावा ? आर्ट्स च्या विद्यार्थ्याला संगणक शिकायचे असेल, किंवा मूलभूत केमिस्ट्री मधील काही जाणून घ्यायचे असेल तर मज्जाव कशाला ?
डॉक्टरला संगीतात रस असू शकतो. इंजिनियरिंग शिकताना एखादा विद्यार्थी पेंटिंग, मूर्तिकला शिकू शकतो. समाज शास्त्र शिकणारा विद्यार्थी व्यवस्थापनाचे धडे घेऊ शकतो. आपल्या रीजिड, नियमबद्द पद्धतीने या लवचिक धोरणाच्या शक्यताच बाद करून टाकल्या आहेत. आम्ही विद्यापीठात वेगवेगळ्या विभागांना पोलादी भिंतींनी बंदिस्त करून टाकले आहे. त्यामुळे आपले शिक्षण एकांगी स्वरूपाचे झाले आहे.
आज गरज आहे ती आंतर शाखीय शिक्षणाची. विभागांना पोलादी भिंतींनी बंदिस्त करण्याऐवजी, पूल बांधून परस्परांना जोडण्याची गरज आहे. पूर्वी अठरा विद्या, चौसष्ठ कला होत्या ज्यात पारंपारिक शिक्षणाची सोय होती गुरुकुल पद्धतीने. गुरूच सर्व काही ठरवायचे. तेच परीक्षा घ्यायचे.हे शिक्षण सर्वांगीण विकास करणारे होते.
समाजात इंजिनिअर, डॉक्टर, वकील, अशा विशिष्ट शाखांतील विशेष ज्ञान गरजेचे आहेत हे खरे. या विभागातील जास्तीत जास्त विषय घेऊन हे नैपुण्य सिद्ध करता येईल. पण त्या बरोबरच इतर विषयाचे ज्ञान देखील तितकेच गरजेचे आहे. कॉमर्स शिकताना आवडीनुसार काही विषय कलेचे, संगणकाचे, व्यवस्थापनाचे घ्यायला काय हरकत आहे ?
शिक्षणात अशी मुक्त निवड पद्धत अमलात आणायची तर यू जी, पी जी, पी एच डी अशा वेगवेगळ्या स्तरावर पदव्या, श्रेण्या देण्याच्या भानगडीत पडूच नये. आपल्या बौद्धिक, आर्थिक क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्याने विषय निवडीत जावे अन् परीक्षा देऊन क्रेडिट मिळवीत जावे. आता नव्या शैक्षणिक धोरणात तशीही क्रेडिट पद्धत लागू झाली आहेच. विद्यार्थी त्याच्या सोयीने, आवडी निवडी प्रमाणे, कुठूनही केव्हाही हवे ते, हवे तितके क्रेडिट मिळवू शकतो. त्याला जिथून ही क्रेडिड मिळवायचे आहेत त्या कॉलेज/विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार स्वतःला ऍडजस्ट करावे लागेल. कारण कोणतेही कॉलेज/विद्यापीठ प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वेळापत्रक बदलणार नाही. विशिष्ठ क्रेडिट (दोन/ तीन/ चार) चा कोर्स करताना त्याचे मूल्यमापन देखील होत जाईल. हे मूल्यमापन तोंडी / लेखी परीक्षा,सेमिनार,प्रोजेक्ट वर्क, प्रॅक्टिकल, असैनमेंट अशा विविध पद्धतीने होईल. त्याची नोंद विद्यार्थ्यांच्या क्रेडिट खात्यात जमा होत जाईल. प्रत्येकाकडे बँकेचे असते तसे क्रेडिट नोंदीचे डिजिटल पास बुक असेल. या पद्धतीचे शिक्षण घेताना वयाचे बंधन राहणार नाही. विषय निवडीचे बंधन राहणार नाही. जन्मभर शिकण्याचे, स्वतःला अपडेट करण्याचे स्वातंत्र्य राहील. कुणालाही कुठल्याही पायरीवर कुठलीही पदवी मिळणार नाही. तुमचे क्रेडिट पास बुक, तुमचा शैक्षणिक अनुभव, तुम्ही सिद्ध करू शकाल ती क्षमता यावरून नोकरी देणारा तुमची योग्यता मुलाखती द्वारे, लेखी परीक्षेद्वारे ठेवू शकेल.
तसेही आजकाल पदवी, मार्क्स, श्रेणी यांना नोकरी देणारे उद्योजक फारसे महत्व देत नाहीत. त्यांना त्यांच्या विशिष्ट कामासाठी तुमचा किती कसा उपयोग होऊ शकतो हेच तपासले जाते.
कुणाला हे सारे प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून असंभव वाटेल. पण आजच्या डिजिटल युगात काहीही शक्य आहे. इथे जुनी रिजिड मनोवृत्ती त्यागून लवचिकता तेव्हढी अपेक्षित आहे. शिवाय शिकताना, शिकवताना एकाच वर्गाचे, एकाच इंटरेस्ट चे विद्यार्थी नसल्याने, समोरील गर्दीत विविधता असल्याने शिक्षकाला ते अधिक आव्हानात्मक, इंटरेस्टिंग, उत्साह वर्धक वाटण्याची शक्यता आहे. ही पद्धत विद्यार्थी अन् शिक्षक या दोघात जवळचा अनुबंध निर्रकरणारी आहे. ती एकीकडे विद्यार्थी केंद्रित, त्याचे विषय निवडीचे, शिक्षण कसे, किती, कुठे,कोणत्या गतीने घ्यायचे या संबंधी चे स्वातंत्र्य जपणारे आहे. हे आंतरशाखीय अभ्यासक्रमाला प्रोत्साहन देणारे आहे. हे आजीवन शिक्षण या भविष्यात गरजेच्या संकल्पनेला पुढे नेणारे आहे.
यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर सध्या जो महाकाय डोंगर उभा आहे, ते ओझे हलके होईल.विद्यापीठाचा खर्च कमी होईल. पण उत्पन्न मात्र वाढेल. विद्यार्थी क्रेडिट प्रमाणे फी भरतील.इथेही आर्थिक क्षमते प्रमाणे हवे तितके, हवे तेव्हा क्रेडिट मिळवता येतील. अर्थात सध्याचे आरक्षण, सवलती फी माफी वगैरे सरकारी धोरणे सोबतीला असतीलच. त्यामुळे कुणालाही ही पद्धत अडचणीची ठरणार नाही. प्राध्यापकाला मात्र जुळवून घ्यावे लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकवले तर वेळ, कष्ट वाचतील अन् प्राध्यापकाला देखील याच स्टीम मध्ये स्वतःला देखील नवे विषय शिकता येतील. काही विषय तर ऑनलाईन पद्धतीने देखील शिकता, शिकवता येतील.
या शैक्षणिक क्रांतीने एकूणच शिक्षण पद्धतीचा चेहरा मोहरा बदलेल, अन् ते चांगल्यासाठीच असेल एव्हढे मात्र निश्चित.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800