१. ज्याचा आठवावा प्रताप…
ज्यांचा आठवावा प्रताप ज्याचे आठवावे संस्कार, उघडले स्वातंत्र्याचे दारं…
ललामभूत देशाला झाला रं जी जी जी…
शतकातून जे जन्मती, वर्णावी काय त्यांची महती,आज ही प्रतिमा जागती रं जी जी जी..
शिवराये धन्य हो केले, कोणते पुण्य फळा आले, शिवनेरी वरती अवतरले हो जी जी रं…
केले रक्ताचे हो पाणी, चालू ना दिली पहा मनमानी,राष्ट्राचा खरा अभिमानी हो जी जी रं…
कूस धन्य ती जिजाऊची,केली गनिमांची गोची
कीर्त किती गावी राजाची हो जी जी रं जी….
स्वाभिमान मरू ना दिला, शत्रूला धडा असा
शिकविला, अखेरी महाराट्री खपला हो जी जीरं र जी…
कर्तृत्व जरा आठवा सद् गुण मनामध्ये साठवा
पिढ्यांना पुढच्या तो द्यावा रं जी जीरं जी..
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
२. छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान ॥धृ॥
सिद्धी इब्राहिम अंगरक्षक कोंढाण्याचा किल्लेदार
सिद्धी हिलालचा पुत्र घोडदळाचा सरदार
राज्यकारभारात सर्व धर्मियांना मानाचे स्थान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान॥१॥
काझी हैदरने सचिव म्हणून पाहिले काम
शमाखान ने मोगलांच्या किल्ल्यांना दिले सरअंजाम
राज्यात बांधली मज्जिद अन् दिली वतने दान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान॥२॥
सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर
गनिमी काव्याने शत्रुवर मात करणारा धुरंदर
मानवतावादी निर्भिड रयतेचा राजा शीलवान
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान॥३॥
ज्योतिबांनी कुलवाडीभूषण पदवी दिली सहर्ष
बाबांनी राज्यघटनेत शिवरायांचा घेतला आदर्श
राजे समानतेने वागणारे माणुसकीची खाण
आनंदात रहात होते सर्व हिंदू मुसलमान॥४॥
— रचना : अनिसा सिकंदर. दौंड
३. शिव जन्म
शहाजीराजे जिजाऊ ते तात मात
जुन्नर प्रांतात शिवनेरी किल्ल्यावर
जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात
सनई, चौघड्याचे मंगल ध्वनी स्वर
-१-
वसंत बहर,चैतन्य गंध वाऱ्यात
निसर्ग सृष्टीने दिला संदेश सत्वर
जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात
इलाक्यात गावोगावी पोचली खबर
-२-
फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ त
नवल वर्तले, मिळाला देवीचा वर
जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात
द्रष्टा अवतरला ते झुकले अंबर
-३-
जाहले बारसे शिवा नाव पाळण्यात
आनंद रयतेत ती वाटली साखर
जन्मला शिवबा, शिवाईच्या गाभाऱ्यात
मराठा हिंदवी राजा भावी खरोखर
-४-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. पुणे
४. कर्मयोगी शिवाजी महाराज
(दशाक्षरी)
जुन्नर प्रांती, शिवनेरीला
बाल राजे शिवाजी जन्मले
दऱ्या खोऱ्यात खेळताना
स्वराज्याचे स्वप्न पाहिले..१
राजमाता जिजाच्या उदरी
शूर शिवबा अवतरला
संस्कारांची शिदोरी देवुनी
इतिहास तिने घडवला..२
नेत्रदीपक कार्य राजेंचे
सर्वदूर त्यांचे समर्थक
आठवावे तयांचे प्रताप
होते आद्द युग प्रवर्तक…३
श्री छत्रपती महाराजांची
होती स्वराज्याची संकल्पना
सत्यात उतरविले स्वप्न
हिंदवी राज्याची ही स्थापना.४
कर्मयोगी छत्रपती राजे
किर्ती नेतसे अटकेपार
ध्वज फडकला गगनात
हिंदवी राज्य स्वप्न साकार..५
राजा शिवाजी हा धुरंधर
लढवय्या , धाडसी झुंझार
गाजवी समशेर युध्दात
मुगलांना वाटे तो अंगार…६
स्त्रियांचा करा सदा आदर
शिवबाची होती शिकवण
मातेसमान माना स्त्रियांस
करू संस्कारांचे आचरण..७
श्री छत्रपती राजा शिवाजी
असे सुराज्याचा शिल्पकार
दिव्यत्वाचा भास होई तेथे
ठायी ठायी याचा साक्षात्कार..८
— रचना : डॉ दक्षा पंडित. मुंबई
५. !! शिवभूपती !!
शिवराय छत्रपती झाले
स्वराज्य स्वप्न सत्यात आले
सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर
यशाने तोरण बांधियले ||
परकीयांची दंडेलशाही
स्वकीयांना केले त्राहीत्राही
सारा मुलूख भयाने ग्रस्त
काय करावे कळेना काही ||
माय जिजाऊ करी संस्कार
शौर्य मुठीत मनी अंगार
अन्यायावर करण्या वार
स्वराज्य मंत्राची तलवार ||
एकविचारी एकदिलाचे
मावळे रांगडे जमविले
आई भवानी प्रसन्न होता
हे श्रींचे राज्य प्रत्यक्ष आले ||
माता-भगिनी अभय दिले
स्वधर्मा अखंड आचरिले
धर्मराज्य हे न्यायनीतिचे
सकलासी वंदनीय झाले ||
लोककल्याण न्यायनिष्ठूर
रयतेचा राजा स्वराज्याचा
राष्ट्राभिमान मनामनाचा
मुजरा त्यांना अभिमानाचा ||
— रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे.
६. छत्रपती शिवाजी
छत्रपती शिवाजी
कसा पुत्र जिजाबाईचा
मुख्यमणी शिरपेचाचा
लावी तिलक आई भवानीचा
हर हर महादेव बोले वाचा
ध्येयवेडा निधड्या छातीचा
सबळ आधार अबलांचा
गडेसर ? मनसुबा पुढील लढाईचा
ध्यास स्वराज्याचा, रयतेचा
जीव की प्राण साथीदारांचा
मान लवून सदा मुजरा मानाचा
गराडा भवती प्रिय वीरांचा
स्फूर्ती दायी शाहीर पोवाड्यांचा
नायक अष्टावधानी जागृतीचा
नृपती अष्टप्रधान मंडळाचा
श्रीपती न्यायालंकार ज्याचा
मालिक गनिमी रणनीतीचा
जयकार क्षत्रिय कुलवतंसाचा
हिंदू-हृदय सिंहासनाधिश्वराचा
श्री गुरु स्वामी रामदासांचा
अभिषिक्त श्री छत्रपती शिवाजीचा
— रचना : विजया केळकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने काव्य मैफिल सर्वधर्म समभाव जागृत करणाऱ्या व तरुणांना प्रेरणा, स्फूर्ती दायक आहेत.
अभिनंदन
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.