Saturday, July 20, 2024
Homeलेखशिवरायांचे मोठेपण

शिवरायांचे मोठेपण

छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते. रयतेचे राजे होते. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवरायांची ३९४ वी जयंती आहे. लवकरच महाराजांची चौथी जन्मशताब्दी आपण मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करणार आहोत. एखाद्या राजावर चारशे वर्षे त्याची रयत प्रेम करते, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान बाळगते. इतिहासकार ज्यांना सन्मानाने युगपुरुष असे संबोधतात. असे मोठेपण खूप कमी महापुरुषांच्या वाट्याला आलेले आहे. असे मोठेपण शिवरायांना का प्राप्त झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, मला जाणवलेली कारणे पुढील प्रमाणे आहेत.

१. छ. शिवराय हे कुळवाडी भूषण राजे होते, त्यांच्या राजवटीत रयतेच्या पिकाला पूर्ण संरक्षण होते, शिवरायांच्या राजवटीत तत्कालीन इतर राजे रजवाड्यापेक्षा अधिक शेतसारा असूनही रयत खूष होती, कारण शेतसारा वसुलीच्या मोबदल्यात शिवरायांनी रयतेने पिकवलेल्या पिकाला पूर्ण संरक्षण दिले होते. दरोडेखोर, गुंड, पेंढारी यांच्या उपद्रवापासून रयत मुक्त होती, तुलनेने इतर राज्यांचे कर कमी होते, परंतु त्यांनी रयतेला पुरेसे संरक्षण दिलेले नव्हते. शिवरायांच्या राज्यात रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची सैन्याला मुभा नव्हती, रयतेला मोबदला दिल्या शिवाय रयतेने पिकवलेले धान्य, भाजीपाला सरकारी कामासाठी देखील घेण्यास मुभा नव्हती, त्याच वेळेस इतर राजे सरकारी कामासाठी सक्तीने विनामोबदला धान्य, भाजीपाला घेत असत.

२. शिवरायांनी खडे सैन्य हि संकल्पना शिथिल करून शेतकऱ्याच्या एका हातात नांगर तर दुसऱ्या हातात तलवार दिली. त्यामुळे शेती हंगामाच्या काळात त्यांचे सैन्य शेतात राबत असे, शिवरायांनी लष्करी मोहिमा या नेहमी बिगर शेती हंगाम काळात घेण्याचा प्रयत्न केला.

३. कमीतकमी सैन्यबळात जास्तीत जास्त परिणाम साधण्यासाठी त्यांनी गनीमी कावा हि नवीन युद्ध रणनीती विकसित केली.ही रणनीती नवीन असल्याने शिवरायांचे शत्रू या नितीबाबत अनभिज्ञ होते, त्यामुळे शत्रू पक्षात एक प्रकारची जरब निर्माण झाली होती.
४. राज्यातील स्त्रीयांच्या अब्रूचे रक्षण याला शिवरायांनी अग्रक्रम दिल्यामुळे, त्यांच्या राज्यातील स्रियांना सन्मानाने जगता आले, कोणीही सर्व सामान्य स्त्रीयांच्या अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जबर शिक्षा ठोठावली जात असे. त्यामुळे कोणीही अधिकाराचा गैरवापर करून स्त्रीयांच्या अब्रूशी छेडछाड करण्याची हिम्मत करू शकत नसे.
५. शिवरायांनी वारसा हक्काने दिली जाणारी मनसबदारी रद्द करून कर्तृत्वाच्या आधारे नेमणुका करायला सुरुवात केली, त्यामुळे सर्व सामान्य घरात जन्माला आलेल्या अनेक कर्तुत्वसंपन्न व्यक्तींना मोठमोठया जबाबदारी सोपवणे सुरू झाले. कर्तबगारीचे चीज होते हा विश्वास त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांत निर्माण केला.

६. धार्मिक अवडंबर, कर्मकांड, भोंदूगिरी, चमत्कार यांना त्यांनी प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या राज्यात रयतेला त्यांच्या मर्जीनुसार श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य होते. त्यांनी रयतेत धार्मिक भेदभाव केला नाही.
७. त्यांच्या राजवटीत महत्वाच्या जबाबदारी देतांना धार्मिक, जातीय अथवा इतर कोणताही भेदभाव केला जात नसे.
८. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य रयतेचे आहे असा विश्वास रयतेत निर्माण केला होता, त्यामुळेच शिवरायांच्या निर्वाणानंतर देखील हे राज्य टिकवण्यासाठी रयत दीडशे वर्ष संघर्ष करीत होती.
९. शिवरायांनी मुत्सद्देगिरी वापरून प्रसंगी तात्पुरती माघार घेऊन, योग्य वेळेची वाट पाहून पुन्हा चढाई करून पूर्वी सोडून दिलेले किल्ले व भूप्रदेश परत मिळवले आहेत.

१०. आधुनिक तंत्रज्ञान हे शिवशाहीचे वैशिष्ट्य होते, तत्कालीन अत्याधुनिक आरमार, बंदरे, दुर्ग, किल्ले, बंदुका, तोफा यांची निर्मिती करून शिवरायांनी आपली संरक्षण सिद्धता इतर राजवटीच्या तुलनेत प्रगत ठेवली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांना ३९४ व्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन.

हिरालाल पगडाल

— लेखन : हिरालाल पगडाल. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. शिवरायांविषयी सुरेख लेख.शिवरायांच्या स्मृतिस सादर वंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments