Thursday, May 30, 2024
Homeबातम्याशिस्तीत झाली, कवितेची कार्यशाळा !

शिस्तीत झाली, कवितेची कार्यशाळा !

लेखन अन् मी साहित्य समूह, कोल्हापूर व काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांनी डोंबिवली येथे नुकतीच आयोजित केलेली “वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा” चांगलीच मार्गदर्शक ठरली.

विशेष म्हणजे कार्यशाळेचे मार्गदर्शक, स्वतः कवी, गझलकार असलेले श्री विजय जोशी (विजो) यांच्या शिस्तशीर शिकविण्याने, वेळ प्रसंगी प्रेमळ रागविण्याने तर सर्व सहभागी सदस्यांना खरोखरीच्या शाळेचे, ३०/४० वर्षांपूर्वीचे दिवस आठवले आणि या निमित्ताने ही कार्यशाळा प्रत्येकाला आपल्या शाळेतील दिवसात घेऊन गेली.

कार्यशाळेच्या आयोजनासाठी श्री रमेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप मेहनत घेतली. दिवसभराच्या कार्यशाळेचे अवघे ३००/- रुपये शुल्क ठेऊन ते पैशांसाठी नाही तर साहित्याच्या प्रेमापोटी कार्यशाळा आयोजित करीत असतात, हे त्यांनी दाखवून दिले.

विशेष म्हणजे, ही एका दिवसाची कार्यशाळा एकाच दिवसात संपली नसून एक स्वतंत्र व्हॉट्स ॲप ग्रुप स्थापन करण्यात आला असून पुढील दोन महिने स्वतः श्री विजय जोशी आणि श्री अनंत जोशी हे मार्गदर्शन करीत राहणार आहेत.

या कार्यशाळेविषयीच्या काही बोलक्या प्रतिक्रिया पुढे देत आहे…

१. लेखन अन् मी साहित्य समूह, कोल्हापूर यांच्या विद्यमाने श्री प्रमोद सुर्यवंशी आणि रमेश पाटील सर यांच्या अथक प्रयत्नांनी, पुढाकाराने २८-४-२०२४ रोजी आयोजित केलेल्या वृत्तबद्ध कविता ते गझल या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. अतिशय मोलाचं मार्गदर्शन माननीय कवी/गझलकार श्री विजय जोशी सरांनी केले.
वृत्तबद्ध कविता कशी लिहावी ? कवितेवर संस्कार कसे करावे ? वृत्तांची ओळख, नियम याबद्दल अगदी सोप्या भाषेत, उत्कृष्ट पध्दतीने सरांनी समजावून सांगितले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
कविता म्हणजे मनातील उमटणारे भाव, भावना कागदावर शब्दांत मांडणे हे माहित होते. परंतू त्याला सुसंस्कारित करून देखणे रूप कसे द्यावे हे सरांनी शिकवले. सर अगदी आत्मियतेने शिकवत होते, त्यांचे शिकविण्याचे कौशल्य ही वाखाणण्याजोगे आहे. मी प्रथमच अशा प्रकारच्या कार्यशाळेला उपस्थित होते आणि या समूहात आले होते तरी ही इकडे आपण नवखे आहोत असे जाणवले नाही, आपलेपणाच जाणवला. खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय उत्कृष्टपणे कार्यशाळा संपन्न झाली.

सर्व आयोजकांनी या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन अतिशय व्यवस्थितपणे केले. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद. असेच स्तुत्य उपक्रम होत रहावेत हिच सदिच्छा.
– ॲड रोहिणी जाधव. मुंबई.

२. कवितेची कार्यशाळा खूप छान झाली. मला वर्गात माझे मनोगत व्यक्त करायचे होते. परंतु असे अचानक मी माझे विचार मांडू शकत नाही म्हणून मी तेव्हा काही बोलू शकले नाही.
घरी आल्यावर कार्यक्रमाबद्दलचे माझे मनोगत लिहून काढले. आता आपणापुढे सादर करीत आहे.

आम्हाला विजय सरांसारख्या मोठ्या व्यक्तीकडून वृत्तबद्ध कवितांबद्दल मार्गदर्शन लाभले. विजय जोशी सरांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत, त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. अशी मोठी व्यक्ती श्री विजय जोशी सर आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभली. याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत.
नवोदित कवी असा कुठेही भरकटू नये त्याला सोप्या पद्धतीने वृत्तबद्ध कविता लिहिता याव्यात याबद्दल विजय सरांची मेहनत, त्यांची कवितेबद्दल असलेली तळमळ प्रत्यक्षपणे दिसून आली.
सरांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. सुरुवातीला सरांनी मात्रांचा अभ्यास घेतला. त्याचा जास्तीत जास्त सराव करून घेतला. त्यामुळे आम्हाला पुढचा अभ्यास कठीण वाटला नाही.
मात्रा म्हणजे काय, मात्रा कशा मोजायच्या हे खूप सोप्या पद्धतीने सरांनी शिकवले.
वृत्तबद्ध कविता याबद्दल आमच्या मनात एक भीती होती ती सरांनी सुरुवातीलाच दूर केली. अगदी हसत खेळत आम्हाला शिकवले त्यामुळे आमचा वेळ कसा गेला कळलच नाही.त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते.
पुन्हा कधी कार्यशाळा असेल तर मला तिथे उपस्थित राहायला नक्कीच आवडेल.
श्री रमेश पाटील सरांनी कार्य शाळेचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केले, आमच्या जेवणाची ,चहाची व्यवस्थाही खूप छान होती. त्याबद्दल मी रमेश पाटील सरांचे मनापासून आभार मानते.
— तृप्ती भगत.

३. लेखन अन् मी साहित्य समूह, कोल्हापूर व काव्य योग संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा” डोंबिवली येथे संपन्न झाली. कवी, गझलकार आणि समीक्षक श्री विजय जोशी (विजो) यांनी उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून आम्हाला, मात्रा‌ म्हणजे काय ?, मात्रावृत्त, अक्षरच्छंद, अक्षरगणवृत ते गझल तंत्र पर्यंतचा सखोल सराव‌ घेतला, समजावून सांगितला. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांचे निराकरण झाले याचे सर्वांना समाधान आहे. त्यामुळे विजो सरांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार.
या शिकवलेल्या सर्व गोष्टीचा कवी म्हणून सर्वांना खुप फायदा होणार आहे. धन्यवाद.
— केशवराव चेरकु

४. लेखन अन् मी साहित्य समूह कोल्हापूर यांच्यातर्फे काल, २८-४-२०२४ रोजी आयोजित केलेल्या ऑफलाइन कार्यशाळेत वृत्तबद्ध कविता ते गझल या विषयांवर अतिशय मोलाचं मार्गदर्शन माननीय कवी, गझलकार श्री विजय जोशी सरांनी केले.
वृत्तबद्ध कविता म्हणजे काय ? संस्कारी कविता कशी असावी ? याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजावून दिले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
कवीला कविता सुचतेच पण त्या कवितेची मांडणी किंवा अलंकारिक शब्दांची रचना कशी असावी तसेच शुद्ध यमक जुळवून कवितेला लय कशी प्राप्त करून द्यावी, तसेच घाई न करता बरेच वेळा कवितेचे वाचन करावे यामुळे काव्य लेखनात सुधारणा होण्यास मदत होते, हे अगदी सुंदर पद्धतीने समजावून दिले.
सर्व आयोजकांनी या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन अतिशय व्यवस्थितपणे केले. त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
— सौ. निलम देवेंद्र शेलटे. ठाणे

५. लेखन अन् मी साहित्य समूह कोल्हापूर यांच्या विद्यमाने २८-४-२०२४ रोजी एकदिवसीय ऑफलाइन वृत्तबद्ध कविता ते गझल कार्यशाळा डोंबिवली येथे झाली.

या शाळेसाठी कवी, गझलकार श्री.विजय जोशी (विजो) सरांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभले. कवितेचे मुख्य स्वरूप काय ?ती नियमबद्धरित्या कशी करावी ? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.विजो सरांचे मार्गदर्शन इतके अप्रतिम आणि सोप्या भाषेत होते की सहजरित्या कवितेशी अजून घट्ट नातं निर्माण झाले आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यालयात ही कार्यशाळा झाल्यामुळे पुन्हा एकदा बालपण जगता आले.

मी आयोजकांची मनपुर्वक आभारी आहे. ऊकृष्ट आयोजन केले गेले होते.

— कु. श्रद्धा सावंत.

देवेंद्र भुजबळ

— वृत : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments