“काल नवऱ्याला भाजी आणायला पाठवलं.” ही सुरुवात तुम्ही अनेकदा ऐकली असेल आणि मग नवऱ्याने कस काही भलतंच आणलं वगैरे वगैरे. त्या विषयावर मला बोलायचंच नाहीय. कारण त्यावर बोलायला सुरुवात केली तर त्याचा अंत कधी होणारच नाही बहुतेक.
एरव्ही भाजीपाला आणण्याचं काम जरी माझं असलं तरी कधी कधी मला घराबाहेर पडू द्यायचं नाही म्हणून घरातले बाकीचे भाजी व इतर वाण सामान घेऊन येतात. काल आमचे “हे” भाजी आणायला गेले आणि ढीग भर शेवग्याचा शेंगा घेऊन आले. सोबत लेक होताच.
शेवग्याच्या शेंगा बघून मी ओरडलेच. “हे कोणी नसते उद्योग सांगितले तुम्हाला करायला ?”, असं म्हटलं. मी जेव्हा भाजी आणते तेव्हा मी शेंगा दिसल्या की आवर्जून घेते करण शेवग्याच्या शेंगा ह्या सांधेदुखी करता चांगल्या असं मी कुठे तरी वाचलं आहे. खरंतर शेवग्याचा पालाही खूप चांगला आणि पौष्टिक असतो. तो मिळाला तर तो ही आणते. शेंगा उकडून त्यात मीठ, मिरपूड घालून त्याच पाणी सूप सारख पिण्यासाठी चांगलं लागत आणि मग शेंगा चावून खायच्या. हे सगळे सोपस्कार घरी जेवण करणारी माझी मयुरी असेल तेव्हा ठीक आहे. पण काल ह्या शेंगा बघून मी थोडी रागावलेच. नवरा बिचारा म्हणाला, “बघ जमलं काहीं करायला तर”. शेंगा तोडून फ्रीज मध्ये ठेवत असताना लक्षात आलं की, आज आपण आंबट वरण (सीकेपी पद्धतीचं मस्त गूळ आणि चिंच घालून) केलं आहे त्यात ह्या शेंगा घालू शकतो. मग लगेच एका शेंगेचे 5 तुकडे केले आणि पाण्यात उकडत ठेवल्या. आंबट वरण थोडं जाड झालं होतं त्यामुळे त्यात उकडलेल्या शेंगाचं पाणी घालून त्याला पातळ केलं आणि त्यात शेंगा घातल्या.
हे सगळं करत असताना आठवण आली ती आमच्या आजोळच्या शेवग्याच्या शेंगांची. माझ्या आजोळी म्हणजे कल्याणला पार नाक्यावर सुळे वाड्यात खूप मोठं शेवग्याचं झाड होतं. झाडाला भरपूर शेंगा लागायच्या. माझी आई आणि तिच्या बहिणी कल्याणला गेल्या की येताना हमखास शेंगा घेऊन यायच्या. आपल्या माहेरच्या दारातल्या शेंगा घेऊन येताना त्यांची छाती अशी अभिमानाने फुलली असायची जणू काही त्यांना एखाद्या दिव्यत्वा करता पारितोषिक मिळाले असावं. पण खरंच त्यात खूप गंमत असायची. आपल्या बहिणींकरता शेंगा काढण्या करता खास माणूस बोलावला जायचा, त्याला झाडावर चढवून त्याच्या कडून शेंगा काढून घेतल्या जायच्या. शेंगांचा ढीग घरात यायचा. मग त्याचे वाटे व्हायचे. ते वाटे प्रत्येकाला बांधून द्यायचे काम माझे मामा स्वतः करायचे. कोण म्हणायचं मला कमी तर कोण म्हणायचं मला जास्ती द्या. बरेचदा मुंबईहून आईची इतर भावंड पण त्यांच्या बरोबर असायची मग आणखी धम्माल, आणखी शेंगा, आणखी वाटण्या. सगळ्यांना मनसोक्त शेंगा मिळतील इतक्या शेंगाने ते झाड बहरून यायचं. एखाद्या वेळेस शेंगा नसल्या की माझ्या मामांना फार चुकल्या चुकल्या सारख वाटायचं. आपल्या माहेरच्या परसातल्या झाडाच्या शेंगा, त्यांची बातच निराळी हे माझ्या आई आणि तिच्या बहिणींना वाटणे स्वाभाविक आहे.
अशी ही शेवग्याची शेंग. ह्या शेंगेचे अनेक उपयोग होऊ शकतात. मी म्हंटल्या प्रमाणे उकडून खाऊ शकतो, वरण, डाळ, सांबार इत्यादी पदार्थां मध्ये ही शेवग्याची शेंग घातली की त्याला एक वेगळीच चव येते. फ्लावर वाटणा बटाटा अशा मिक्स भाजी मधे शेवग्याची शेंग घालून बघा. नक्की आवडेल. शेवग्याचे शेंगवणी तर अप्रतिमच लागते.
काही लोकांकडे गोकुळाष्टमीला शेवग्याचा पाल्याची भाजी आणि भाकरी करतात. शेवग्याचा पाला खूपच पौष्टिक असतो. आम्ही कधी तरी ग्रीन स्मूधी करतो त्यात हा पाला घालतो. पाला सहसा मिळत नाही. काही ठराविकच भाजीवाले तो ठेवतात.
झाल्या का काही आठवणी ताज्या? चलातर मग लिहा पटापट तुमच्या आठवणी. काहींना युगंधरा कादंबरीतील शेवग्याचे झाड आठवलं असेल नक्की. हो ना ?
— लेखन : सोनल साटेलकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800