Thursday, May 30, 2024
Homeलेखश्रीराम जन्म उत्सव

श्रीराम जन्म उत्सव

नमस्कार प्रिय मैत्रांनो.
आजचा शुभ दिन श्रीरामप्रभूंच्या पृथ्वीतलावर अवतरण्याचा. आजच्या तिथीला माध्यान्ह प्रहरीचा सुमंगल सुमुहूर्त साधतांना अस्मानात देवसभा अवतरली, तर तेजोनिधि सूर्य आपल्या रथाचा आवेग आवरत ‘माझ्याहून तेजस्वी असे कोण बरे असावे?’ अशा विचारात म्हणे कित्येक महिने तिथेच खोळंबला! हे आक्रितच म्हणावे.
आपल्यासारख्या सामान्य जनांची मने जर रामजन्माच्या क्षणी अशी आनंदसागरात विहरत असतील तर सिद्धहस्त महाकवी कालिदासांच्या भावना रामजन्माच्या कल्पनेने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात यात नवल ते काय!

महाकवी कालिदासांच्या ‘रघुवंशम्’ या महाकाव्याच्या दहाव्या सर्गात रामजन्माच्या प्रसंगाचे अति सुंदररित्या वर्णन केले आहे. धरेला आणि स्वर्गातील देवांना भार झालेल्या उन्मत्त रावणाचे पारिपत्य करण्यासाठी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर मानवरूपात त्यांचा सप्तावतार घ्यावा, अशी देवादिकांची आणि भूमातेने प्रार्थना करीत विष्णूस्तुती आरंभिली. रावणाचे भूतलावरील सर्व अत्याचार आधीच जाणून असल्याने विष्णू भगवान देवांना अभय देत म्हणतात, ‘देव हो! चंदनाचा वृक्ष जसा सापाने त्याला आलिंगन दिले तरी निर्भय वृत्तीने त्याला धारण करतो, तसाच या रावणाला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे आलेला उन्मत्तपणा मी सहन करीत आहे. आता मीच दशरथपुत्र म्हणून मानव जन्म घेऊन माझ्या अमोघ बाणांनी या रावणाच्या मस्तकरूपी कमलसमूहांना (शिरकमलांना) युद्धभूमीचे पूजन करण्यास बाध्य करीन!’ यथासमयी दशरथाच्या हस्ते महातपस्वी ऋष्यशृंग मुनींच्या अधिपत्याखाली पुत्र कामेष्टी यज्ञ सुफळ संपूर्ण झाला. त्या यज्ञाच्या ज्वालेतून एक महातेजस्वी दिव्य पुरुष प्रकट झाला. स्वयंभू असे भगवान विष्णू ज्यात आधीच प्रविष्ट झाले होते, असे ते सुवर्णकुंभातील पायस (चरू) सांभाळणे त्या दिव्यपुरुषाला देखील जड जात होते. असे ते सुवर्णकुंभ घेऊन तो दिव्य यज्ञपुरुष अग्नीतून प्रकट होतांना सर्वांना दृष्टीस पडला. ते चरू पात्र राजा दशरथाने मोठ्या भक्तिभावाने ग्रहण केले.

मंडळी, तिन्ही लोकांचा स्वामी अशा त्या विष्णूदेवाने संपूर्ण मानवजातीतून महापराक्रमी आणि सद्गुणी अशा परम भाग्यशाली दशरथ राजाच्या पोटी जन्म घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावरून या ‘देवपिता’ दशरथाच्या ठायी किती देवसुलभ गुण होते हे आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल. ज्याप्रमाणे वासरमणी (सूर्य) आपल्या पहाटेच्या उन्हाचे दान आकाशाला आणि धरेला अर्पण करतो, तद्वतच त्या दशरथ राजाने विष्णूचे चरू (तेज) आपल्या दोन राण्यांमध्ये (कौसल्या आणि कैकेयी) यांना अर्धे अर्धे विभागून दिले. कौसल्या दशरथाची जेष्ठ पट्टराणी असल्याने आणि केकय देशची राजकन्या अर्थात कैकेयी ही त्याची आवडती राणी असल्याने तो या दोन्ही राण्यांच्या द्वारे सुमित्रेला आपल्यातील अंशाचे दान करून त्यांना सन्मानित करू इच्छित होता. आपल्या पतीच्या मनांतील सर्वच भाव जाणणाऱ्या, पृथ्वीपती अशा राजा दशरथाच्या मनातले त्याने न सांगताही ओळखणाऱ्या अशा त्या दोन्ही पतिव्रता स्त्रियांनी (कौसल्या आणि कैकेयी) मोठ्या प्रेमाने आपल्याला मिळालेल्या चरूच्या अर्ध्या अर्ध्या भागातून (त्याचा) अर्धा अर्धा भाग राणी सुमित्रेला दिला. हत्तीच्या दोन्हीं गंडस्थळातून प्रवाहित झालेल्या दोन्हीं मदजलधारांवर ज्याप्रमाणे भ्रमरी जसे समसमान प्रेम करते, तद्वतच अत्यंत सद्गुणी अशी राणी सुमित्रा आपल्या या दोघी सवतींवर (कौसल्या आणि कैकेयी) समसमान प्रेम करीत होती. सूर्य त्याच्या अमृता नामक नाड्यांच्या द्वारे जसा (बाष्पाच्या रूपात) जलमय गर्भ धारण करतो, तसाच त्या तिन्ही राण्यांनी प्रजेच्या उत्कर्षाकरता विष्णूंच्या अंशाने प्रदीप्त झालेला असा तो तेजस्वी गर्भ धारण केला. नवतीची फलधारणा केलेली पिके जशी पिवळसर कांतीने शोभून दिसतात, तशाच प्रकारे एकाच वेळी गर्भ धारण केलेल्या अन त्यामुळे कांती किंचित फिक्की पडलेल्या त्या गर्भवती राण्या आता गर्भतेजाच्या अत्युत्तम लक्षणांनी युक्त म्हणून अधिकच सौंदर्यशालिनी प्रतीत होत होत्या.

त्या तिन्ही गर्भवती राण्यांनी एक अलौकिक स्वप्न पाहिले. शंख, चक्र, गदा, तलवार आणि धनुष्य या सर्व आयुधांनी सुसज्जित अशा देवतुल्य पुरुषांनी त्या तिघींना सुरक्षा प्रदान केली आहे. आपल्या तेजोमय आणि भक्कम पंखांनी सर्वदूर प्रकाशपुंजाचे साम्राज्य पसरवीत आकाशातील मेघांना आकृष्ट करणारा प्रत्यक्ष पक्षीराज गरुड अतिशय वेगवान भरारी घेत त्यांना अस्मानात उडवून नेत आहे. महाविष्णूने प्रेमाने दिलेला कौस्तुभ मणी आपल्या वक्ष:स्थळावर मोठ्या अभिमानाने धारण करणारी लक्ष्मी देवी त्यांना कमलरूपी पंख्याने वारा घालते आहे. आकाशगंगेत आन्हिक करून पावन झालेले सप्तर्षी अर्थात सात ब्रह्मर्षी-अंगिरस, अत्रि, क्रतु, पुलस्त्य, पुलह, मरीचि आणि वसिष्ठ हे परब्रम्हाचे नामस्मरण करीत त्यांना वंदन करीत आहेत, कारण या सर्वांना ज्ञात आहे की, या तिघी वंदनीय अशा देवमाता होणार आहेत. जेव्हां त्या राण्यांनी दशरथाला त्या विलक्षण स्वप्नाबद्दल सांगितले, तेव्हां त्याने ते ऐकून अतिशय आनंदित होत जगत्पित्याचा पिता असल्याने स्वतःला सर्वोत्तम आणि धन्य मानले. निर्मल जलात जसे चंद्राचे प्रतिबिंब विभाजित झालेले दिसते, तद्वतच त्या एकरूप सर्वव्यापी असलेल्या महाविष्णूने त्या तिन्ही राण्यांच्या उदरी विभाजित होत निवास केला.

असे मानल्या जाते की, सूर्य जेव्हां अस्ताला जातो, तेव्हां तो आपले तेज वनस्पतींमध्ये ठेऊन जातो. याचाच आधार घेत कविश्रेष्ठ कालिदास म्हणतात की, जसे रात्रीच्या तमात वनस्पती ते तम नाहीसे करणारे तेज प्राप्त करतात, त्याच तऱ्हेने राजा दशरथाच्या पतिव्रता पट्टराणी कौसल्येने तमोगुणाचा विनाशकर्ता असा पुत्र प्राप्त केला. या कौसल्यासुताच्या ‘अभिराम’ देहामुळे, अर्थात अत्यंत मनोहर रुपामुळे प्रभावित झालेल्या पित्याने या बालकाचे नांव ‘राम’ असे ठेवले, जे अखिल विश्वात प्रथम मंगलस्वरूप म्हणून प्रसिद्ध पावले. राम या शब्दाचा अर्थ ‘कल्याण करणारा’ असा होतो. ‘राम’ नाम प्राप्त केलेले हे बाळ (म्हणजे रघुकुलाचा दीपक) अद्वितीय, अनुपम आणि तेजस्वी दिसत होते. या नवजात बाळाच्या रूपतेजापुढे प्रसूतिगृहात संरक्षण करणारे दीप जणू त्यांचे तेज हरवल्यामुळे निस्तेज वाटू लागले. किती हे मनोहर दृश्य! नुकताच कौसल्येने बालरामाला जन्म दिलाय. ते तिच्या शेजारी शांतपणे झोपलंय. त्याच्या जन्मानंतर माता कौसल्या (उदर रिते झाल्या कारणाने) कृशोदरी दिसते आहे. शरद ऋतूत वालुकामय तीर जसा कमलाच्या उपहारस्वरूप भेटीने शोभून दिसतो, तशीच ती कौसल्या माता दिसत होती. कैकेयीने भरत नामक शीलसंपन्न मुलाला जन्म दिला. लक्ष्मीला ज्याप्रकारे विनय शोभून दिसतो, त्याचप्रमाणे भरताने त्याच्या जन्मदात्रीस (कैकेयीस) जणू विनयाचा अलंकारच अर्पण केला. जर एखादी व्यक्ती योग्य प्रकारे साधना करीत असेल तर तिच्यामुळे इंद्रियांवर विजय (जितेंद्रियता) साधता येतो तसेच तत्वज्ञानाचा संपूर्ण आशय आत्मसात करता येतो, त्याच तऱ्हेने सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या बालकांना जन्म दिला.
या गुणनिधान बालकांच्या जन्मानंतर सगळे जग दुष्काळाच्या विवंचनेतून मुक्त झाले, तसेच सर्वत्र आरोग्य, सुबत्ता इत्यादी गुणांनी समृद्ध झाले. जणू कांही स्वर्गातली सुखसंपन्नता विष्णूच्या पदचिन्हांचे अनुसरण करीत त्याच्या मागोमाग पृथ्वीवर अवतरण करती झाली. परंतु रामजन्माच्या त्याच पुनीत क्षणी तिकडे लंकेत दशानन रावणाच्या मुकुटातील मौक्तिकमणी पृथ्वीवर ओघळले. जणू या मिषाने राक्षसांची ऐश्वर्यलक्ष्मी अश्रू ढाळू लागली. अर्थात, मुकुटातील रत्ने खाली पडल्याने अपशकुन झाला. रामाच्या हातून रावणाचा मृत्यू होणार हे निश्चित झाल्यामुळे रावणाची वैभवसंपन्न ऐश्वर्यलक्ष्मी अश्रुपात करू लागली. अयोध्येत पुत्रजन्माने धन्य झालेल्या राजा दशरथाच्या चार पुत्रांच्या जन्म मुहूर्तावर मंगलवाद्यांचा शुभारंभ मात्र स्वर्गात झाला. तिथे देवांनी नगारे वाजवायला सुरुवात केली. राजा दशरथाच्या भव्य राजमहालात स्वर्गातील कल्पवृक्षाच्या दिव्य सुमनांचा वर्षाव झाला. पुत्रजन्माच्या आवश्यक अशा मंगलमय उपचारांची सुरुवात या पुष्पवर्षावानेच झाली.

आता जातकविधीने संस्कारित झालेली ती तिन्ही बालके धात्रीचे दुग्ध पीत जणू त्यांच्यापेक्षा किंचित आधी जन्मलेल्या त्यांच्या वडील भावाबरोबर (रामाबरोबर) आणि परमानंदाने कृतकृत्य झालेल्या पित्याच्या छत्रछायेत मोठी होत होती. जसे अग्नीचे तेज आहुती ग्रहण करता करता घृतामुळे (तुपामुळे) सहजरित्या वृद्धिंगत होते, तसेच या बालकांचे सद्गुण आणि विनम्र स्वभाव त्यांना मिळणाऱ्या संस्कारांनी आणि विद्येने अधिकच विकसित होत होते. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या चारही भावात समसमान प्रेमाचे संबंध होते, मात्र तरीही जशी राम आणि लक्ष्मणाची आपसूकच जोडी जमली तशीच भरत आणि शत्रुघ्नाची देखील जोडी होती. अखिल पृथ्वीचा स्वामी अशा दशरथाची ही चारही बाळे चार प्रकारांनी शोभून दिसणाऱ्या शरीरधारी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या सजीव अवतारांसारखी शोभायमान भासू लागली.

मैत्रांनो, या प्रकारे महाकवी कालिदासांनी रघुवंशम् या आपल्या महाकाव्यात श्रीरामजन्माचे हे पुण्यपावन पर्व मोठ्या रसिकतेने तसेच भक्तिभावाने वर्णन केले आहे. आपण या परमपवित्र रामनवमीच्या दिनी प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत त्यांचे महान गुणविशेष आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या!
धन्यवाद!

— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments