१. जय श्रीराम
क्षात्रतेज जागवून म्हणा,
जय श्रीराम, जय श्रीराम,
बलशाली या होऊ चला,
जय बजरंग, जय हनुमान,
राक्षस मातले अवतीभवती,
नेते त्यांचे ते, का गुरगुरती ?
वठणीवर आणू साऱ्यांना,
एकजूट व्हा, गा जयगान,
एकजूटीने, एक मनाने,
रामाच्या या जयघोषाने,
पेटून ऊठून जागृत करूया,
मातीची वाढवू ती शान,
पराक्रम तो करण्यासाठी,
विविध शस्त्रे या, घेऊ हाती,
हिंदूराष्ट्र या नवीन जागवू,
रामाची मग घेऊ आण…!!!
— रचना : हेमंत भिडे
२. शाप की वरदान
शरयुतिरी अयोध्या नगरी
वसिष्ठमुनींचे होता आगमन
पुसे राजा दशरथ, शंकासमाधान
मज मिळाला शाप की वरदान
सांगा मुनिवरा मज
मिळाला शाप की वरदान
उत्तरे आनंदाश्रूंनी भिजले नयन
केला यज्ञदेवतेसी प्रसन्न
खुद्द अग्निदेवता देती पायसदान
दशरथ मन झाले
आनंदघन हो दशरथ
मन झाले आनंदघन
गर्भवती तिन्ही राण्या सौंदर्यखाणी
पुरती-पुरती डोहाळे परोपरींनी
धनुष्य-बाण ल्याली कौसल्याराणी
दशरथ पाहे डोळे विस्फारुनी
हो पाहे डोळे विस्फारुनी
उगवला चैत्र शुध्द नवमी दिन
बहरले हळदकुंकवाने, वसंते रानवन
माध्यान्ही सूर्यतेजे उजळले गगन
सूर-ताल-गंधात मेदिनी मगन
हो सूर-ताल-गंधात मेदिनी मगन
आली आली सौख्य पर्वणी
सनई दुंदुभीचा नाद घुमला
पान्हवल्या धेनू हंबरती अंगणी
युवतीसंघ नाचत सांगत चालला
हो राम जन्मला ग राम जन्मला
— रचना : विजया केळकर. नागपूर
३. रामायण
जन्मला सूर्यवंशात राम
पुत्रकामेष्टी करूनी यज्ञ
राम जन्मला अयोध्येत
सजली नगरी आनंदले जन |१|
धरणीवरी वाढली पापे
देव जन्मले मानवापरी
ॠषी,देवगण आनंदले
यज्ञ रक्षणास धाडले वनी |२|
कुमारवयात पराक्रम केला
सीता स्वयंमवरात जिंकली
पापी रावण हरला पण
राजे, माहाराजे हसती त्याला |३|
मनीमानसी राम रूप बसले
रामसीता आगमने सजली नगरी
राजपद देण्यास कैकयीने दिला नकार
रामास दिला वनवास |४|
वनी रावणाने केले सीतेचे हरण
झाले घनघोर युध्द
परी गर्भवतीचा केला त्याग
धाडीली वनी सीतेला |५|
पतीव्रता असूनी जनासाठी
करूनी त्याग दुःख झेलले रामाने
दिले लव, कुश दोन रत्न
सीता अंतर्धांन पावली |६|
–– रचना : डाॅ.अंजली सामंत. डहाणू
४. रामनवमी उत्सव
अयोध्यानगरी उषःकाल झाला,
गर्जती दुंदुभी झडे चौघडा
उभारा गुढ्यातोरणे स्वागताला,
पंचारती घेई औक्षणाला //
चैत्राच्या नवमीचा मुहूर्त हा
माध्यान्ही तळपे रविराज हा
कौसल्याराणीच्या अंकावरी या
रघुवंश उदय झाला पहा
आनंदे कौतुके औक्षण करुया,
पुष्पवृष्टी करा स्वागताला //
आम्रतरु आज मोहोरला
राजा ऋतुंचा आनंदला
आमंत्री कोकीळ पक्षीगणांना
दशरथ राजास पुत्र जाहला
उत्सव साजरा, वाटूं या
साख-या ‘श्रीराम ‘ ठेविले नाम तया //
— रचना : स्वाती दामले. बदलापूर
५. राम रंगी रंगले
जन्म राम धर्म राम
कर्म राम मर्म राम
आदी राम अंत राम
मन राम तन राम
शूर राम वीर राम
यश राम जय राम
भक्ती राम शक्ती राम
भज राम भाव राम
आस राम कास राम
भास राम वास राम
दास राम रघू राम
सीता राम राजा राम
कीर्ती राम मूर्ती राम
राज्य राम भाग्य राम
— रचना : मीरा जोशी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800