नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पोफळे घराणे प्रसिद्ध आहे. स्व.श्रीधरपंत पोफळे हे स्वातंत्र्य सैनिक होते. दुसरी गोष्ट म्हणजे शेवट (९३ वर्ष) पर्यंत ते कार्यरत होते. त्यांना कुणी आजारी पडलेले असे कधी पाहिलेच नाही. त्यांचे चिरंजीव मुकुंदसेठ यांचे सुरुवातीला भांड्याचे दुकान होते. त्यांच्या तिन्हीं मुलांनी पुढे याचा विस्तार केला. आता स्वस्त धान्याचे दुकान (रेशन) चालवित आहे. सोबतच घरची शेतीही पहात आहेत. मुकुंदसेठ पोफळे यांची पत्नी सौ बेबीताई, ही माझ्या पत्नीची, अलकाची आत्या. या संपूर्ण परिवाराचा स्वभाव अतिशय अगत्यशील असल्याने गेली ३७ वर्षे आमचे त्यांच्याकडे जाणे येणे होत राहिले आहे. मुंबईत ते आले की, कितीही घाई असली तरीही ते आम्हाला उभ्या उभ्या का होईना पण भेटून जातात.
मुकुंदसेठ आणि बेबीताई यांना ३ मुले आणि ३ मुली. तीनही मुले चांगली कर्तबगार निघाली. त्यांनी आपापल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे. तिन्ही मुलीही सुस्थळी पडल्या असून छान संसार करीत आहेत.
अशा या पोफळे घराण्याच्या दृष्टीनेच नाही तर आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय अभिमानाची बाब घडली आहे. ती म्हणजे अलकाचा आतेभाऊ असलेल्या अतुल मुकुंदशेठ पोफळे ची मुलगी, श्रेया हिला “वास्तुकला आणि अंतर्गत रचना”: “उत्कृष्टतेचा उत्सव” (नॅशनल आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 ) या राष्ट्रीय स्पर्धे अंतर्गत
“सर्वोत्कृष्ट सर्जनशील आणि उदयोन्मुख अंतर्गत रचना आणि प्रकल्प व्यवस्थापन संस्था – 2025, महाराष्ट्र” तसेच “विश्वासार्ह आणि उदयोन्मुख वास्तुविशारद आणि अंतर्गत रचनाकार – 2025, महाराष्ट्र” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार तिला नुकताच बिगीनअप या संस्थेतर्फे बंगळूर येथे ताज वेस्टएंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. वास्तुकला आणि अंतर्गत रचना क्षेत्रातील उत्कृष्टता, नाविन्य आणि सर्जनशीलतेचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

विशेष म्हणजे पुरस्कार कुणाला द्यायचा हे, ही संस्था स्वतःच ठरवीत नाही. तर या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर व्यक्ति विविध उल्लेखनीय प्रकल्प आणि व्यक्तींना नामांकित करीत असतात. पुढे पुरस्कार निवड समितीच्या वतीने सर्व नामांकने तपासली जाऊन त्यातून अंतिम निवड करण्यात येते. या निवड समितीत नावाजलेले वास्तुविशारद, अंतर्गत रचनाकार असतात. ते नामांकनातील नाविन्य, शाश्वतता, सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमतेच्या निकषांवर मूल्यांकन करून पुरस्कारासाठी अंतिम निवड करतात.

अंतिम निवड केलेल्या स्पर्धकांना आपापले सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यांनी त्यांचे प्रकल्प सादर करत
असताना त्यांचे दृष्टीकोन, त्या मागील भूमिका निवड समितीच्या सदस्यांना समजावून सांगावी लागते.
अशी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रेया अतुल पोफळे हिच्या “श्रीनिवासम” या प्रकल्पाला हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रकल्पात मिनिमलिस्टिक दृष्टिकोन, शाश्वतता, उबदार आणि न्यूट्रल रंगसंगती, कार्यक्षम आणि स्टायलिश फर्निचर, साधेपणा आणि आधुनिकता यांचे उत्तम मिश्रण आहे.
हा पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना श्रेया म्हणाली, “हा पुरस्कार मिळणे ही आमच्या टीमसाठी अभिमानाची बाब आहे. वास्तुकला व अंतर्गत रचना क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे. पुरस्कार देणाऱ्या बिगीनअप या संस्थेचे आणि निवड समितीच्या मान्यवर सदस्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच आमच्या संपूर्ण टीम, ग्राहक आणि सहकाऱ्यांचेही विशेष आभार, कारण त्यांच्यामुळे हे शक्य झाले.”
पुरस्कार प्रदान कार्यक्रमात वास्तुशास्त्र उद्योगातील प्रमुख तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. विविध चर्चासत्रे, प्रमुख भाषणे आणि एकमेकांशी संवाद साधण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली. यावेळी श्रेया ने तिच्या प्रेरणा, रचना, तत्त्वज्ञान आणि भविष्यातील योजनांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास प्रसिद्ध वास्तुविशारद, रचनाकार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती. यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

श्रेया च्या या यशाचे विशेष कौतुक यासाठी वाटते की, तिचे सहावी पर्यंतचे शिक्षण येवला येथीलच स्वामी मुक्तानंद विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. तर सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याच शाळेत सेमी इंग्लिश माध्यमातून तर बारावी पर्यंत चे शिक्षण इंग्लिश माध्यमातून झाले. पुढे आपली आवड ओळखून तिने वास्तुशास्त्र ही शाखा निवडली. रीतसर प्रवेश परीक्षा देऊन तिने पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पाच वर्षांचा
हा अभ्यासक्रम करून नोकरीच्या मागे न लागता, एकीकडे तिने एम आय टी संस्थेत वास्तुशास्त्रातील मास्टर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तर सहा महिन्यांच्या इंटर्नशिप च्या अनुभवाच्या आधारावर थेट स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखविले आणि एलेगंझा स्टुडिओ ही स्वतःची फर्म सुरू केली. ही फर्म वाणिज्य आणि निवासी स्वरुपाचे प्रकल्प हाती घेत असते. या फर्म ने आता पर्यंत पुणे, सातारा, नाशिक, येवला, नांदेड येथील प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या बरोबरच फर्म मॉड्युलर किचन, कस्टममेड सोफा अशी उत्पादने बनविण्यात सक्रिय आहे. आज श्रेया कडे २ पूर्ण वेळ आर्किटेक्ट, ५ इंटर्न्स तर कारखान्यात जवळपास ५० कामगार काम करीत आहेत.

त्यामुळे एलीगंजा स्टुडिओ हा श्रेया च्या व्यावसायिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यात तिच्या अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी प्रकल्पांसाठी आम्ही उत्सुक आहोत. श्रेयाचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री.चित्तरंजन रांगोळे आणि सौ.नैना रांगोळे, भोर ,पुणे तर्फे श्रेयाचे प्रथम हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.कासार समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे.आमचा सर्वांचा अभिमान आणि पोफळे परिवाराची शान.
श्रेया चे यश आणि प्रसिद्धी वाखाणण्यासारखीच आहे. तिच्या भाविष्यातील संकल्पना साकार होवोत आणि रचनात्मक कारकीर्द वृद्धिंगत होण्यासाठी माझ्या शुभेच्छा…. आर्किटेक्ट श्रीकांत चव्हाण.
पोफळे कुटुंबातील यशाचे नेमके चित्रण.