मकर संक्रांतीचा सण म्हटला की, प्रत्येक स्त्री पुढे प्रश्न पडतो आणि तो म्हणजे ह्यावर्षी संक्रांतीला वाण काय द्यायचे..? अनेक स्त्रिया मागच्या वर्षी कोणी काय दिले याची आठवण करून मग त्या पद्धतीने ह्या वर्षी आपण काय द्यायचे याची निवड करतात.
‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे म्हणत संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. गुजरात मध्ये तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील ह्या दिवशी पतंग उडवणे तर दक्षिण भारतात म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात जवळजवळ सर्व मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा करून दान पुण्य करून हा सण साजरा केला जातो.
त्याच पद्धतीने उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी नावाने या सणाची सुरुवात होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या आपल्या पद्धतीने दान पुण्य करत हा सण साजरा केला जातो.
मात्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत स्त्रियांचा हळद कुंकवाचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत मकर संक्रांतीचा सण पूर्ण होत नाही. बदलत्या काळाबरोबर स्त्रियांचे विचार देखील आधुनिक होत आहे म्हणून समाजातील काही सुशिक्षित वर्गाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्यानंतर एकमेकीला वाण म्हणून भेट वस्तू देणे म्हणजे अडाणीपणाचे लक्षण असे देखील वाटते. मात्र ज्या पद्धतीने कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, अगदी त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण एकीकडे कोणाला अंधश्रद्धा किंवा मग विनाकारण लादलेल्या परंपरा आहेत, असे वाटते.
असे असले तरी पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे सण म्हणजेच मानवी जीवनावर घडत जाणारे सुसंस्कार ज्यातून एकमेकांच्या परिस्थितीची जाणीव होऊन एकमेकाबद्दल सहानुभूतीची भावना मनात रुजली जाते आणि विशेष म्हणजे सणावारांच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी आणि त्यातून एकमेकांमधील गुणांचा परिचय होणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे.
मकर संक्रांतीचा वाण देणे हा पूर्वीपासून सुरू असलेला कार्यक्रम यालाच वळण देत जर बदलत्या काळाबरोबर आपण सर्वांनी थोडासा विचार केला की मकर संक्रांतीला एकमेकीला भेट म्हणून प्रत्येक वर्षी बाहेरच्या वस्तू विकत घेण्यापेक्षा आपल्यामध्ये असलेल्या एखाद्या कलागुणांची ओळख करून घरच्या घरी एखादी छान सर्वांना उपयोगी पडेल अशी निर्मिती करून किंवा आपल्या अवतीभवती स्वतः हाताने उपयोगी वस्तू बनवणाऱ्या आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांच्याकडून त्या विकत घेत इतरांनाही विकत घेण्यासाठी मार्गदर्शन करता आले पाहिजे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षी आपण स्वतः देखील आपल्यामध्ये असलेल्या आवडीनुसार एखादी कला शिकून त्यामध्ये परिपूर्ण होण्याकरिता प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने मकर संक्रांत म्हणजेच आनंद आणि नव्या उमेदीचा खरा उत्सव साजरा केल्याचा आपल्याला समाधान मिळेल.
— लेखन : पुनम सुलाने- सिंगल
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800