संगमनेर येथील सूरज शिवराज कोडे या युवकाने पहिल्याच प्रयत्नात ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पूर्ण करत तेथे तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवला. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कोडे याने दहा दिवसांत बेस कॅम्प पूर्ण केला. हा कॅम्प पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील काही मोजक्या गिर्यारोहकांमध्ये आता त्याचाही समावेश झाला आहे.
गिर्यारोहक सूरज सांगतो, ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पूर्ण करण्यासाठी नेपाळ येथे जावे लागते. काठमांडूला पोहचल्यानंतर काही तासांनी आम्ही चढाई सुरू केली. समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर (१७,५९८) उंचीवर असलेला हा कॅम्प पूर्ण करण्यासाठी साधारण १३ दिवस लागतात. येथे जाताना शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी लागते. कमी ऑक्सिजन व उंचीवरील विरळ हवा अशी परिस्थिती असते. चढाईला सुरुवात केल्यानंतर पहिले तीन दिवस चालावे लागते. त्यानंतर एक दिवस थांबून पुन्हा चालायचे. गिर्यारोहणाचा फारसा अनुभव नव्हता. यापूर्वी केवळ कळसूबाई शिखर सर केले होते. मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. एवढाच अनुभव पाठीशी असताना ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर करणे माझ्यासमोर आव्हान होते.
मूळच्या संगमनेरातील आणि सध्या पुणेस्थित गिर्यारोहक कडलग तसेच गिर्यारोहक रॉबिन हिंगणेकर, बाबा भोईर आणि अतुल कोल्हापुरे यांच्यासमवेत ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पूर्ण केला. असेही गिर्यारोहक सूरज याने सांगितले.
आपल्या यशाविषयी बोलताना सूरज म्हणतो, “माझ्या यशात आई-वडील, बहीण मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर नेहा कोडे- नेवाळे, उद्योजक मयूर नेवाळे यांचे पाठबळ आहे. त्यामुळेच माझ्याकडून ही कामगिरी पहिल्याच प्रयत्नात शक्य झाली. भविष्यात माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर सर करण्याचा मानस आहे.”
सूरज हा संगमनेरचा रहिवासी असून, त्याचे वडील शिवराज कोडे हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. तर आई सुनीता या परफेक्ट फाउंडेशनच्या संस्थापिका असून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800