Wednesday, April 23, 2025
Homeबातम्यासख्यांनो,आत्मविश्वासाने जगा - अलका भुजबळ

सख्यांनो,आत्मविश्वासाने जगा – अलका भुजबळ

वृत्तांताच्या शेवटी संपूर्ण मुलाखतीची लिंक !

मनामध्ये आत्मविश्वास असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, असा मूलमंत्र बहुआयामी अलका भुजबळ यांनी तमाम सख्यांना दिला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील “हॅलो सखी” या कार्यक्रमात डॉ. मृण्मयी भजक यांनी त्यांची नुकतीच ‘बहुआयामी सखी’ म्हणून मुलाखत घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

एका प्रश्नाचे उत्तर देताना अलका भुजबळ म्हणाल्या, एखादी घटना मनाविरुद्ध घडत असेल तर महिला, मुलींनी त्यावर विचार करून आपले विचार ठामपणे मांडले पाहिजे. आपल्या विचारानुसार ठाम भूमिका घेतली पाहिजे, तरच त्या त्यांच्या जीवनात यशस्वी होतील.

मी मुंबईत राहणारी असूनही माझ्या घरची मंडळी जुन्या विचारसरणीची असल्यामुळे मी दहावी पास झाल्या झाल्या माझे लग्न उरकण्याची त्यांना घाई झाली होती. परंतु मला आधी शिक्षण घ्यायचे होते, माझ्या पायावर उभे राहायचे होते आणि मनासारखा जोडीदार मिळाला तरच लग्न करायचे असा मी ठाम निर्णय घेतला होता.असे सांगून त्यांनी असाच ठामपणा प्रत्येक महिला आणि मुलीजवळ असला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

इतर सख्यांना तुम्ही कसे पुढे आणले, रिटायरमेंट नंतर वेळ कसा घालवता ? या प्रश्नावर बोलताना अलका भुजबळ म्हणाल्या, प्रत्येकीकडे काही ना काही कला असते. त्यांच्या कलेला वाव मिळावा, संधी मिळावी म्हणून आम्ही आनंद मेळावा भरवित होतो. त्यात प्रत्येकजण आपली कला दाखवीत असे, त्यातूनच समाजसेवेची आवड, सांघिक होऊन काम करण्याची आवड निर्माण झाली.

आरोग्य शिबीर भरवित होतो. समाज माध्यमांद्वारे आता तर अनेक दालने खुली झाली आहेत. महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा कसा फायदा घ्यायचा हे आपण ठरवले पाहिजे. उद्योग, व्यवसाय करताना आत्मविश्वास महत्वाचा असून तो आपण विकसित केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

मुळातच माझ्यात खिलाडू वृत्ती होती. त्यामुळे शाळेत खेळायला आवडतं असे. एमटीएनएलमध्ये व्हॉलीबॉल खेळत असे. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत असे, पण हे सर्व नोकरी सांभाळून करीत असे. यासाठी सासूबाई, पती, मुलगी यांचं नेहमीच प्रोत्साहन मिळत होते, असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

तुमचा अभिनयाचा प्रवास कसा होता ? या प्रश्नावर बोलताना अलका भुजबळ म्हणाल्या, कला क्षेत्रातील अनुभव चांगला होता. आशालता वाबगावकर, सुहास जोशी यांच्या सारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळाले. एव्हढ्या मोढ्या कलाकारासोबत काम करताना दडपण येतं पण त्यांनीही मला समजावून सांगत मनावरील दडपण कमी करून मोकळे पणाने कॅमेरा समोर स्वतःला कसे प्रेझेंट करायचे हे सांगितले. प्रसारित झालेल्या दामिनी, बंदिनी, आई, घरकुल, हे बंध रेशमाचे, महाश्वेता, जिज्ञासा, आदी मालिका तसेच ३१डिसेंबर चे स्पेशल कार्यक्रम, यांमधून काम केल्याचे सांगून त्यांनी यासाठी देखील घरातून पूर्ण पाठिंबा होता, असे त्यांनी सांगितले.

कॅन्सर सारख्या आजारावर कशी मात केली ? यावर बोलताना त्या म्हणाल्या, पोटात एक गाठ होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती काढली.ती गाठ कॅन्सरची होती.कॅन्सर झाला म्हटल्यावर ते मान्य करायलाच पाहिजे आणि ते मी मान्य केले. पुढे केमोसारखे उपचार घेतले. याच दरम्यान कॅन्सरबाबत लोकांमधे जाणीव जागृती व्हावी म्हणून एका लेखनिकाच्या साहाय्याने
‘ कॉमा ‘ नावाचे पुस्तक लिहिले. कॅन्सर म्हणजे फुल स्टॉप नाही, कॉमा करा आणि पुढे जायचे असे सांगून त्या म्हणाल्या, कोणताही आजार झाला तरी आपला दृष्टीकोन सकारात्मक हवा. या आजारामध्ये पती देवेंद्र भुजबळ, मुलगी देवश्री, नातेवाईक आणि ऑफिसच्या मैत्रीणी यांनी खूप मनोबल वाढविले, असे त्यांनी सांगितले. या आजारातून बाहेर पडल्यानंतर ‘आरोग्य संवादिनी ‘ हा कार्यक्रम सुरू केला. माझ्यावर दहा मिनिटांची डॉक्युमेंटरी तयार केली. मी कसे होते, यातून बाहेर कसे पडले आदी बाबींचा त्यात उल्लेख आहे. महिलांनी वेळच्या वेळी आपली तपासणी करून घेतली पाहिजे, आपले आरोग्य आपल्या हाती आहे, वेळेवर जेवण घ्यावे, नियमित व्यायाम, योगासने, ध्यान धारणा करावी सल्ला आपण या कार्यक्रमातून देत असतो, असेही त्या म्हणाल्या.

सध्या अलकाचे काय चालले आहे ? हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात त्या म्हणाल्या, सध्या ‘न्यूज स्टोरी टुडे ‘ हे पोर्टल आम्ही चालवतो. सुमारे ९५ देशात हे पोर्टल पोहचले असून पाच सहा लाखा पेक्षा अधिक त्याचे वाचक आहेत असे सांगून राजकारण आणि गुन्हेगारी यासारखे विषय वगळून साहित्य, आरोग्य, समाज सेवा, यश कथा, पुस्तक परीक्षण, पर्यटन, सकस मनोरंजन, कविता व अन्य विषय आम्ही हाताळतो. शिवाय दररोज एक नियमित सदर असते. पोर्टल साठी देश विदेशातून लेख, कविता येत असतात, असे त्यांनी नमूद केले. शिवाय पुस्तक प्रकाशन व्यवसाय आम्ही सुरू केला असून बरीच पुस्तके प्रकाशित झाली तर काही प्रकाशनाच्या वाटेवर असल्याचे अलका भुजबळ यांनी सांगितले.

संध्या पुजारी निर्मात्या असलेल्या या कार्यक्रमाला ठीक ठिकाणाहून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सानपाडा जेष्ठ नागरिक संघामध्ये तर दूरदर्शन वर सदस्यांनी सामूहिकपणे ही मुलाखत पाहिली. ठिकठिकाणच्या प्रेक्षकांनी देखील कार्यक्रम पाहिल्याचे, तो आवडल्याचे कळविले. काहींनी तर मुलाखतीचे त्यांच्या मोबाईलवर शूटिंग करून ते पाठविले. तर काहींनी छायाचित्रे पाठविली. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील 👇 लिंक ला क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. नमस्कार मंडळी.
    आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
    आपले प्रेम असेच कायम असू द्या.

  2. अलका खूप छान मुलाखत तुझे अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा . अशीच मोठी हो.ह्या कार्यात तुला यश मिळो.

  3. खुप खुप प्रेरणादायी मुलाखत आहे मॅडम अभिनंदन

  4. भुजबळ मॅडम नमस्कार,
    सह्याद्री वाहिनीवरील हॅलो सखी या कार्यक्रमातील आपली मुलाखत सर्वच महिलांसाठी खूपच प्रेरणादायी ठरावी अशा शुभेच्छा देतो.
    वरळी दूरध्वनी केंद्रात कार्यरत असताना आपल्या सोबत काम करण्याचे सौभाग्य लाभले. वरळी दूरध्वनी केंद्रातील वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतीक कार्यक्रमात आपल्या कलेची चुणूक आम्ही पाहिलेली आहे. आपण कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला समर्थ पणे सामोरे जाऊन त्यावर मात केली. व्ही.आर.एस. ( स्वेच्छा निवृत्ती ) नंतर आपल्या शैक्षणिक, सामाजिक, आरोग्याविषयक कार्याला खरी गती मिळाली. ह्या कार्यात तुम्हाला प्रचंड यश मिळो. त्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशा ईश्वरचरणी प्रार्थना.
    🙏 मोहन आरोटे

  5. ताई
    नमस्कार
    आपलं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा

    • अलका मॅडम ,तुमचे जिवन फार प्रेरणादायी आहे. तुम्ही केलेला संघर्ष,त्या संघर्षातून मीळालेले यश, इतरांनाही आपल्या कामात सामावून त्यांचे सुध्दा जिवन सुधारणे.. हे सर्व खरंच कौतुकास्पद आहे. मला आपली जिवन कथा, आपल्याला मीळालेल्या यशाचा अभिमान वाटतो. आपले हे यश गाथेचे कार्य असेच सुरू राहावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता