“केवळ लेखन करून थांबणाऱ्या लेखकापेक्षा आपल्या लेखनातून समाज घडविणाऱ्या लेखकांची नितांत गरज असल्याचे मत लेखिका प्रा.प्रज्ञा पंडित यांनी नुकतेच व्यक्त केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखक विष्णु यादव यांच्या “अशा व्यक्ती… अशा आठवणी” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर दिलीप खेडेकर, कमांडंट, SRPF, लेखक विष्णू यादव, श्यामल यादव, प्रकाशक डॉ. संतोष राणे, अनिल अहिरे उपस्थित होते.
प्रा.प्रज्ञा पंडित पुढे म्हणाल्या, “आज सर्वत्र निराशेचे वातावरण पसरलेले आहे. अश्या वातावरणात लेखकांची जबाबदारी फार वाढलेली आहे. आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमधील चांगले गुण शोधणाऱ्या विष्णू यादव यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडे आहे. गव्हर्नर रघुराम राजन, धर्मवीर आनंद दिघे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब अशा महनिय व्यक्तींबद्दल विविधांगी अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. जगण्याची सकारात्मकता सांगणारे हे लेखन वाचकांना जगण्याची नवी दिशा देते. “जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत”, हा सकारात्मक संदेश लेखक त्यांच्या लेखनातून देतो.”
यावेळी दिलीप खेडेकर, डॉ.संतोष राणे,विष्णू यादव यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाची सुरवात लेखक वाचक समुहावरील गायक-गायिकांच्या सुस्वर गाण्यांनी झाली. पुस्तक प्रकाशन शामल विष्णु यादव यांच्या हस्ते करण्यात आले.संदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल यादव यांनी आभार मानले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800