Thursday, December 26, 2024
Homeलेखसमाज बदलत आहे !

समाज बदलत आहे !

किती तरी थोर थोर महापुरुष, सांगून गेलेत की भारतातील जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. या साठी त्या त्या व्यक्तींनी हयातभर प्रयत्न केले. आज ही काही व्यक्ती प्रयत्न करीत असतात. महाराष्ट्र शासन आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे म्हणून योजना राबवित असते. असे असले तरीही “जात नाही ती जात” असे म्हणतात याची प्रचिती येतच असते.

कुटुंबियांच्या मनाविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेम विवाह केला तर किती भीषण परिणाम होतात, हे “सैराट” चित्रपटात आपण पाहिले आहेच. पण तरीही असे प्रकार थांबण्या ऐवजी वडिलांनी मुलीची हत्या केली, भावाने बहिणीला भोसकले अशा बातम्या वाचल्या की मन व्यथित होते.

खरं म्हणजे जो सज्ञान मुलगा व मुलगी देशाचा पंत प्रधान निवडू शकतो, राज्याचा मुख्यमंत्री निवडू शकतो आणि ज्या दोघानाही कायद्यानेच एकमेकांचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, अशा त्या दोघांचे स्वातंत्र्य त्यांच्या त्यांच्या घरचीच मंडळी मात्र त्यांना नाकारतात आणि त्यातून अनेकदा भयंकर प्रकार घडतात. काही ठिकाणी असे प्रकार घडले नाहीत तरी त्या दोघांच्या घरचे किंवा एकाच्या घरचे लोक कायमचा अबोला धरतात आणि अशाने स्वतःला आणि त्या दोघांना आयुष्यभर दुःखच देत राहतात.

खरं म्हणजे केवळ ते दोघेच नव्हे तर, त्या दोघांचे कुटुंब आणि बहुभाषिक, बहु प्रांतीय, बहुविध अशा आपल्या देशात सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याच्या दृष्टीने केवळ आंतरजातीयच नव्हे तर आंतर भाषिक, आंतरप्रांतीय, आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. इतर बहुतेक देशांमध्ये वंश, भाषा, प्रांत एकच असल्यामुळे भारताला भेडसावणाऱ्या समस्या त्या त्या देशात दिसून येत नाही.

अशा या सर्व पार्श्वभूमीवर नुकताच मी लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे आणि शाहू कॉलेजच्या निवृत्त उप प्राचार्या प्रा विद्याताई दगडे यांचे चिरंजीव श्री प्रतीक आणि श्री नंदकिशोरजी शर्मा यांची कन्या चि.सौ.का.पायल यांच्या विवाहास मी व माझी पत्नी सौ अलका जाऊन आलो.

केवळ उपचार म्हणूनच या विवाह सोहळ्यास उपस्थित न राहता, मनापासूनच जायचे असल्याने आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशी होणारा साखरपुडा, दुसऱ्या दिवशी मारवाडी पद्धतीने वर मराठी पद्धतीने झालेले सर्व विवाह विधी यात आनंदाने भाग घेऊन इतर सर्वांसोबत समरस झालो.

या विवाहाचे वैशिष्ट्य ठरले म्हणजे केवळ दोन्ही बाजूची कुटुंबीय मंडळीच नव्हे तर प्रत्यक्ष विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलेले बाराशे पंधराशे लोक पाहून मला आश्चर्याचा आणि आनंदाचा सुखद धक्काच बसला. लातूर शहरातील सर्व क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्तीं बरोबरच सर्व सामान्य नागरिकही फार मोठ्या संख्येने वधूवरास शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सर्व वातावरण आनंदी होते. लग्न लागल्या नंतर नवरदेव, नवरीच्या मित्र मैत्रिणींनी केलेला जल्लोष तर खरोखरच पाहण्यासारखा, अनुभवण्या सारखा होता. जणू हा विवाह झाला म्हणजे, या सर्व तरुणतरुणींच्याच मनातील ईच्छा पुर्ण झाली होती !

त्या दिवशी संध्याकाळी वधूवरांचा गृह प्रवेश, त्यांची गमतीने केलेली अडवणूक, उखाण्यात घ्यायला लावलेली नावे, दुसऱ्या दिवशीचे विधी हे सर्व पहात असताना माझे लक्ष सारखे वधूवरांच्या चेहऱ्यावर जात होते. त्यांच्या प्रेमाला मिळणारी साद पाहून दोघांचेही चेहरे आनंदाने फुलले होते.

शेवटी आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर सदा आनंद दिसावा, यासाठीच तर सर्व पालकांची धडपड असते ना ? मग आपल्या मुलामुलींच्या प्रेम विवाहास केवळ समाज काय म्हणेल ? लोक काय म्हणतील ? घराण्याची इज्जत गेली, अशा दडपणाला बळी पडून त्यांचे आणि आपले ही जीवन का बरं दुःखी करून ठेवायचे ?
या निमित्ताने माझी सर्व तरुण मुलामुलींच्या आईवडिलांना कळकळीची विनंती आहे की, उगाचच आपापल्या समाजाचा बागुलबुवा न करता, आपापल्या मुलामुलींचे आयुष्य सुखात, आनंदात कसे जाईल, हे बघा. कदाचित सर्व नातेवाईक, परिचित अशा विवाहांना विरोध दर्शवततील, तर तिकडे दुर्लक्ष करा आणि श्रेष्ठ कवी भा.रा.तांबे यांच्या “जन पळभर म्हणतील हाय हाय” या ओळींचे स्मरण करा. असो.

या नव विवाहित दांपत्यास पुन्हा एकदा सुखी, समृध्द जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. खूपच सुंदर लग्न सोहळा. विद्यमान आई-वडिलांचे सुपुत्र दगडे परिवारातील वर व आमच्या शालेय परिवारातील सालस ,शांत, सुंदर ,कन्या . या नवदांपत्यास भावी आयुष्य खूप सुखाचे जावो. दगडे परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.

  2. अगदी देखणा सोहळा. आमच्यासाठी तर जणू आनंदाची पर्वणीच. वर दगडे परिवारातील सुविद्य आई-वडिलांचे अपत्य तर वधू आमच्या शालेय परिवारातील कन्या. अत्यंत सालस व सुस्वभावी कन्या ही बाकी आनंदाची बाब. वधुवराचे भावी आयुष्यअत्यंत आनंददायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  3. खरंच विवाह सोहळा देखणा व सर्वच क्षेत्रातील अनेक नामवंत बांधवांच्या उपस्थित दिमाखात पार पडला. समाजाने आदर्श घ्यावा हाच संदेश यातून मिळाला. सर्वसंमतीने आपल्याच कुटुंबाचा आनंद द्विगुणित करता येतो हे दाखवून दिले. आपणही खूपच छान असे प्रबोधनात्मक विश्लेषण केले. दोघांनाही खुप खुप शुभेच्छा….!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९
शारदा शेरकर on अंदमानची सफर : ९