Saturday, July 20, 2024
Homeलेखसर्वकाही प्रेमासाठी

सर्वकाही प्रेमासाठी

आज इंग्रजी प्रेमाचा दिवस आहे. आम्ही का साजरा करायचा हा दिवस असा प्रश्न बुजुर्ग करतात. सेंट व्हॅलेंटाईनच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. परंतु त्यांचा आदर्श आम्ही का घ्यावा. आमच्या सगळ्याच संतांनी प्रेमाचा उपदेश दिला आहे. तुकोबा म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. दया करणे पुत्राशी तेच दासा आणिक दासी, असा सवाल तुकोबा करतात. एका नाटककारानं म्हटलं आहेच की, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. यातील मनी इंग्रजी घेतला तर पैसा होतो. पैशावर प्रेम करू नका. लोभ म्हणजे हाव व हव्यास तो मात्र प्रेमात मुळीच नको.

प्रेम कुणी करावं कधी करावं याचे काही नियम नाहीत. परंतु एकच दिवस प्रेम करावं का हा प्रश्नच आहे. कोणत्या वयात प्रेम करावं, असाही प्रश्न काहीजण करतील. त्यांना काय म्हणावे. भारतात प्रेम हे अतिप्राचीन म्हणजे अगदी पुराण काळात प्रेमाचे दाखले मिळतील. राधा कृष्णाचे उदाहरण जुनेच आहे. मीरा आणि कृष्णाचे प्रेम तर फेमसच आहे. संत तुलसीदास तर पत्नीप्रेमासाठी सापाची दोरी करून दुसऱ्या मजल्यावर चढून गेले होते.

प्रेम केले काय हा झाला गुन्हा, असे कुमार गंधर्व यांचे गाणे आहे. प्रेम करणं हा गुन्हा नाही. परंतु हा समाज प्रेमी वीरांना तुच्छतेने पाहतो. त्यांच्यावर रोष धरतो. समाजाला दोन व्यक्तीतील प्रेम पसंत नसते. भारतात तर पुरुषाने स्त्रीवर प्रेम करावे, असा संकेत आहे. पुरुषांचे पुरुषावर प्रेम समाजाला मान्य नसते म्हणून तर तृतीयपंथीयांवर समाज रोष धरून असतो. त्यांचेही कुणावर तरी प्रेम असतेच की.

प्रेम भिल्लाच्या बाणावर करावं असं कुसुमाग्रज म्हणतात. तर प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्याचंच सेम असतं असं मगेश पाडगावकर म्हणतात. प्रेम कसं निर्व्याज्य असावं. प्रेम कशाचीच अपेक्षा करीत नाही. कासवी जसं आपल्या पिल्लांना नजरेनंच वाढवीत असते. प्रेमाची एक नजरच काफी असते. नजरेला नजर भिडता प्रेम जडते असे म्हणतात. पण कधी तीच नजर जहरी देखील असते, असे म्हणतात.

आजकालच्या तरुणांना संयम माहीत नसतो. त्यांना झट मंगनी पट शादी प तात्काळ घटस्फोट हवा असतो. पन्नास पन्नास वर्षे एकत्र राहणारी कुटुंबे पाहून तरुण मंडळी आश्चर्यचकित होतात. त्या वृध्दांची भांडणे होतात नाही असं नाही. पण तीही प्रेमाचीच असतात. अहंकार सोडावा असं ती मंडळी म्हणतात. आयुष्यात तडजोड करावी असा सल्लाही ते देतात. जुळवून घ्यावे लागते मग आयुष्य सुखाचे होते, असा त्यांचा अनुभव असतो. त्यांचे विवाहोत्तर प्रेम असते. प्रेम विवाह नसतो. ते विवाहोत्तर प्रेमच टिकाऊ असते, ते अर्ध शतकी किंवा पंचाहत्तरी पार करू शकते.

एकमेकांना जीव लावणे याचे नाव प्रेम. तुझ्याकडे बंगला गाडी आहे, चिकार पैसा आहे मग मी तुझ्यावर प्रेम करते असे म्हणणे हा व्यवहार झाला. आजकाल तो महत्त्वाचा झाला आहे. प्रत्येकजण स्वावलंबी आहे, कमावता आहे. कमावती आहे त्यामुळे अहंकार इगो तयार होतो. जुळवून घ्यायला तरुण तरुणी तयार नसतात. त्यात त्यांचे आई बाप जुळवण्याऐवजी जळवणे पसंत करता, फूट पाडतात. मग प्रेम यशस्वी कसे व्हावे, हा प्रश्नच असतो.

प्रेम हे अग्निफुलांची बाग आहे, असं एक मराठी गझलकार म्हणतात. या बागेत विहरणं म्हणजे तारेवरची कसरत असते.

हल्लीचं प्रेम तकलादूच असतं ते टिकत नाही फार काळ. रुसवे फुगवे ठीक आहेत परंतु त्याचा भडका उडू नये. माणसाने आपल्याकडे कमीपणा घ्यावा तर प्रेम यशस्वी होतं. प्रेमात सर्वस्व अर्पण करायचं असतं. जसं कान्होपात्रेनं केलं होतं. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी ती पायी चालत गेली. त्या परमेश्वराच्या चरणी तिने प्राण अर्पण केले. आजकालची प्रेयसी प्रियकराचा प्राण घेते व पैसेवाल्याबरोबर पळून जाते. ती फसते व पुन्हा पश्चात्ताप करते याला काय म्हणावे ?

प्रेम हिंदी जनांनीच करावे. सगळ्या शायरांच्या गझला या प्रेम, प्रियसी, तिचा विरह व मग प्रेमभंगामुळे दारुच्या आहारी जाणे या विषयाभोवती फिरताना दिसतात. त्यात प्रेमाची एकनिष्ठता नसते. किंवा एखाद्यावर प्रेम केले तर ते अमर व्हावे यासाठी कुणी प्रयत्न करतान दिसत नाही.

प्रकाश क्षीरसागर

— लेखन : डॉ प्रकाश क्षीरसागर. गोवा
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments