नुकतेच, 22 फेब्रुवारी 2024 रोजी स्वर्गवासी झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची पुणे पत्रकार भवनाच्या उभारणीच्या काळात भरीव मदत झाली. त्याची आठवण झाली. आमच्या पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंतराव टिळक, कार्याध्यक्ष गोपाळ कृष्ण पटवर्धन आणि मी विश्वस्त कार्यवाह या नात्याने श्री मनोहर जोशी यांना मुंबईला मुख्यमंत्री दालनात अनेक वेळा भेटलो होतो. केसरीचे संपादक या नात्याने जयंतराव दादा यांना सर्वच मान देत. महाराष्ट्र शासनामध्ये विधानसभेचे सभापती म्हणून देखील दादांना जोशी सर यांना अतिशय मान देत असत तेही आम्ही पाहिले आहे.
आमच्या एका बैठकीत त्यांच्या दालनात आम्ही गप्पा मारत बसलो असताना मी पत्रकार भवन उभारणीसाठी शासनाची मदत हवी आहे अशी सुरुवात केली. औपचारिक पत्र आधी पाठविलेले होते. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत “सभापतीनी आदेश द्यायचा आणि मी चेक लिहायचा. इतकं सोपं आहे ते. तुम्ही काळजी कशाला करता”असं चटकन उत्तर दिलं.
त्यावर दादांनी देखील तितकाच दिलखुलास प्रतिसाद दिला. ते म्हणाले “या ठिकाणी मी पुण्याच्या पत्रकार भवनासाठीचा याचक आहे हे मी विसरणार नाही आणि तुम्हाला विसरू देणार नाही.“
हास्य विनोदात ती बैठक संपली.
जोशी सरांनी आपला शब्द पाळला. मोठ्या भरघोस देणगीचा चेक दिला. यथावकाश पत्रकार भवन वास्तु उभी राहिली. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनीच उद्घाटनास यावे असा सगळ्यांचाच आग्रह होता. गोपाळराव पटवर्धन आणि मी औपचारिक आमंत्रण द्यायला मुंबईला गेलो. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. पुणे विद्यापीठासमवेत सुरु असलेला पत्रकारितेचा पदविका, त्याखेरीज नित्य नेमाने आयोजित करीत असलेले अभ्यासवर्ग याची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. लहान मोठ्या संस्थांना सोयीचे व्हावे म्हणून अल्प खर्चात पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था पत्रकार भवनात केली आहे ते त्यांना सांगितले. हे सर्व उपक्रम त्यांनी समजून घेतले. मुख्य म्हणजे या वास्तूत मुंबई, दिल्ली, चंदीगड अशा इतर शहरातल्या सारखा प्रेस क्लब आम्ही सुरु करायचा नाही असा जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे त्यांना मुद्दाम सांगितले. याचं त्यांना कौतुक वाटलं.
भवनाच्या उद्घाटनाला 15 मे 1997 रोजी ते पुरेसा वेळ देऊन आले. पत्रकार संघात “मीट द प्रेस” या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले होते ते त्यांना खूप आवडले. प्रश्नोत्तरे छान झाली. विरोधी पक्षाबद्दल कटूता होणार नाही इतपतच सौम्य टीका त्यांनी केली. आमच्या दृष्टीने चांगली कॉपी मिळाली.
पत्रकार भवनाची ही वास्तु देशातील सर्वात देखणी आहे अशी प्रशंसा जोशी सरांनी तेव्हा केली. “पुण्याचे पत्रकार अतिशय हुशार आहेत त्यांनी मला माझे विचार व्यक्त करण्यासाठी बोलवले असा माझा समज होता. माझे भाषणही मी तयार केले आहे. पण येथे आल्यावर लक्षात आले की मी फक्त चेक घेऊन आलो असतो तरी चालले असते. पुण्याच्या पत्रकारांशी गप्पा मारायला मला नक्की आवडेल. आपण मला पुन्हा बोलवा. खूप अनौपचारिक गप्पा मारु या असे ते म्हणाले. “तेव्हा सभागृहात हास्यकल्लोळ झाल्याचे आठवते.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव भडसाळकर, श्रीराम शिंदे, हरीश केंची आदी सहकारी मित्रांची त्यावेळची उपस्थिती आज आठवली.
मजकूर संदर्भ दैनिक केसरीच्या संग्रहातून, फोटो उद्धव भडसाळकर यांच्या संग्रहातील.
— लेखन : प्रा डॉ किरण ठाकूर
(पुणे पत्रकार प्रतिष्ठानचा तत्कालीन विश्वस्त कार्यवाह )
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
डॉ किरणजी–लेखात सरांची छान आठवण सांगितली.लेख, फोटो आवडले.. सुधाकर तोरणे