“ठाकूर सर असे अचानक गेले, या बातमीवर अजूनही माझा विश्वासच बसत नाहीय. कसे व्यक्त व्हावे, ते ही कळत नाहीय. गेली ४ वर्षे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. अर्धा पाऊण तास तरी आम्ही फोन वर बोलत असू. त्यांनी न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर लिहिलेल्या त्यांच्या बातमीदारी करताना या लेखमालेचे आम्हाला पुस्तक प्रकाशित करायचे होते. तसेच ते पत्रकारिता शिकवायला लागले, तेव्हापासूनचे अनुभव त्यांनी पोर्टल वर लिहायचे ठरविले होते. निवृत्तीनंतर मी जे काही करतोय, विशेषत: लोकांना लिहिते करतोय याचे सरांना भयंकर कौतुक वाटायचे.
विश्वकर्मा विद्यापीठ आणि पोर्टल च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक प्रकारची आंतरवासिता सुध्दा सुरू केली होती. प्रत्येक लेख/मुलाखती मागे त्या त्या विद्यार्थ्यास ५००/ रुपये मिळत. या विद्यार्थ्याना सर विषय ठरवून द्यायचे, तसेच त्यांच्याकडून लिहून घेऊन ते तपासून मला पाठवायचे. या उपक्रमाचा सात आठ विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना तरी फायदा झाला. ही अशी माझी पहिली, उस्फुर्त प्रतिक्रिया पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्युट मधील बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ची आमची वर्ग मैत्रिण, जी पुढे स्वतः या विभागात प्राध्यापिका झाली आणि पुढे बरीच वर्षे विभाग प्रमुख राहून गेल्या वर्षी निवृत्त झाली, त्या प्रा डॉ उज्वला बर्वे हिला कळवली. नंतर मात्र सर गेल्याच्या धक्क्यातून सावरल्यावर सरांच्या एकेक आठवणी ताज्या होत गेल्या.
साधारण चार वर्षांपूर्वी सरांनी मोल्सवर्थ ने पावणे दोनशे वर्षांपूर्वी कसे संशोधन करून, किती परिश्रम घेऊन कशी मराठी – इंग्रजी डिक्शनरी तयार केली, याचे एक स्फुट पुण्यातील एका वृत्तपत्रात लिहिल्याचे माझ्या वाचनात आले. ते मला खूप आवडले. त्यानिमित्ताने पोर्टल वर नुसतेच ते स्फुट जसेच्या तसे प्रसिद्ध न करता, त्याच्या मागची प्रेरणा, सरांनी केलेले संशोधन, घेतलेले परिश्रम अशी अधिक माहिती घेऊन प्रसिद्ध करता येईल, असा विचार करून मी सरांचा संपर्क क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न करू लागलो. यासाठी इतर काहीना मी फोन केले. तसाच फोन रानडे इन्स्टिट्युट चे प्राध्यापक (आता विद्यमान विभाग प्रमुख) संजय तांबट सरांना फोन केला. त्यांच्याकडून मला सरांचा संपर्क क्रमांक मिळाला. तसे सर आम्हाला, ते यू एन आय चे पुणे येथील प्रतिनिधी असताना, १९८३-८४ साली reporting हा विषय शिकवायचे, याचे स्मरण होते. पण त्या नंतर आमचा ३६ वर्षात कधी संबंध आला नव्हता, तो या निमित्ताने आला. सरांचे मोल्सवर्थ वरील लिखाण, त्याचा सचित्र वृत्तांत पोर्टल वर प्रसिद्ध झाला आणि लवकरच आमची मोबाईल फोन मैत्री झाली.
न्यूज स्टोरी टुडे
१५.०७.२०२१
जेम्स थॉमस मोल्सवर्थ : मराठी – इंग्लिश शब्दकोशाचे जनक
✒️ देवेंद्र भुजबळ 👇
http://www.newsstorytoday.com/जेम्स-थॉमस-मोल्सवर्थ-मरा/
एकदा बोलता बोलता मी सरांना सुचविले की, सर आपण यूएनआय चे प्रतिनिधी असताना आपल्याला आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्तींविषयी पोर्टल वर लिहा. तर सर म्हणाले, “भुजबळसाहेब (सरांना मी अनेकदा सांगून बघितले की, सर मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे, त्यामुळे आपण मला भुजबळसाहेब न म्हणता, नुसते देवेंद्र म्हटल्यास मला ते आवडेल, पण सरांचा स्वभाव असा की, शेवट पर्यंत ते माझ्याशी एकेरीने कधी वागले, बोललेच नाही ! असो.)
मी मराठीत कधी काही लिहिलेच नाही, माझी सर्व पत्रकारिता ही यू एन आय या इंग्रजी वृत्त संस्थेत आणि पुढे काही इंग्रजी वृत्तपत्रात झाली आहे त्यामुळे मला मराठी वाचक ओळखतही नाही, त्यात मला मराठी लिहिताही येत नाही” असे सरांचे म्हणणे होते.
प्रसार माध्यमांतील बऱ्याच वर्षांच्या अनुभवाने मला हे माहिती होते की, अनेक घटना, प्रसंग घडताना तिथे युनएनआय, पीटीआय या वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी, भारत सरकार च्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो चे आणि त्या त्या राज्य सरकारच्या माहिती खात्याचे अधिकारी, कर्मचारी (टिव्ही कॅमेरामन, फोटोग्राफर हेच हजर असतात आणि तेच असे कव्हरेज आकाशवाणी, दूरदर्शन (पुढे खाजगी वाहिन्या) वृत्तपत्रांना देत असतात. त्यात सरांनी केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर इतर अनेक राज्यातही काम केले असल्याने त्यांच्या अनुभवात खूप वैविध्य असेल, याची मला खात्री होती.
सरांना तीन चार वेळा मनवून झाल्यावर ते लिहायला तयार झाले पण मला म्हणाले, “मला मराठी टायपिंग येत नाही, तर मी लिहिणार कसे ?” या वर मी म्हणालो, सर आपल्याला मराठी लिहिता जरी येत नाही, तरी मराठी बोलता तर येते ना ? यावर सर म्हणाले, “म्हणजे काय ? ठाकूर आडनाव असले तरी मी मराठी च आहे !” मग मी त्यांना सुचविले की सर, आपण आपल्या नाती कडून व्हॉईस ॲप डाऊनलोड करून घ्या.
ते सुरू केले की आपण जे जे बोलाल, ते ते आपोआप टाईप होत जाईल. त्यानंतर चे शुध्द लेखन, व्याकरणाची योग्य जागी टाकायची योग्य चिन्हे आदी काम मी करीत जाईल. या वर सर म्हणाले की, “एक दोन भाग लिहिण्याचा प्रयोग करून बघू या.” आता आमचे हे सर्व बोलणे होत असे, त्यावेळी सर ७३ /७४ वर्षांचे होते. पण नवीन काही शिकण्याची, नवीन काही करण्याची त्यांची तयारी असल्यानेच आम्ही हा प्रयोग करून पाहायचे ठरविले.
न्यूज स्टोरी टुडे
०६.०१.२०२३
– न्यूज स्टोरी टुडे : कार्यक्षमता, कल्पकता, सौजन्य, आपुलकी
✒️ प्रा डॉ किरण ठाकूर👇
https://newsstorytoday.com/न्यूज-स्टोरी-टुडे-कार्यक/
लेखमालेचे नाव ठरविण्याबाबत ही आमची बरीच चर्चा झाली. मी लेखमालेचे नाव, “बातमी मागची बातमी” असे असावे म्हणून आग्रही होतो. तर सर “बातमीदारी करताना” असेच नाव असावे, या बाबत ठाम होते. शेवटी सरांचे म्हणणे मान्य केले आणि एका गुरुवारी सरांच्या लेखमालेचा पहिला भाग वेब पोर्टल वर प्रसिद्ध झाला. पुढच्या गुरुवारी, दुसरा भाग प्रसिद्ध झाला. मग मात्र सरांच्या लेखमालेला खुप चांगला प्रतिसाद मिळू लागला, त्यामुळे जणू सरांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. एखाद दुसरा आठवडा वगळता सरांनी ते पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट चे विभाग प्रमुख म्हणून रुजू होईपर्यंतच्या त्यांच्या बातमीदारी विषयी सुंदर, स्वच्छ, चित्रमय, शुध्द असे अखंडपणे लिखाण केले. विशेष म्हणजे एखाद्या आठवड्यात काही कारणांनी ते त्या आठवड्यातील भाग देऊ शकत नसल्यास, तशी पूर्व कल्पना देत. त्यामुळे त्या भागाऐवजी, दुसरे काय प्रसिद्ध करायचे याचे नियोजन करता येई. कधी त्यांनी आमची गैरसोय, अडचण होऊ दिली नाही. प्रसार माध्यमातील व्यक्तींना या शिस्तीचे महत्व अधिक चांगले समजू शकेल.
अशी ही लेखमाला सर, ३४/ ३५ आठवडे लिहीत होते. या लेखमालेचे एकूण ३३ भाग आपल्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध झाले.
“किरण ठाकूर” आणि “किरण ठाकुर” !
✒️ प्रा डॉ किरण ठाकूर.👇
https://newsstorytoday.com/किरण-ठाकूर-आणि-किरण-ठा/
या लेखमालेमुळे सरांच्या संपर्कात कधी काळी येऊन गेलेले जुने सोर्सेस, सरकारी अधिकारी, पत्रकार, सहकारी, पत्रकारितेतील नवे – जुने विद्यार्थी अशा एक ना अनेक व्यक्तीं पुन्हा त्यांच्या जीवनात आल्या. त्यामुळे सरांनी पोर्टल विषयी लिहिलेल्या एका लेखात, “या पोर्टल ने मला नवे जीवन दिले”, असे कृतज्ञतापूर्वक लिहिले. अर्थात असे लिहिणे हा सरांच्या मनाचा मोठेपणाच होता.
वेब पोर्टलच्या काही उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे “स्नेह मिलन”, विशेष म्हणजे हे स्नेहमिलन कुठल्या हॉल मध्ये, हॉटेल मध्ये होत नाही तर पोर्टलचे लेखक, कवी, वाचक, ज्यांच्यावर पोर्टल वर लिहिल्या गेले आहे, अशा व्यक्ती, संस्था यांचे असते. तसेच ते यांच्यापैकींच कुणाच्या तरी घरी असते. तिथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असा काही प्रकार नसतो. सर्वच एक समान असतात. एकमेकांना भेटणे, आपापल्या कामाची माहिती देणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे, कथा, कविता आणि अन्य काही प्रकारचे सादरीकरण असे सर्व काही अनौपचारिक आणि सहजपणे होत असते. संगमनेर, नाशिक येथील स्नेहमिलनाचे वृत्तांत सरांनी वाचले होते. एकदा सर म्हणाले की, “तुमचे स्नेहमिलन पुण्यात कधी होणार ?” तर मी म्हणालो, बघू कोण, कधी आमंत्रण देते ते !. तर सर लगेच म्हणाले, “आमंत्रणाची वाट कशाला बघता ? माझ्याच घरी आपण ते करू या.”
अनायसे २७ मार्च २०२२ रोजी पोर्टल ला एक वर्ष पूर्ण होणार होते. म्हणून आम्ही स्नेहमिलनाची तारीख सुध्दा तीच ठरवली. तारीख ठरल्यावर मी पुण्यातील पोर्टलचे लेखक, कवी, संस्थेशी संबंधित व्यक्ती, ज्यांच्यावर पोर्टल वर लिहिल्या गेले, अशा व्यक्तींची यादी केली. दरम्यान सरांनीही त्यांची यादी केली. मी ती यादी वाचून त्या त्या व्यक्तींना बोलवायला नाखूष होतो. कारण तो पर्यंत तरी त्या यादीतील कुणाचा पोर्टल शी कुठल्याही कारणांनी काहीही संबंध आलेला नव्हता. म्हणून मग सरांनी सुचविले की, अशा व्यक्तींना आपण पोर्टल चे हितचिंतक म्हणू या. मग काय अडचण आहे ? मग मला तशी काही अडचण राहिली नाही. तरीही स्वभावदोष म्हणा, की सरकारी अधिकारी राहिल्याचा परिणाम म्हणा, मला सरांचे म्हणणे मान्य करावे लागले, याचा काहीसा रोष माझ्या मनात राहिलाच.
पण सरांच्या घरी वीस पंचवीस नव्हे तर बेचाळीस जणं जमले. त्यात सरांचे कुटुंबीय, काही मित्र, स्नेही, पत्रकार नगर मधील शेजारी, काही प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्ती होत्या. त्यामुळे हे स्नेह मिलन अपेक्षेपेक्षा सुंदर आणि अविस्मरणीय झाले.
योगायोगाने नेमकी सरांची पंचाहत्तरावी त्याच महिन्यात येत होती. पण सरांना अशा कर्मकांडात विश्वास नसल्याने त्यांनी त्यांची पंचाहत्तरावी कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही, मित्रमंडळी अशी कुणाला साजरी करू दिली नाही. अर्थात तो पर्यंत आम्हाला याची काही कल्पना नव्हती. पण सरांच्या घरी स्नेह मिलन असल्याने, ते पोर्टल चे नियमित लेखक असल्याने आम्ही शाल, श्रीफळ आणि विशेष म्हणजे पुणेरी पगडी घालून सरांचा सत्कार केला. त्यामुळे एरव्ही कोरडे वाटणारे सर खूप भावूक झाले. सर कोरडे होते, ते या अर्थाने की त्यांना असे समारंभ आवडत नसत. अन्यथा एरवीच्या त्यांच्या वागण्याबोलण्यात मिश्किलपणा आणि सहजपणा असे. मी इतकी वर्षे इंग्रजी पत्रकारिता केली, प्राध्यापकी केली, पाहिजे इतके पुस्तके लिहिली, किती व्याख्याने दिली, असा कुठलाही आविर्भाव वा बडेजावपणा त्यांच्या वागण्या बोलण्यात नसे. त्यांच्यातील सहजपणा हा सहजपणेच असे. सरांच्या घरी झालेल्या या स्नेहमिलनामुळे त्यांनी माझा संकुचित असलेला दृष्टिकोन नकळतपणे व्यापक केला, हे मात्र मी कधी विसरू शकत नाही. तेव्हा पासून पुढे झालेल्या स्नेहमिलनात आम्ही सरांनी पाडलेला पायंडा कटाक्षाने पाळू लागलो.
सरांच्या घरी झालेले स्नेहमिलन आपण पुढील 👇लिंक वर क्लिक करून सचित्र वाचू शकता.
न्यूज स्टोरी टुडे
२८.०३.२०२२
– असं झालं पुणे स्नेह मिलन
✒️ टीम एनएसटी👇
http://www.newsstorytoday.com/असं-झालं-पुणे-स्नेह-मिलन/
सरांच्या घरी झालेल्या स्नेहमिलना विषयी खूप छान प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या प्रतिक्रिया आपण पुढील 👇लिंक वर क्लिक करून अवश्य वाचा.
न्यूज स्टोरी टुडे
२९.०३.२०२२
– पुणे स्नेह मिलन… प्रतिसाद !
✒️ टीम एनएसटी👇
http://www.newsstorytoday.com/पुणे-स्नेह-मिलन-प्रतिसाद/
सरांच्या घरी झालेल्या स्नेहमिलनाचे वृत्तांत वाचून पुढे विरार (डॉ हेमंत जोशी, बाल रोग तज्ञ), ठाणे (लेखिका मेघना साने, गायक हेमंत साने यांच्या घरी), नवी मुंबई (आमच्या घरी), सातारा (लेखिका रश्मी हेडे यांच्या घरी), न्यू जर्सी, अमेरिका (लेखिका आणि अमेरिकेत ४० वर्षे कॅन्सर वर संशोधन करणाऱ्या), लातूर (जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या निवासस्थानी), ही स्नेहमिलने सरांनी दिलेली व्यापक दृष्टी लक्षात ठेऊन आयोजित करण्यात आली आणि येतील.
सर, त्यांची लेखमाला चालू असताना आणि नंतरही विविध लेख, बातम्या, यश कथा पोर्टल साठी लिहीत राहिले. साध्या साध्या वाटणाऱ्या कार्यक्रमांमागील, उपक्रमांमागील कल्पना उचलून धरीत. काही वेळा फोन करून ते त्या त्या बातमीचे, उपक्रमांचे किती, कसे महत्व आहेत, हे आत्मीयतेने समजावून सांगत. खरं म्हणजे सरांचे स्थान इतके मोठे की, त्यांनी काहीही सांगितले नसते तरी आम्ही त्या बातम्या, लेख, यशकथा प्रसिद्ध केल्याच असत्या. असे असले तरी सर त्यांचा दृष्टीकोन मला समजावून सांगत. यावरून त्यांची त्या त्या विषयाबाबतची तळमळ, आत्मियता दिसून येई. त्या त्या कल्पना, उपक्रमांचे समाजात जागोजागी अनुकरण होण्यासाठी अशा कार्यक्रमांची, उपक्रमांची अधिकाधिक प्रसिद्धी झाली पाहिजे, यासाठी त्यांचा असा हा सततचा प्रयत्न असे.
गेल्या तीन चार वर्षांमध्ये मी आणि माझी पत्नी सौ अलका जेव्हा जेव्हा पुण्यात सरांच्या घरी गेलो तेव्हा तेव्हा सर आणि मॅडम या दोघांचेही नैसर्गिक अगत्य, जे आजकाल महादुर्मिळ झाले आहे, आम्हाला अनुभवायला मिळाले. दोघांनाही आम्ही तीनचार दिवस तरी आमच्या घरी राहायला या, असे आमंत्रण अधूनमधून देत असू. सरांचा एक मुलगा मुंबईत असल्याने ते दोघेही कधी तरी त्याच्याकडे जाताना किंवा त्याच्याकडून येताना आपल्या घरी नक्की येतील अशी आशा आम्हाला वाटत राही. सर ही नक्की येऊ, असा वादा करीत असत.
एरव्ही दिलेला आपला शब्द कटाक्षाने पाळणारे सर आमच्या घरी येण्याचा, दिलेला शब्द न पाळताच, वादा न निभवताच अचानक अनंताच्या प्रवासाला निघून गेले, याची कायमची रुखरुख मनात राहील. सर गेले, पण त्यांच्या आठवणी, त्यांच्याशी वेळोवेळी केलेले हितगुज, विविध विषयांवर केलेली चर्चा, साधलेला संवाद कायमचा मनात राहील. सरांना विनम्र अभिवादन. 🙏
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
सरांना भावपूर्ण आदरांजली
डॉ.किरण ठाकूर सरांना दिलेली भावपूर्ण आदरांजली.
सरांच्या घरी झालेले पोर्टलचे स्नेहसंमेलन आठवते.