ज्ञानोबा सांगती विश्व पहावे भक्तीनं
सृष्टीमय रहावे शिकवे भागवत IIधृII
समुद्रावरील लाटा सदैव उफाळतात
भरती ओहोटी चालू राहे सदोदित
स्थित्यंतर पचवितो शांतपणे समुद्र II1II
झाकला जात नाही लाटांनी समुद्र
कल्लोळ माळा उसळती जरी जोरात
अथांग सागराची खोली आहे अगाध II2II
लाटांचा विलास आहे सागराचे वैभव
पाण्यावरती लाटांची क्रीडा आहे जगरूप
रत्नाकर आपल्या स्थानी राहे स्थितप्रज्ञ II3II
एकरूप आहेत सागर लाटा लवण
न होई विभाजन दोन्ही रूप जाती विरून
अनुभूती अनुभवणं ईश्वराचे दर्शन II4II

— रचना : अरुण गांगल. कर्जत-रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800